धुळे : भरधाव वेगाने जात असताना पुढे जात असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक देण्यात आली. यात ट्रकमध्ये बसलेला सचिन वानखेडे (वय २२) याला गंभीर दुखापत झाल्याने उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला. ही घटना धुळे तालुक्यातील नेर शिवारात शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. धुळे तालुका पोलिसात शनिवारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
एमएच २० ईजी ९७९४ क्रमांकाचा ट्रक हा नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळ्याकडून सुरतकडे मिरची घेऊन भरधाव वेगाने जात होता. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास वेगावरील नियंत्रण सुटल्याने पुढे जात असलेल्या अज्ञात ट्रकला पाठीमागून जोरदार धडक देण्यात आली. या अपघातात ट्रकचा पुढील भागाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. या ट्रकमध्ये बसून प्रवास करत असलेला सचिन रामभाऊ वानखेडे (वय २२, रा. चिंचोली ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) या तरुणाला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
डोक्याला मुकताक रज्जाक शेख (वय ३४, रा. चिंचोली ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, अफसर भिकन शेख (वय ३०, रा. चिंचोली ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्या विरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ कांबळे घटनेचा तपास करीत आहेत.