बाहेर ड्युटी करावी लागत असल्याने अनेकांशी संपर्क येतो. त्याचा संसर्ग कुटुंबाला होऊ नये, याचीदेखील काळजी महिला पोलिसांना घ्यावी लागत आहे. ६ ते ८ तासांची ड्युटी असते. त्याशिवाय कोरोनामुळे रात्री ८, तर कधी ९ वाजेपर्यंत ड्युटी करावी लागते. लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत कधी कधी आपले कर्तव्य महिला पोलिसांना पार पाडावे लागते. त्यामुळे लेकरांसह पती, सासू - सासऱ्यांना वेळेवर जेवण देऊ शकत नाही. त्यांच्यासाठी कधी पुरेसा वेळ देऊ शकत नाही, अशी परिस्थिती सध्या महिला पोलिसांवर कोरोनामुळे ओढवली आहे. त्यातही रात्री उशिरा घरी गेल्यावर कोरोनाची भीती मनात असते. आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात असली तरी घरच्या लोकांना त्याची बाधा पोहोचू नये, याकडेदेखील त्यांना पाहावे लागत आहे. एखाद्या गुन्ह्यात महिला आरोपी असेल तर तेथे जाण्यासह तपासासाठी बाहेरगावीदेखील जावे लागते. पूर्वी महिला चूल आणि मूलपर्यंत मर्यादित होती. आता त्यात खूपच बदल झाला आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यादेखील आपली जबाबदारी पार पाडताना दिसत आहे.
कुटुंबाची काळजी मोबाईलवरूनच
कोरोनाच्या भीतीमुळे कुटुंबातील वृध्द सासू - सासरे, पती, तर काहींच्या घरी आई-वडील आणि विशेषकरून लहान मुलांना त्रास होऊ नये, त्यांच्याजवळ लगेच जाणे कोरोनामुळे टाळले जात आहे. आवश्यक ती स्वच्छता, सॅनिटायझरचा योग्य वापर केला जात आहे. काही काम असल्यास मोबाईलवरूनच संपर्क साधून महिला पोलिसांना समाधान मानावे लागत आहे.
प्रतिक्रिया
१) कोरोनाचा कठीण काळ सुरू असल्याने सर्वात अगोदर कर्तव्याला प्राधान्य देण्यात आले आहे. घरी दोन मुले असल्याने त्यांच्याकडे लक्ष देऊन माझे माझ्या दैनंदिन कामांकडे लक्ष असते, ते करीत असताना मला घराकडेही पाहावे लागते.
- अलका थोरात, महिला पोलीस
२) सर्वात अगोदर माझे कामांकडे लक्ष असते, ते करीत असताना घराकडेदेखील लक्ष ठेवावे लागते. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून अहोरात्र केवळ कर्तव्याला प्राधान्य आहे. अनेक प्रकारचे अनुभव या काळात मला मिळाले.
- रंजना चव्हाण, महिला पोलीस
३) मी अजून अविवाहित असले तरी घरी आई-वडील आणि भावाची जबाबदारी आहे. ती सांभाळत असताना माझ्या कर्तव्याकडे कधी दुर्लक्ष होऊ दिले नाही. जी जबाबदारी मिळत गेली ती पार पाडण्यासाठी मागे हटले नाही.
- लक्ष्मी साळुंखे, महिला पोलीस
४) कोरोना असल्यामुळे सध्यातरी याच कामाला आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या नियोजनाला प्राधान्य दिले जात आहे. घरची मंडळी काळजी करीत असताना कर्तव्यदेखील पार पाडावे लागते. त्यात मात्र दुर्लक्ष होऊ दिले नाही.
- रंजना पावरा, महिला पोलीस
५) घरी लहान ४ वर्षांचा मुलगा आहे. त्याला सांभाळण्याची मोठी जबाबदारी असतानादेखील कोरोना काळात कामाला प्राधान्य दिले आहे. त्यात कुठेही कमतरता पडू दिली नाही. घराकडेदेखील दुर्लक्ष होऊ दिले नाही.
- रेवती बिऱ्हाडे, महिला पोलीस
६) कोरोना असल्यामुळे घरासह सर्वच ठिकाणी तसे भीतीचे वातावरण आहे. कर्तव्य बजावत असताना सारखे बाहेर राहावे लागते. घरी १३ वर्षांचा मुलगा असल्याने घरी लक्ष असते. बंदोबस्तामुळे कधी घरी जाण्यास उशीर होत असतो.
- सुशीला वळवी, महिला पोलीस