राहुल गांधी यांच्या उपस्थितीत धुळ्यात उद्या महिला न्याय हक्क परिषद
By अतुल जोशी | Published: March 12, 2024 09:05 PM2024-03-12T21:05:43+5:302024-03-12T21:06:06+5:30
राहुल गांधी यांची भारत न्याय जोडो यात्रा मंगळवारी सायंकाळी दोंडाईचात दाखल झालेली आहे.
धुळे : काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत धुळ्यात बुधवार दि.१३ मार्च रोजी दुपारी १२ ते १ यावेळेत महिला न्याय हक्क परिषद होणार आहे. ही परिषद नागपूर-सुरत बायपास मार्गावरील मैदानावर होणार आहे. राहुल गांधी यांची भारत न्याय जोडो यात्रा मंगळवारी सायंकाळी दोंडाईचात दाखल झालेली आहे.
बुधवारी सकाळी ७:३० वाजता त्यांचा दोंडाईचात रोड शो होईल. तेथून ते सकाळी ८:१५ वाजता साळवे फाट्याजवळील क्रांती स्मारकावर पोहचून तेथे अभिवादन करतील. त्यानंतर सकाळी ८:३० वाजता चिमठाणे, ९ वाजता सोनगीर फाटा, ९:१५ वाजता सरवड फाटा,९:३० वजाता देवभाने फाटा, ९:४५ वाजता नगाव, १० वाजता नगावबारीला पोहचतील. सकाळी १०:१५ वाजता त्यांचे धुळे शहरात आगमन होणार आहे. तेथून ते एसएसव्हीपीएस महाविद्यालयाजवळ पोहचतील. सकाळी ११ वाजता राहुल गांधी यांचा ताफा महात्मा गांधी पुतळ्याजवळ पोहचेल. त्याठिकाणी राहुल गांधी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) त्यांचे स्वागत केले जाईल.
सकाळी ११ ते ११:३० यावेळेत महात्मा गांधी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत पदयात्रा काढण्यात येईल. कराची खुंटवाला चौकात शिवसेनेतर्फे (ठाकरे गट) त्यांचे स्वागत केले जाईल. त्यांनतर ११:३० ते १२ यावेळेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ त्यांची चौक सभा होईल. तेथून ते महिला न्याय हक्क परिषदेच्या ठिकाणी पोहचतील. दुपारी १२ ते १ या वेळेत महिला न्याय हक्क परिषद होणार आहे. या परिषदेला खान्देशसह राज्यातून सुमारे सहा हजार महिला उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. महिला परिषद आटोपल्यानंतर ते मालेगावकडे मार्गस्थ होतील.