लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : इतरांपेक्षा काही तरी हटके करण्याच्या नादात हल्लीचे तरुण, तरुणी असतात. याची प्रचिती एकवीरादेवी यात्रोत्सवात गेल्यानंतर हमखास येते. यात्रेत येणारे अनेक तरुण मंडळी हे त्यांच्या हातावर, तर कोणी मानेवर तर काही संपूर्ण हातभर नानाविध प्रकाराचे टॅट्यू गोंदून घेत आहेत. तर लहान मुली किंवा तरुणी या त्यांच्या हातावर आकर्षक अशा मेहंदी काढून घेतानाचे चित्र यात्रोत्सवात दिसून येत आहे. दरम्यान, यात्रोत्सवात संसारपयोगी वस्तूंच्या विक्रीत वाढ झाली असून यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. खान्देश कुलस्वामिनी एकवीरादेवी यात्रोत्सवात दरवर्षी गोंदून देणारे किंवा हातावर मेहंदी काढणारे व्यावसायिक येत असतात. यंदा त्यांची संख्या कमी दिसत असली तरी जे व्यावसायिक यात्रेत दाखल झाले आहेत. त्यांच्या दुकानावर भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. अगदी गोंदून देण्याचे किंवा महेंदी काढून देण्याचे हे व्यावसायिक १० ते ५० रुपये आकारणी भाविकांकडे करत आहे.
५०० हून अधिक गोंदून देण्याचे प्रकार यात्रोत्सवात मुंबई येथील कोमलभाऊ ठाकरे हे गोंदून देणारे व्यावसायिक दाखल झाले आहेत. त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, की येथील यात्रोत्सवात गेल्या २५ ते ३० वर्षापासून ते येत आहेत. त्यांच्याकडे ५०० हून अधिक गोंदून देण्याचे प्रकार उपलब्ध आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या स्टॉलवर एक फलकच करून ठेवला आहे. तरुण मंडळी तो फलक पाहून त्यांना हवी असलेली डिजाईन कोमलभाऊ यांना सांगितल्यानंतर ते तशीच्या तशी रेखाटून देतात. पूर्वी गोंदून देण्याची पद्धत एकच होती. परंतु, आता कोणाला आकर्षक डिझाईन व कलरमध्ये गोंदून देण्याची मागणी केली तर ते गोंदून देत असल्याचे सांगतात. दरवर्षी कोमलभाऊ हे धुळ्यातील यात्रोत्सव आटोपल्यानंतर अमळनेर येथील यात्रोत्सवासाठी जात असतात. लहानपणापासूनच त्यांनी ही कला अवगत केल्याचे त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले आहे.