खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत १३ मार्च रोजी धुळ्यात महिला न्याय हक्क परिषद
By अतुल जोशी | Published: March 11, 2024 04:24 PM2024-03-11T16:24:30+5:302024-03-11T16:24:42+5:30
महिला न्याय हक्क परिषद सुरत बायपास रस्त्यालगत असलेल्या देशविदेश हॅाटेलच्या मैदानावर दुपारी १ ते २ यावेळेत होणार आहे.
धुळे: काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बुधवार दि.१३ मार्च रोजी धुळ्यात महिला न्याय हक्क परिषद होणार असून, या परिषदेसाठी जिल्ह्यातून सुमारो ६ हजार महिला येणार असल्याची माहिती देण्यात आली.
महिला न्याय हक्क परिषद सुरत बायपास रस्त्यालगत असलेल्या देशविदेश हॅाटेलच्या मैदानावर दुपारी १ ते २ यावेळेत होणार आहे.
महिला न्याय हक्क परिषदेसाठी मैदानावर ४२ हजार स्क्वेअरफूटचा मोठा मंडप उभारण्याचे काम वेगाने सुरू असून, मंगळवारी सकाळपर्यंत मंडप उभारणीचे काम पूर्ण होणार आहे. याठिकाणी महिलांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सभेच्या ठिकाणी दोन भव्य एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. तसेच या मैदानावर आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
अधिकाऱ्यांची मैदानावर पहाणी
खासदार राहूल गांधी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महिला न्याय हक्क परिषदेसाठी शहरातील तीन स्थळांची पहाणी करण्यात आली होती. मात्र सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी देशविदेश हॅाटेलच्या मैदानाची निवड केली. सीआरपीएफचे अधिकारी मनोजकुमार यादव हे गेल्या दोन दिवसांपासून याठिकाणी तयारीचा आढावा घेत आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी अभिनव गोयल, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनीही या ठिकाणी भेट देऊन जागेची, वाहन पार्किंग व्यवस्थेची पहाणी करून संयोजकांना सूचना केलेल्या आहेत.