देवेंद्र पाठक, धुळे: ५१ वर्षीय महिलेकडील रोकडसह सोन्याची अंगठी, असा ५९ हजार ४१० रुपये किमतीचा ऐवज दोन महिलांनी शिताफीने लंपास केल्याची घटना धुळ्यात घडली. आग्रा रोडवरील नाशिककर ज्वेलर्स ते गोंदूर रोडदरम्यान असलेल्या एच.पी. पेट्रोल पंपापर्यंत रिक्षा प्रवासादरम्यान हा चोरीचा प्रकार घडला.
कोकिळा कोमलसिंग पवार (वय ५१, रा. बोरसेनगर, गोंदूर रोड, देवपूर) या महिलेने फिर्याद दाखल केली. त्यानुसार २४ जुलै रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास कोकिळा पवार या बाजारपेठेतून घरी येण्यासाठी निघाल्या. त्यांना वाटेत रिक्षा भेटली. या रिक्षेत पूर्वीच दोन अनोळखी महिला बसलेल्या होत्या. आग्रा रोडवरील नाशिककर ज्वेलर्सपासून रिक्षा गोंदूर रस्त्याकडे जात असताना संधी साधून दोघा संशयित महिलांनी त्यांच्या जवळील ३५ हजार ९१० रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठीसह २३ हजार ५०० रुपयांची रोकड, असा सुमारे ६० हजारांचा ऐवज शिताफीने चोरून घेतला. या महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवण्यात आले होते. रिक्षा थांबली. या महिलेला खाली उतरवून रिक्षा मार्गस्थ झाली.
आपल्याकडील रोख रक्कम आणि सोन्याची अंगठी तिला दिसली नाही. अनोळखी दोन महिलांनी चोरी केल्याचा संशय कोकिळा पवार यांना आहे. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात अनोळखी दोन महिलांविरोधात फिर्याद दाखल झाल्याने भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. पोहेकॉ डी.पी. गायकवाड घटनेचा तपास करीत आहेत.