धुळे : शहराला वळसा घालून जाणाऱ्या सुरत-नागपूर महामार्गाच्या बायपास हायवेवर चितोड गावाजवळ मोठ्या पाईप मोरीचे काम भारतीय राष्ट्रीय राजमागर्ग प्राधिकरण (एनएचएआय) विभागाने युध्द पातळीवर हाती घेतले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यापासून चितोड गावातील नाल्याकाठच्या रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या कामासाठी महामार्गावरची वाहतूक दोन दिवसांसाठी शहरातून वळवली आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्यात मोती नाल्याला आलेल्या पुरामुळे चितोड गावात नाला काठावरील वस्तीमध्ये पाणी शिरले होते. शंभर ते दीडशे घरांमध्ये पाणी शिरुन संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नाल्याला आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या रहिवाशांना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आसरा घ्यावा लागला होता. महामार्ग चाैपदरीकरणाचे काम करणाऱ्या संबंधित विभागाने उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी मोती नाल्यावर बांधलेली तात्पुरती पाईप मोरी सदोष असल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी आंदोलन केले होते. नुकसान भरपाईची मागणी केली होती. पाईप मोरीसाठी लहान आकाराचे पाईप वापरल्याने मोती नाल्याला आलेल्या पाण्याचा पूर्णपणे निचरा होत नाही. शिवाय उड्डाणपुलासाठी केलेल्या मातीच्या भरावामुळे पाणी अडविले जाते. त्यामुळे नाल्यात पाण्याची पातळी वाढून पाणी गावात शिरते, अशी रहिवाशांची तक्रार होती. गावातील ज्येष्ठ नेते गाैतम गायकवाड यांनी हा प्रश्न लावून धरला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या आदेशाने प्रांत अधिकारी भीमराज दराडे यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी येऊन पाहणी केली होती. कामात सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.
दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा हा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी एनएचएआयने पाईप मोरीचे काम हाती घेतले आहे. मोठ्या आकाराचे सहा पाईप टाकले जाणार आहेत. त्यामुळे नाल्याला आलेल्या पाण्याचा निचरा होईल. गुरुवारी दुपारी हे काम हाती घेतले. दोन दिवसात काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
पाईपमोरीचे काम सुरू करण्यापूर्वी गुरुवारी सकाळपासून वळण रस्त्यावरील वाहतूक बंद करून वाहनांचा मार्ग शहरातून वळविण्यात आला होता. साक्रीकडून येणारी वाहने साक्री रोडने थेट शहरात येत होती तर मुंबई-आग्रा महामार्गावरून साक्रीकडे जाणाऱ्या वाहनांना स्टेशन रोडने वळविण्यात आले होते. त्यामुळे शहरातील साक्री रोड, स्टेशन रोड, शासकीय दूध डेअरी रोड आणि चितोड रोडवर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याची बाब लक्षात घेता शहर वाहतूक पोलिसांची वाहने रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी ध्वनिक्षेपकावरून वेळोवेळी सूचना देत होती.
दोन दिवसात काम पूर्ण करण्याचे नियोजन
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने दोन दिवसात काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे वळण रस्त्याची वाहतूक दोन दिवस बंदच राहिले. अवजड वाहनांची वर्दळ शहरातून वाढेल. असे असले तरी एका दिवसात काम पूर्ण करण्याचे प्रयत्न या विभागाकडून केले जात आहेत. असे झाले तर शुक्रवारी महामार्गावरील वाहतूक सुरळीत होईल.