कोरोनाची बाधा झाली आणि वेगवेगळे शारीरिक त्रास जाणवू लागले. यात छातीत मोठ्या प्रमाणावर दुखवा सर्व प्रथम जाणवू लागला. यामुळे मालपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाची रॅपिड अँटिजन टेस्ट करून घेतली रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र त्रास दिवसेंदिवस वाढू लागला. छातीच्या त्रासासह श्वास घेण्यास देखील त्रास जाणवू लागल्याने खासगी डॉक्टरांनी सिटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. यात स्कोर १५ आला. ऑक्सिजनचे प्रमाणही घटली.
डाॅक्टरांनी ॲडमिट होण्याचे सांगितले. मात्र बेडअभावी दोंडाईचात या दवाखान्यातून त्या दवाखान्यात बेडचा शोध घेण्यासाठी भटकंती सुरू झाली, मात्र बेड उपलब्ध झाला नाही. मोठ्या मुश्किलीने एका ठिकाणी बेड उपलब्ध केला तर उपचार दुसऱ्या ठिकाणावरून येऊन डॉक्टरांनी सुरू केला. मात्र काहीही फरक दिसून आला नाही. प्रकृती स्थिर होती डॉक्टरांनी रेमडेसिविर आणायला सांगितले, मात्र तीन दिवस फिरून हे इंजेक्शन उपलब्ध झाले नाही शेवटी मामांनी धुळे येथील मान्यताप्राप्त कोविड सेंटरमध्ये दाखल केले. त्यावेळी मनाचा आत्मविश्वास ढळू दिला नाही. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला कोरोनावर मात करून घरी आईवडिलांचे चरणस्पर्श करण्याचा निर्णय मनाशी मी पक्काच केला होता. रेमडेसिविर मिळो अथवा नको.
चार दिवसांच्या उपचारानंतर बरे वाटायला लागले. पाचव्या दिवशी डॉक्टरांनी डिस्चार्ज केला. घरी १४ दिवस होम क्वांरटाईन होऊन कोरोनाला हरविले. आता प्रकृती उत्तम असून बाधित रुग्णांनी कोरोनाची बाधा झाली तरी घाबरायचे कारण नाही. रेमडेसिविर मिळो अथवा नको, मात्र मनाचा आत्मविश्वास तसूभर ढळू देऊ नका. आत्मविश्वासाच्या जोरावर आपण मरणाच्या दारातून परत येऊ शकतो. सभोवतालच्या कोरोनाविषयीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. त्यांच्याकडे पाठ फिरवा. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जो तो जणू कोरोनावर पीएच.डी. झाल्यासारखे सल्ले देतांना दिसून येत आहेत. याकडे साफ दुर्लक्ष करत लसीकरण करून घ्या. तोंडावर मास्क ठेवा, सॅनिटायजरचा वापर करा प्रत्येक वेळी एकमेकांपासून लांब उभे रहा. लागण झालीच तर आत्ममनोबल वाढवा आणि आत्मनिर्भर व्हा. कोरोनाला हरवून मरणाच्या दारातून आपण परत येऊ शकतो हे मी अनुभवले आहे.