धुळे- शहरातील नकाणे तलावात बुडून एका २१ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना २९ मे राेजी घडली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आदिल अहमद मसुद अहमद अन्सारी (वय २१,रा. महादेवपुरा, मक्का मशिदजवळ, धुळे) असे मयत तरूणाचे नाव आहे.आदिल अहमद अन्सारी हा २९ रोजी नकाणे तलाव परिसरात गेलेला होता.
सायंकाळी त्याच्या कुटुंबातील सदस्यांना गल्लीतील लोकांनी आदिलची सायकल दुपारपासून नकाणे तलावाजवळ उभी असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी नकाणे तलावाजवळ धाव घेतली. त्याठिकाणी पाण्याजवळ आदिलची चप्पल आढळून आली. गल्लीतील मुलांनी आदिलचा शोध घेण्यासाठी पाण्यात उडी मारली असता, तो पाण्यात बुडालेला दिसून आला. त्यास पाण्याबाहेर काढून खासगी वाहनाने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता, तेथील डॅा. चेतना यांनी त्यास तपासून मयत घोषित केले.
याप्रकरणी धुळे तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. तपास असई आर.यू. मोरे करीत आहे. दरम्यान आदिलचा बुडून मृत्यू झाला की त्याने आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.