लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : येथील २१ कोटी खर्चाच्या मंजूर झालेल्या पाणी योजनेचे काम निकृष्ठ होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते सुनील चौधरी आणि गटनेते प्रा.सुरेश देसले यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केला. या कामाची चौकशी झालीच पाहिजे. शिवाय निकृष्ट काम पूर्णपणे पाडून त्याजागी नवीन काम झाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.याबाबत नगरपंचायतचे कार्यकारी मुख्याधिकारी अजित निकत व जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.बहुचर्चित योजनाशिंदखेडा शहरासाठी बहुचर्चित अशी २१ कोटी रुपये खर्चाची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे काम ठेकेदारामार्फत सुरू झाले आहे. तापी नदीवरील सुकवद पुलाजवळ असलेल्या बॅरेजमधून शहराला पाणीपुरवठा करणे, असे या योजनेचे उद्दिष्ट आहे.या योजनेअंतर्गत शहरातील पाईपलाईनचे काम सुरू आहे. तसेच सुकवद येथे नदीकाठी पाण्याची इंटेक विहीर होत आहे. मात्र, या विहिरीचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत आहे. हाताने जरी कोरले तरी या विहिरीच्या कठड्याचे काँक्रीट सहज निघून येत असल्याचे सांगून विरोधी नगरसेवकांसह सुनील चौधरी आणि प्रा.सुरेश देसले यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. ही योजना शहरवासीयांसाठी अतिशय महत्त्वाची आहे.गेल्या तीस वषार्पासून शहराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत सर्वांच्या अथक प्रयत्नाने मिळालेली ही योजना गावासाठी वरदान ठरणार आहे. मात्र, या योजनेचे काम निकृष्ठ होत असल्याचे चित्र आहे. आमचा कोणत्याही विकास कामांना विरोध नाही मात्र, जी कामे होत आहे आणि होणार आहेत, ती चांगल्या दर्जाची झाली पाहिजे, अशी भूमिका आहे. आता या योजनेचे काम निकृष्ठ झाले आणि ही योजना भविष्यकाळात निकामी झाली तर जनता कुणालाही माफ करणार नाही. हे काम चांगल्या दर्जाचे व्हावे, याकडे सत्ताधाºयांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मात्र, सत्ताधारी या कामाच्या दर्जाकडे काहीही लक्ष देत नसल्याचा आरोपही प्रा.देसले यांनी केला. तसेच याबाबत जिल्हाधिकाºयांकडे निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कामाची क्वॉलिटी कंट्रोलद्वारे चौकशी व्हावी आणि असे निकृष्ठ दर्जाचे काम काढून त्याजागी नवीन चांगल्या दर्जाचे काम झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.यावेळी विरोधी पक्ष नेता सुनील चौधरी, नगरसेवक उदय देसले, दीपक अहिरे, चंद्रकांत सोनवणे, ईद्रीस कुरेशी ,चंद्रकांत थोरात, किरण थोरात, आदी विरोधी गटाचे नगरसेवक उपस्थित होते.
पाणी योजनेचे काम निकृष्ठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 10:03 PM