बुजवा विहिरी व बारवा; करा उत्सव... द्या अपघातांना निमंत्रण!

By Shrimant Mane | Published: April 1, 2023 07:55 AM2023-04-01T07:55:16+5:302023-04-01T07:55:25+5:30

तुमच्या पायाखाली कदाचित पन्नास फूट खोल विहीर असेल आणि ते तुम्हाला माहितीही नसेल! इंदूरच्या अपघाताने हे जुने जलवैभव समोर आले आहे.

36 people were killed Thursday after falling into a stepwell at indore | बुजवा विहिरी व बारवा; करा उत्सव... द्या अपघातांना निमंत्रण!

बुजवा विहिरी व बारवा; करा उत्सव... द्या अपघातांना निमंत्रण!

googlenewsNext

- श्रीमंत माने

मध्यप्रदेशातील इंदूरच्या बेलेश्वर महादेव मंदिरात आपण जिला बावडी अथवा बारव म्हणतो ती पायऱ्यांची विहीर झाकण्यासाठी टाकलेले प्लास्टरचे छत माणसांचे ओझे असह्य होऊन कोसळले. रामनवमीच्या दिवशी श्रद्धाभावाने परमेश्वराच्या दर्शनाला आलेले, होमहवन करणारे भाविक खाली खोल विहिरीत कोसळले. शुक्रवारी सकाळपर्यंत छत्तीस मृतदेह बाहेर काढले गेले. रामनवमीच्या उत्सवावर शोककळा पसरली. पुढे आलेल्या माहितीनुसार, पटेलनगर, स्नेहनगर नावाच्या वस्त्या उभ्या राहण्याआधी शेतात असलेली ऐंशी-शंभर वर्षे जुनी बावडी झाकून त्यावर ४०-४५ वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले गेले. उत्सव सुरू झाले. वर्षानुवर्षे मंदिरात जाणाऱ्यांनाही कल्पना नसायची की, जिथे उभे आहोत त्याच्या खाली पन्नास फूट खोल बावडी आहे. 

असो; हा अपघातच. दोषी धरायचेच तर मंदिराच्या विश्वस्तांना धरावे लागेल; परंतु या अपघाताने एका ऐतिहासिक संचिताची आजची परवड चव्हाट्यावर आली आहे. देशाच्या विविध भागांत, विशेषत: जिथे भूजलावरच तहान भागवली जायची, संरक्षित ओलित केले जायचे, त्या मध्य, पश्चिम भारतात दोन-पाचशे, हजार वर्षांपूर्वी खोदलेल्या, बांधलेल्या विहिरी, आड, हेळ, बावडी, बारवा, कुंड, पुष्करणी हे आपले वैभव आहे. काळाची गरज भागवितानाच आपल्या पूर्वजांनी मोठ्या परिश्रमाने हे वैभव सजविलेही. आजच्या प्रगत अभियांत्रिकीलाही आश्चर्य वाटावे असा स्थापत्यकलेचा ताे आविष्कार आहे.

अगदी हडप्पा, मोहेंजोदारोपासून शासनकर्ते, राजेरजवाडे, संस्थानिकांनी पुढच्या पिढ्यांच्या हाती सोपविलेला हा समृद्ध वारसा आहे. त्यातूनच जलव्यवस्थापनाची एक इको सिस्टीम भारतातून जगाला दिली गेली. साेबतच जमिनीखालून पाणीपुरवठ्याची इराणमधील कनात व्यवस्थेची प्रतिकृती मोगल साम्राज्यावेळी आपल्याकडे आली. बऱ्हाणपूरचा कुंडी भंडारा, छत्रपती संभाजीनगरची नहर-ए-अंबरी, बिदरची तशीच व्यवस्था ही त्याची उदाहरणे. 

आतापर्यंत आपण समजायचो की, पाण्याची टंचाई असलेल्या राजस्थान, गुजरातमध्येच अशा मोठ्या बांधीव बारवा आहेत. गुजरातमधील पाटनची ‘राणी की वाव’ जगप्रसिद्ध आहे. ‘युनेस्को’ने तिला जागतिक वारसास्थळांमध्ये, तर भारत सरकारने शंभरच्या नोटेवर स्थान दिले. महाराष्ट्रात फारतर साताऱ्याजवळच्या लिंब येथील बारा मोटेची विहीर चर्चेत असायची. अलीकडे कोरोना लॉकडाउनपासून रोहन काळे व मनोज सिनकर हे तरुण पदरमोड करून महाराष्ट्र बारव मोहीम राबवीत आहेत. हजारो किलोमीटर दुचाकीवर फिरून त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात जुन्या विहिरी, बारवा, पुष्करणी शोधल्या.

स्थानिकांना त्यांची स्वच्छता व पुनरुज्जीवनासाठी तयार केले. पुनरुज्जीवन कसले; प्राचीन जलमंदिरांचा जीर्णोद्धारच तो. महाशिवरात्रीला बारवांवर दीपोत्सवाचा उपक्रम साजरा होऊ लागला. गावोगावी तरुण मंडळी पुढे आली. रोहन काळे व इतरांनी अशा तब्बल सतराशेच्या आसपास जलस्रोतांचा इतिहास शोधला. त्यांचे मॅपिंग केले. त्यातून अहमदनगर, परभणीत मोठे काम झाले. सिन्नरला मोठ्या बारवेचा जीर्णोद्धार झाला. नागपूरकर भोसल्यांनी बांधलेल्या बावडींच्या स्वच्छतेचे काही प्रयत्न विदर्भात झाले. तिकडे दुष्काळी माणदेशात गावांमध्ये वाड्यांतल्या विहिरींच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न झाले. काळाच्या ओघात नष्ट झालेला हा ठेवा काही प्रमाणात आजच्या पिढीला आठवला खरे; पण एवढे पुरेसे नाही. 

लहानसहान वस्त्या, छोटी-मोठी गावे, आता फुगलेली शहरे अशा सर्वच ठिकाणी आधी घराच्या अंगणात किंवा परसदारी आठ-दहा हात व्यासाच्या; परंतु खोलवर विहिरी असायच्या. तेच पाणी पिण्यासाठी, इतर कामासाठी वापरले जायचे; पण नळातून येणाऱ्या पाण्याच्या मोहापायी त्या विहिरी जमिनीखाली गाडल्या गेल्या. आताची त्यांची अवस्था कचराकुंड्यांची आहे. गावखेड्यांनीही विहिरींवर मोट, डिझेल इंजिन व विजेवर चालणारे कृषिपंप, त्याला जोडलेल्या जलवाहिन्या, कालव्याचे-पाटाचे पाणी अशा प्रवासात जलवैभव गमावले. 
तहानेने जीव कासावीस झाला की, ते शहरे व खेड्यांना आठवते. वीसेक वर्षांपूर्वी वऱ्हाडात अकोल्यावर अभूतपूर्व जलसंकट आले, रेल्वेने पाणी आणण्याची वेळ ओढवली. तेव्हा जुन्या विहिरींची आठवण झाली, त्या स्वच्छ केल्या गेल्या. तिथे हायड्रंट सुरू करून टँकर भरले गेले. खरेतर ही आठवण अपघाताच्या निमित्तानेच यायला नको. आपत्तीकाळाची व्यवस्था, भविष्याची बेगमी म्हणून जलव्यवस्थापनाच्या वैभवाकडे पाहायला हवे.

Web Title: 36 people were killed Thursday after falling into a stepwell at indore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.