धुळे : शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी खुर्द येथे भल्या पहाटे एका झोपडी वजा घराला अचानक आग लागली़ या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असतानाच वयोवृध्द महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सकाळी उजेडात आली़ अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आणली़शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी खुर्द येथे आधार डोंगर मोरे यांचे झोपडी वजा घर आहे़ ते परिवारासोबत झोपलेले असताना त्यांच्या घराला शनिवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली़ क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केल्याने काही समजण्याच्या आत आग भडकली़ या आगीत घराचे तर प्रचंड नुकसान झाले़ संसारोपयोगी साहित्य देखील जळून खाक झाले़आगीच्या ज्वाळा सहन न करु शकणारी वयोवृध्द महिला पदमाबाई डोंगर मोरे या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला़ क्षणार्धात सर्व होत्याचे नव्हते झाले़आगीची माहिती स्थानिक नागरिकांना कळताच गर्दी जमा झाली होती़ आग विझविण्यासाठी अनेकांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले़ आगीची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळताच या विभागाचे तुषार ढाके यांच्या नेतृत्वाखाली बंबाचे चालक भूषण अहिरे, सचिन करनकाळ, किरण साळवी यांनी घटनास्थळी धाव घेत पाणी मारा करून आग आटोक्यात आणली आहे. त्यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती़पोलिसात झाली नोंदघटनेची माहिती मिळताच नरडाणा पोलिसांनी देखील घटनास्थळाकडे धाव घेतली़ पोलिसांनी सुरुवातीला गर्दी हटविली आणि आग लागलेल्या ठिकाणी मदतकार्य सुरु केले़ यानंतर अग्नीउपद्रवची नोंद सायंकाळी करण्यात आली असून तपास पोलीस करीत आहेत़ घटनेमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत़कारण गुलदस्त्यातपहाटेच्या सुमारास घरातील मंडळी झोपलेले असताना आग नेमकी लागली कशी, कोणत्या कारणाने लागली याचे कारण मात्र सायंकाळी उशिरापर्यंत गुलदस्त्यात होते़
वाघाडी येथे भल्या पहाटे लागलेल्या आगीत महिलेचा होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 10:11 PM