पिंपळनेर : येथील भोईगल्लीतील एका वयस्कर किराणा दुकानदारास भूरळ घालून एका अज्ञात तरुणाने अंगठी व सोन्याची चेन लंपास पोबारा केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.शुक्रवारी बाजाराचा दिवस असल्याने सकाळी लवकर दुकानात पोहचलेल्या श्रीराम माधव दशपुते यांच्याकडे अज्ञात तरुण आला. मी सोन्याचा व्यापारी आहे, दान करायचे होते पण सोनंच नाही आणले. म्हणून त्या तरुणाने खिशातून १ हजार २०० रुपये काढून काऊंटरवर ठेवले. तरुणाने त्यांना हे पैसे मंदिरात दान करुन द्या, असे सांगत या पैशावर सोन्याची वस्तू स्पर्श करुन ठेवा म्हणून दशपुते यांनी अंगठी काढून नोटांवर ठेवली असता जोड ठेवा लागू होणार नाही म्हणून गळ्यातील सोन्याची चेन काढून ठेवली. त्या नोटांमधून एक नोट काढून पुडी बांधली. व प्लॅस्टीक बॅगेत टाकण्याचे नाटक करीत केवळ झेंडुची फुले व बिस्किट पुडा बॅगेत ठेवून गाठ मारली. हातचलाखीने नोटा व सोन्याच्या वस्तू गायब केल्या. तरुणाने बॅग किराणा दुकानदाराकडे देत ही बॅग मंदिरात दान करा, असा बहाणा करीत तिथून पोबारा केला. शंका येताच प्लॅस्टीकची बॅग उघडून बघितली असता त्यात अंगठी व चेन गायब झाल्याचे दिसले. मात्र तोपर्यंत तरुण भामटा दुचाकीने गायब झाला होता़ लंपास झालेला ऐवज अंदाजे तीन तोळे वजनाचा असल्याचे सांगण्यात आले. काहीतरी सांगून सहज बोटातली अंगठी व गळ्यात असलेली सोन्याची चेन काढून नेऊन लंपास झाले. भरदिवसा असा फसवणुकीचा प्रकार घडल्याने सखेद आश्चर्य व संतापही व्यक्त केला जात आहे.
भुरळ घालून दागिने केले लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 10:58 PM