शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
2
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
3
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
4
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
5
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
6
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
7
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
8
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
9
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
11
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
13
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
14
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
15
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
16
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
17
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
18
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
19
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
20
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....

संपादकीय - १९८० : इतिहास घडवणाऱ्यांची कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 8:44 AM

लोकमत वृत्तसमूहाचे संस्थापक जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांचा आज ९८ वा जन्मदिन. बाबूजींच्या राजकीय जीवनातील एका विलक्षण घटनेचा धांडोळा....

ठळक मुद्देजनता पक्षाची राजवट म्हणजे काटेरी कुंपण. या काटेरी कुंपणात फसलेल्या सामान्य माणसाला इंदिराजींचा हातच बाहेर काढू शकतो, असे ते चित्र होते. त्या बैठकीत हे चित्र सादर करून बाबूजींनी त्याचा तपशील सांगितला.

मधुकर भावे

२८ जुलै १९७९ या दिवशी जनता सरकार कोसळले. चरणसिंग यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. ते लोकसभेला सामोरेच गेले नाहीत. इंदिरा काँग्रेसच्या पाठिंब्यावर त्यांनी सरकार बनवले होते. पण, सरकार बनल्यानंतर ताबडतोब श्रीमती इंदिरा गांधी यांनी चरणसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे सरकार अल्पमतात गेले आणि कोसळले. काळजीवाहू सरकार म्हणून राष्ट्रपतींनी चरणसिंग यांना काम पाहण्यास सांगितले. सरकार कोसळल्यानंतर  इंदिरा गांधी मुंबईला आल्या होत्या. एका भरगच्च पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारला गेला, ‘आपने चरणसिंगजी को समर्थन दिया था, बाद में समर्थन वापस लिया. इसकी क्या वजह है?’ इंदिराजी ताडकन म्हणाल्या, ‘काँग्रेस ने चरणसिंगजी को सरकार बनानेके लिए समर्थन दिया था, चलानेके लिए नहीं.’ इंदिराजींचे ते उत्तर खूप गाजले होते. 

मुंबईचा दौरा आटोपून इंदिराजी दिल्लीला गेल्या; कारण लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर नवीन आखणी करणे गरजेचे होते. लोक आपल्याबरोबर आहेत याची त्यांना खात्री पटली होती. या प्रचितीची सुरुवात झाली नागपूरपासून आणि त्यातही बाबूजी (जवाहरलाल दर्डा) यांच्या घरी झालेल्या भेटीतून! या भेटीनंतर इंदिराजी पवनारला निघाल्या (३१ ऑगस्ट १९७७) त्यांच्या स्वागतासाठी  पवनारपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा  प्रचंड गर्दी होती.  इंदिराजी पुन्हा सत्तेवर येणार याची खात्री पटवणारी ही गर्दी होती. पवनारचा दौरा आटोपून इंदिराजी पुन्हा दिल्लीला गेल्या. मध्ये दीड वर्ष गेले, इंदिराजींची बदनामी चालूच होती. दरम्यान, चरणसिंग सरकारला पाठिंबा देऊन इंदिराजींनी मोठी राजकीय चाल खेळली. ते सरकार कोसळणारच होते, तसे कोसळले. ताबडतोब लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवायला इंदिराजींनी सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून काही राज्यांतील अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांना त्यांनी दिल्लीला बोलावून घेतले. १५ ऑक्टोबर १९७९ या दिवशी प्रचाराची दिशा ठरविण्याकरिता इंदिराजींनी दिल्लीमध्ये महत्त्वाची राजकीय बैठक बोलावली. या बैठकीला त्या वेळचे खासदार वसंत साठे, सी.एम. स्टीफन, राज्यसभेचे खासदार बॅ. ए.आर. अंतुले, कर्नाटकचे गुंडु राव, राजस्थानचे त्या वेळचे मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडीया आणि विदर्भातून जवाहरलाल दर्डा उपस्थित होते. प्रत्येकाने बैठकीत आपापले सादरीकरण करावे, असे सर्वांना आधीच सांगण्यात आले होते. इंदिराजी त्या वेळी १२ विलिग्डंन क्रेसंट रोड येथे राहत असत. बैठक दुपारी ३ वाजता सुरू झाली. या बैठकीत ज्याला ‘सादरीकरण’ म्हणता येईल असे फक्त बाबूजींनी एका चित्रासह  स्पष्ट केले.

जनता पक्षाची राजवट म्हणजे काटेरी कुंपण. या काटेरी कुंपणात फसलेल्या सामान्य माणसाला इंदिराजींचा हातच बाहेर काढू शकतो, असे ते चित्र होते. त्या बैठकीत हे चित्र सादर करून बाबूजींनी त्याचा तपशील सांगितला. इंदिराजी म्हणाल्या, “बिलकुल सही है!” देशातील सर्व भाषेत या चित्राचा अर्थ सांगून ती पोस्टर्स लावावीत, असा निर्णय त्या बैठकीत झाला. इंदिराजींच्या सूचनेनुसार देशातील सगळ्या प्रांतात २० डिसेंबर १९७९ ते ७ जानेवारी १९८० च्या निवडणुकीपर्यंत हीच पोस्टर्स झळकली होती. या निवडणुकीत इंदिराजींना बहुमत मिळाले. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा काँग्रेसने जिंकल्या.  निवडणुकीपूर्वी जांबुवंतराव धोटे काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि नागपूरची जागा त्यांनी जिंकली. रामटेकहून जतिराम बर्वे, भंडाऱ्याहून केशवराव पारधी, चंद्रपूरहून शांताराम पोटदुखे, चिमुरहून विलास मुत्तेमवार, अमरावतीहून उषाताई चौधरी, अकोल्याहून मधुसूदन वैराळे, बुलडाण्याहून बाळकृष्ण वासनिक, यवतमाळहून सदाशिवराव ठाकरे असे सर्वच्या सर्व काँग्रेस उमेदवार विदर्भातून विजयी झाले. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातूनही काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी झाले. 

महाराष्ट्रात ४८ पैकी ४७ जागा त्या निवडणुकीत काँग्रेसने जिंकल्या होत्या. १४ जानेवारी १९८० रोजी इंदिराजी  पुन्हा पंतप्रधान झाल्या आणि विशेष म्हणजे त्याच रात्री ‘लोकमत’च्या वतीने आयोजित केलेल्या सुरुची भोजन समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या. त्याच दिवशी त्यांनी ‘लोकमत’ला खास मुलाखतही दिली होती. या सर्व राजकीय लढाईत बाबूजींची भूमिका फार मोठी होती. विदर्भातल्या यशाचे महानायक बाबूजीच होते आणि इंदिराजींचे विश्वासू सहकारीसुद्धा.  देशभर गाजलेल्या त्या राजकीय  पोस्टरचे निर्मातेही बाबूजीच होते. याच निवडणूक प्रचारात मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या काँग्रेसच्या जाहीर सभेत इंदिराजी म्हणाल्या होत्या, ‘विदर्भ में मैं लोकमत के हथियार से लड़ रही हूँ।’ या यशाचे पडद्यामागचे सूत्रधार असलेल्या बाबूजींनी केलेल्या कामाची कधी जाहिरात केली नाही. मात्र आता पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. पुढच्या वर्षी, २ जुलै २०२२ रोजी, बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात होत असताना, इतिहास घडविणाऱ्यांची आणि लढवणाऱ्यांची नवीन पिढीला माहिती व्हावी, याच भावनेने हे लिहिले आहे. कारण या सर्व घटनांचा मी साक्षीदार आहे.

(लेखक लोकमतचे निवृत्त संपादक आहेत)

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाcongressकाँग्रेसIndira Gandhiइंदिरा गांधी