भारतीय जंगलाचा राजा आणि इथल्या अन्नसाखळीच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान असणारा पट्टेरी वाघ, वाढत्या शिकारीमुळे आपल्या देशातून आणखी काही वर्षांनी नामशेष होणार की काय? अशा स्थितीला पोहोचलेला आहे. आपल्या देशाचे राष्ट्रीय मानचिन्ह ठरलेला हा राष्ट्रीय प्राणी, आज त्याचा नैसर्गिक अधिवास दिवसेंदिवस दुर्बल होत असल्याने लोकवस्तीच्या आसपास अन्न-पाण्यासाठी येऊ लागला आहे. काही वेळा मानव-वाघ यांच्यातल्या संघर्षात जखमी झालेला वाघ नरभक्षक झाल्यावर गोळी घालून ठार केला जातो. एकेकाळी आपल्या जंगलात वाघासाठी आवश्यक मृगकुळातल्या जनावरांची संख्या लक्षणीय असल्याने मानव-वाघ यांच्यातला संघर्ष विकोपाला पोहोचल्याची उदाहरणे अल्प प्रमाणात होती; परंतु आज एका बाजूला दुर्बल होत चाललेला वाघांचा नैसर्गिक अधिवास आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याच्या कातडी, नखे, दात, रक्त, मांस आदि अवशेषांना असलेली वाढती मागणी यामुळे वाघाच्या शिकारीत गुंतलेल्या टोळ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने २०१६ची जी आकडेवारी जाहीर केलेली आहे त्यानुसार ११७ वाघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यात ९५ वाघांचा मृत्यू तर २२ वाघांची कातडी जप्त करण्यात आली. त्यानुसार ११७ वाघ मरण पावल्याचे स्पष्ट झालेले असून, २०१५च्या तुलनेत ही संख्या २०१६ साली २४ टक्के जादा झालेली आहे.२०१६ साली सर्वाधिक वाघांचा मृत्यू मध्य प्रदेशात झालेला आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१६ या तीन महिन्यांच्या कालखंडात सात वाघांच्या मृत्यूची नोंद झालेली असून, त्यामुळे वाघांची संख्या २९ झालेली आहे. सातना-अलाहाबाद रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या रेल्वेची गती वन्यजीवांच्या मृत्यूंना नियंत्रित करण्यासाठी कमी करावी, अशी सूचना वन खात्याने रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांना केली होती. पन्ना व्याघ्र राखीव क्षेत्रापासून सातना-अलाहाबाद रेल्वेमार्गाच्या ८० कि.मी. अंतरावर एका वाघाचा करुण अंत झाला. मध्य प्रदेशाच्या बालाघाट जिल्ह्याच्या परिसरात सातवर्षीय नर वाघाचा सांगाडा-काटांगी येथे आढळला. त्याचे पंजे आणि कातडी गायब करण्यात आल्याचे उघडकीस आलेले आहे. बांधवगड व्याघ्र राखीव क्षेत्रात विजेच्या धक्का तंत्राच्या उपयोगाने आणखी एका सातवर्षीय नर वाघाला मारण्यात आल्याचे स्पष्ट झालेले आहे. कान्हा व्याघ्र राखीव क्षेत्रात आणखी दोन नर वाघांचे सांगाडे आढळलेले आहेत. पेंच व्याघ्र राखीव क्षेत्रात एकवर्षीय मादी अन्नाअभावी मृत्यू पावल्याचे स्पष्ट झालेले आहे. संपूर्ण देशभर पट्टेरी वाघांसाठी ख्यात असलेल्या आणि वाघ पाहण्यासाठी या राज्यातल्या व्याघ्र राखीव क्षेत्रांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय असताना येथे वाघांच्या करुण मृत्यूंना नियंत्रित करण्यात वन खात्याने यश मिळविलेले नाही. मध्य प्रदेशानंतर कर्नाटकात १७, महाराष्ट्रात १५ आणि तामिळनाडूत ७ वाघांचा मृत्यू झालेला आहे. आसाम, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, अरुणाचल प्रदेश, नागालॅँड आणि केरळमध्ये पट्टेरी वाघाच्या मृत्यूची प्रकरणे उद्भवलेली आहेत. वाघा-वाघांतली भांडणे, विजेच्या धक्कातंत्राने, पाण्यात बुडून, अपघात, विषबाधेने, नैसर्गिकरीत्या त्याचप्रमाणे शिकारीमुळेही वाघांचे मृत्यू उद्भवलेले आहेत. २०१६ साली वाघांची जी २२ कातडी जप्त करण्यात आली त्यात उत्तराखंड राज्यातून सहा कातडी जप्त केली होती. मध्य प्रदेशात वन खात्याने वन्यजीवांची शिकार करण्याच्या प्रकरणात गुंतलेल्या ३९ जणांना अटक करण्यात यश मिळवले. त्यावरून इथे वन्य जीवांच्या अस्तित्वाची लढाई शिकाऱ्यांमुळे किती तीव्र झालेली आहे ते स्पष्ट झालेले आहे. पेंच आणि बांधवगड येथील व्याघ्र राखीव क्षेत्रात अनुक्रमे ८ आणि २ वाघांचे जे मृत्यू झाले, त्याला या परिसरात व्याघ्रसफरी सुरळीत व्हावी यासाठी वन खात्यामार्फत घालण्यात आलेली कुंपणेही कारणीभूत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.आपल्या शेजारी असलेल्या महाराष्ट्रात दरवर्षी वाघांच्या मृत्यूच्या प्रमाणात होणारी वाढ चर्चेत असतानाच २०१० ते आॅगस्ट २०१६ पर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागात ४१४ बिबटे मृत्यू पावल्याचे उघडकीस आलेले आहे. गोव्यासारख्या राज्यात एका म्हादई अभयारण्यात पाच पट्टेरी वाघांचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झालेले आहे; परंतु असे असताना आपल्या सरकारने त्यांच्या नैसर्गिक अधिवासाबरोबर तृणहारी वन्यजीवांची संख्या लक्षणीय राहील या दृष्टीने कोणतीच ठोस उपाययोजना आखलेली नाही. विशेष व्याघ्र संवर्धनदलाची स्थापना सोडा; परंतु आवश्यक ज्ञान असलेले मनुष्यबळ पुरविण्यातही हेळसांड करण्यात आलेली आहे. वन्यजीवांची शिकार करणाऱ्या टोळ्या आजही गोव्यात आहेत. त्यात सरकारी यंत्रणेत काम करणारेच नव्हे तर वन खात्यातल्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे बऱ्याचदा स्पष्ट झालेले आहे. देशभर वाघाच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी सरकार आणि समाज यांनी डोळसपणे दूरगामी उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे. अन्यथा २०१६ सारखाच वाघाच्या मृत्यूचा आलेख वाढत जाऊन, पट्टेरी वाघांचे अस्तित्वच संकटग्रस्त होईल. - राजेंद्र पां. केरकर(लेखक गोवा येथील पर्यावरण कार्यकर्ते आहेत.)
२०१६ मध्ये भारतात ११७ वाघांचा मृत्यू
By admin | Published: March 13, 2017 11:39 PM