गेल्या वर्षी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक झाली. मात्र आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्याने, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या १५ व पंचायत समितीच्या ३० सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले. ही रिक्त झालेली पदे भरण्यासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अर्ज छाननीनंतर ९ जुलै २१ रोजी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा छाननीनंतरची निवडणूक जाहीर केली आहे.
गेल्यावेळी अर्ज छाननीनंतर जिल्हा परिषदेच्या १५ गटांसाठी १०७ तर ३० गणांसाठी १८५ अर्ज वैध ठरले होते. २१ सप्टेंबरपासून पुढील निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात झालेली असून, सोमवारी २७ रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख आहे.
जिल्हा परिषदेच्या केवळ १५ जागांसाठी पोटनिवडणूक होत असताना तब्बल १०७ अर्ज दाखल करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता कोण उमेदवार निवडणूक रिंगणातून माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
अनेकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत. या अपक्षांनी अर्ज माघारी घ्यावे, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची मनधरणी सुरू केलेली आहे. मात्र, याला कितपत यश येते, हे अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे. असे असले तरी जिल्ह्यात भाजप विरूद्ध इतर पक्ष असाच सामना रंगणार आहे. पक्षाच्या उमेदवारांची उमेदवारी निश्चित असल्याने, त्यांनी प्रचाराला गती दिल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.