धुळे :
पतीच्या नावावर येथील अवधान एमआयडीसीतील जमीन तत्कालीन अधिकाऱ्यांनी बोगस नोटरी करून परस्पर दुसऱ्याच्या नावावर करून दिल्याचा प्रकार पतीच्या निधनानंतर समोर आल्यावर यासंदर्भात पोलिस स्टेशन, मंत्रालयात वारंवार अर्जफाटे करूनही कोणी लक्ष देत नाही. म्हणून शीतल रवींद्र गादेकर (वय ४५) यांनी मंत्रालयासमोर विष घेऊन आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. उपचार घेताना मंगळवारी सकाळी त्यांचा मुंबईत मृत्यू झाला.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळ्यातील अवधान एमआयडीसी येथे ‘पी १६’ नावाचा त्यांचा प्लाॅट हा मृत महिलेेचे पती रवींद्र गादेकर यांच्या नावावर होता. पुणे येथे राहत असल्यामुळे पतीच्या निधनानंतर प्लाॅटची माहिती मृत शीतल यांना समजली. त्यांनी माहिती घेतली तेव्हा तो प्लॉट खोटी नोटरी करून अधिकाऱ्यांनी परस्पर दुसऱ्यांना देऊन टाकल्याची माहिती त्यांना मिळाली. तेव्हा यासंदर्भात त्यांनी धुळ्यात मोहाडी पोलिस स्टेशनला, तसेच मुंबईतही पोलिसांत आणि मंत्रालयात यासंदर्भात तक्रारी केल्या;परंतु सर्वांनी याकडे दुर्लक्षच केले. शासकीय कार्यालयांच्या चकरा मारून थकल्यावर वैफल्यग्रस्त झालेल्या शीतल गादेकर यांनी आपली जीवनयात्रा संपविण्याचे टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी मंत्रालयसमोर विष प्राशन करून आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात येताच त्यांना मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.