धुळे : जागतिक पातळीवर कोरोनाचा कहर सुरू आहे़ राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना धुळे जिल्हा आणि सिमाभागातही रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे़ शासकीय, प्रशासकीय पातळीसह सर्वसामान्यांमध्ये देखील कोरोना या एकमेव विषयाची चर्चा आहे़ यंदाचा उन्हाळा आणि त्याची तिव्रता याकडे कुणाचे फारसे लक्ष नाही किंवा कोरोनामुळे या विषयाला महत्व नाही अशी परिस्थिती आहे़परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, दर वर्षाप्रमाणे यंदा देखील सूर्याने आग ओकायला सुरूवात केली आहे़ उन्हाची तिव्रता वाढली आहे़ गेल्या आठवड्यात ३५ अंश सेल्सीयस तापमान होते़ रविवारी ३७ अंश तापमानाची नोंद झाली़ दुपारच्या वेळेला उन्हाचे चटके असह्य होत आहेत़ अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्यांनाच त्याचे चटके जाणवत आहेत़ लॉकडाउनमुळे सर्व व्यवहार ठप्प असल्याने आणि संचारबंदीमुळे सर्वसामान्य नागरीक घरातच असल्याने त्यांची यंदाच्या उन्हाळाच्या चटक्यांपासून सुटका झाली आहे़ ज्यांच्या घरात वातानुकुलित यंत्र आणि कुलर आहेत त्यांना तर उन्हाळा आहे की नाही याची जाणिवसुध्दा नसावी़ परंतु हातावर पोट असणाऱ्यांना मात्र घरात देखील उन्हाचे चटके जाणवत आहेत़‘मे हीट’चा तडाखा अजुन लांब असला तरी एप्रिलपासुनच उन्हाची तिव्रता वाढली असून पाणीटंचाईच्या झळा बसु लागल्या आहेत़ शहरात पाणीपुरवठा सुरळीत आहे; परंतु नव्याने महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या वसाहतींमध्ये अजुनही मुलभूत सुविधांची वानवा असल्याने तेथील रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ नगावबारी टेकडीच्या पलिकडे असलेल्या नवीन वसाहतींमधील नागरिकांना महामार्गालगत असलेल्या तापी योजना पाईपलाईनच्या चेंबरमधून पाणी भरावे लागत आहे़ पाण्याची तहान वाढल्याने या वसाहतीमधील नागरिकांना मात्र लॉकडाउनमध्ये सुध्दा जीवनावश्यक गरजेसाठी बाहेर पडावेच लागत आहे़पाणीटंचाईच्या झळा केवळ मनुष्यालाच नव्हे तर प्राणी, पक्ष्यांनाही जाणवू लागल्या आहेत़ उन्हाळ्यात तहान भागत नाही, अशातच नेहमीच्या पाणतळ्यांवरचे पाणी आटल्याने खारुताई असो की कोणताही पक्षी पाण्यासाठी दाहीदिशा भटकतांना दिसत आहे़दरवर्षी उन्हाळा लागला की, ‘पक्ष्यांसाठी छतावर दानापाण्याची सोय करा’, असे आवाहन करणाºया पोस्टचा सोशल मीडियावर भडीमार होता़ परंतु यंदा कोरोनामुळे एखादा अपवाद वगळता कुणीही अशा पोस्ट टाकताना दिसत नाहीत़ एक मात्र नक्की़़़ काही नागरिकांनी आणि पक्षी प्रेमींनी मात्र आपल्या छतावर, गार्डनमध्ये, बाल्कनीत पक्ष्यांसाठी दानापाण्याची सोय केली आहे़ चिमणी नेहमी माणसाच्या सान्निध्यात राहणारी आहे़ सध्या मोबाईलमुळे रेडीएशन वाढल्याने ती शहरी वसाहतींपासुन दूर जावू लागली आहे़ परंतु उन्हाळ्यात मात्र पाण्याच्या शोधात असलेल्या चिउताईचा चिवचिवाट नक्कीच ऐकायला मिळतो़कोरोना उपाययोजनांमध्ये सेवा बजावण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनाने आणि महानगरपालिकेने नवीन वसाहती आणि गावांकडे थोडेफार मनुष्यबळ वळविले तर येथील नागरिकांची देखील तहान भागेल आणि त्याची वणवण थांबेल़
मनुष्य, प्राणी, पक्ष्यांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 10:41 PM