लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : खान्देशात वरुणराजाने गेल्या १२ दिवसांपासून दडी मारल्याने नंदुरबारच्या काही भागात, धुळे व जळगाव जिल्ह्यात चिंतेची स्थिती आहे. नंदुरबार जिल्ह्यात ६२़२९ टक्के असा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतशिवारात शेतीकामे वेगात सुरू आहेत़ गेल्या दोन दिवसांपासून ठिकठिकाणी श्रावणसरी बरसणे सुरू असल्याने त्याचा लाभ कोरड क्षेत्रातील शेतीला होणार आहे़ धुळे जिल्ह्यात सद्य:स्थितीत पिकांची परिस्थिती बरी असली तरी येत्या दोन-चार दिवसात पाऊस न झाल्यास हंगामच वाया जाण्याची भीती आहे. जिल्ह्यात पावसाने दुसºयांदा प्रदीर्घ दडी मारली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या १२ दिवसात पावसाने हजेरी न लावल्याने उडीद, मूग, मका, कपाशी व सोयाबीन या पिकांवर मोठा परिणाम होऊन उत्पादनदेखील घटण्याचा अंदाज आहे.जळगाव जिल्ह्यात अद्याप नदी, नाले वाहून निघतील असा दमदार पाऊस झालेला नाही. उडीद, सोयाबीन या पिकांना फुलोरा आला आहे. तसेच शेंगा भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. या काळात पिकांना पावसाची अंत्यत गरज आहे. पावसाने पाठ फिरविल्यास उत्पादनावर २० ते २५ टक्के घट होण्याचा अंदाज जिल्हा कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. तसेच हलक्या व मध्यम जमिनीवरील कोरडवाहू कापसाला व मक्यालादेखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.भुसावळ विभागातही पिकांची परिस्थिती फारसी काही चांगली नाही़ गिरणा परिसरातील पिकाची स्थिती चिंताजनक झाली आहे. ज्वारी, बाजरी, ऐन वाढीत असताना तसेच कपाशी फुलोरा ते कैºया लागण्याच्या अवस्थेत असताना पावसाने दडी मारल्याने शेतकरी हादरला आहे. चाळीसगाव तालुक्यात यंदा गेल्या वर्षीपेक्षा ३ हजार हेक्टर जादा पेरण्या झाल्या.पाचोरा तालुक्यात खरिपाच्या पेरण्या १०० टक्के झाल्या आहेत. भडगाव तालुक्यात गतवर्षीइतकाच पीकपेरा झाला. चाळीसगाव तालुक्यात यंदा (३४ टक्के) गतवर्षीच्या निम्मेच (७० टक्के) पाऊस झाला आहे. पाचोरा तालुक्यातही २६५.१ मि.मी. पाऊस झाला असून गेल्या वर्षी या तारखेपर्यंत ३६३.८५ मि.मी. पाऊस झाला होता. भडगाव तालुक्यात ३५०.७५ मि.मी.च्या तुलनेत यंदा २०५.७५ मि.मी. इतकाच पाऊस झाला आहे.अमळनेर तालुक्यात ९८ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. पाऊस लांबल्याने, उडीद, मूग या कडधान्याचे जवळपास ५० टक्के नुकसान झालेले आहे. पारोळा तालुक्यात पावसाअभावी कडधान्य पिकांचे जवळपास ६० टक्के नुकसान झालेले आहे. चोपडा तालुक्यात पावसाअभावी सर्व पिकांची वाढ खुंटलेली आहे. त्यात मूग आणि उडीद ही पिके जवळपास येणारच नाही, अशी शक्यता गृहीत धरली जात आहे.पावसाने ओढ दिल्याने, रस शोषक किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढलेला आहे़धुळ्यात वाढ खुंटलीधुळे जिल्ह्यात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. धुळे व शिंदखेड्यात गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे दिसत असले तरी त्यात मोठा खंड पडल्याने पिके धोक्यात आली आहेत तर शिरपूर तालुक्यात पावसाचे प्रमाण गेल्या वर्षी एवढेच आहे. साक्री तालुक्यात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाची स्थिती बरीच चांगली आहे. जून महिन्यात लागवडीनंतर पावसाने पिकांच्या वाढीच्या टप्प्यात तब्बल तीन आठवडे दडी मारली. त्यामुळे उडीद, मूग या कडधान्यासह सोयाबीन व मका या पिकांना फटका बसला होता. दुबार पेरणीची भीती व्यक्त होत असतानाच १३ जुलैनंतर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. सात-आठ दिवस रिमझिम व तुरळक पाऊस झाला. यामुळे पिकांना तात्पुरते जीवदान मिळून दुबार पेरणीचे संकटही टळले होते. परंतु त्यानंतर पुन्हा पावसाने डोळे वटारले.जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, मुक्ताईनगर, जामनेर या तालुक्यांमध्ये कमी पर्जन्यमान असतानाही पिकांची स्थिती चांगली आहे. पावसाने अजून काही दिवस पाठ फिरविल्यास मात्र चिंता वाढणार आहे. पाऊस न झाल्यास कडधान्याच्या उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. -अनिल भोकरे, कृषी उपसंचालक, कृषी विभाग, जळगाव़