देवेंद्र पाठक, धुळे : ऊसतोडसाठी मजूर पुरविण्याचे आमिष दाखवून तरुण शेतकऱ्याची ७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना धुळे तालुक्यातील कुसुंबा गावात घडली. फसववणुकीचा हा प्रकार २५ सप्टेंबर २०२३ ते आजपावेतो घडला. तगादा करूनही मजूर दिले नाहीत आणि पैसेही परत केले नाहीत. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात संशयित १६ जणांविरोधात सोमवारी गुन्हा नोंद झाला.
यासंदर्भात कुणाल किरण शिंदे (वय २७, रा. कुसुंबा, ता. धुळे) या तरुणाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, ऊसतोडणीसाठी मजुरांची आवश्यकता असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन उषालाल पिंग्या चव्हाण (वय ३९, रा. हेंकळवाडी - सडगाव, ता. धुळे) याने ऊसतोडीचे मजूर पुरविण्याचा मुकादम असल्याची ओळख करून दिली. त्यानंतर इतर संशयितांसोबत संगनमत करून कट रचला. मजुरीसाठी सुरुवातीला धनादेश आणि रोखीने ६ लाख रुपये घेतले. त्यानंतर करारनामा लिहून जैतोबाच्या यात्रेसाठी दीड लाख रुपये असे एकूण ७ लाख ५० हजार रुपये घेतले. प्रत्यक्षात मजूर पाठविले नाहीत आणि विश्वासघात केला. मजूर देण्याचा वारंवार तगादा केला जात होता. मात्र, मजूर पाठविण्याचे केेवळ आमिष दाखविले जात होते. मजूर शेवटपर्यंत आलेच नाहीत. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच कुणाल शिंदे या शेतकऱ्याने धुळे तालुका पोलिस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. त्यानुसार, उषालाल पिंग्या चव्हाण या संशयितासह १६ जणांविरोधात भादंवि कलम ४०९, ४०६, ४२०, १२० ब, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक धनवटे करीत आहेत.