बळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे येथे कुलदैवत कानुबाई मातेच्या यात्रोत्सवाला ८ रोजी प्रारंभ होणार आहे. येथे मानाचा नैवेद्य दाखवून यात्रेस सुरुवात होते. यावेळी नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर उत्सव समितीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.येथे कानुबाई मातेचे प्राचीन काळातील हेमाडपंथी मंदिर आहे. कानुबाई मातेच्या यात्रोत्सवादरम्यान, नवसपूर्तीकरीता येथे बळसाणेसह खान्देशातून भाविक येतात. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात तरुणांमार्फत स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कानुमातेच्या दोन दिवसीय यात्रोत्सवाला बुधवारी नागरिकांकडून मानाचा नैवेद्य दाखवून प्रारंभ होणार असल्याचे यात्रा समितीने सांगितले.यात्रेनिमित्त नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेले कुटुंब आखाजी सण व कानुबाईच्या यात्रोत्सवाकरिता गावी परतत असतात. यामुळे गावात चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे.बळसाणे ग्रामपंचायतीमार्फत पाण्याची व विजेची सोय करण्यात येणार आहे. यात्रोत्सव काळात वीजपुरवठा खंडीत होऊ नये, यासाठी सरपंच दरबारसिंग गिरासे यांनी संबंधितांना सूचना दिल्या आहेत.येथील कानुबाई मातेची यात्रा खान्देशात प्रसिद्ध असल्याने दूरदूरवरुन विविध व्यावसायिक येथे दाखल होत आहेत. या व्यावसायिकांना जागा वाटप करण्यात आली असून स्टॉल उभारणीचे काम पूर्णत्वाकडे आहे. यात पुजेचे साहित्य, नारळ विक्रेते, खाद्य पदार्थाचे स्टॉल, मनोरंनासाठी पाळणे, खेळण्याची दुकाने, कटलरी, रसवंती, थंडपेय, यासह संसारोपयोगी साहित्याची दुकाने व्यावसायिक थाटत आहेत.बुधवारी सायंकाळी विठ्ठल मंदिराच्या मुख्य चौकातून वाजतगाजत गुलालाची उधळण करीत मोठ्या उत्साहात तगतरावाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. तगतरावाची मिरवणूक संपल्यावर लोकनाट्य मंडळाची हजेरी होईल व रात्री ग्रामस्थांच्या करमणुकीसाठी यात्रा समितीने शांताराम चव्हाण यांचा लोकनाट्य कार्यक्रम आयोजित केला आहे.यात्रेच्या दुसऱ्या दिवशीही आयोजकांनी लोकनाट्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान ९ मे रोजी यात्रोत्सवानिमित्त सकाळी कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. या कुस्ती स्पर्धेत दूरदूरवरुन मल्ल सहभागी होतात.
कानुमातेचा उद्यापासून यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 10:05 PM