एका मोठ्या कंपनीत एका मोठ्या हुद्दयावर ती काम करीत होती. तिच्याकडे काय नव्हतं? पैसा तर रग्गड होता. घरचीही चांगलीच 'खानदानी' होती. चांगली पोझिशन होती, समाजात मान-सन्मान होता. केवळ तिच्याकडेच नाही, तर तिच्या संपूर्ण कुटुंबाकडेच लोक आदरानं पाहत होते. कारण तिच्या आईवडिलांनी पैसा आणि प्रतिष्ठाही मेहनतीनं कमावली होती.
तिला एक बॉयफ्रेंडही होता. केवळ एकाच गोष्टीची तिला चिंता होती, ती म्हणजे आपला बॉयफ्रेंड खरंच आपल्याशी एकनिष्ठ आहे की नाही? खरंच तो आपल्यावर प्रेम करतो का? आपल्यापेक्षा दुसऱ्याच मुलीवर त्याचं प्रेम आहे, याची तिला दाट शंका होती. याबद्दल जणू काही तिची खात्रीच होती. त्यामुळेच आपल्या बॉयफ्रेंडला कसं वश करायचं, तो आपल्या हातून सुटू नये म्हणून काय करायचं, हाच एक विचार सतत तिच्या डोक्यात घोळत असायचा.
आपला हा मित्र आपल्याला सोडून जाऊ नये यासाठी जे जे म्हणून करता येईल, ते ते सारं ती करत होती. हा मित्र जे म्हणेल ते ऐकणं, त्याच्यासाठी अत्यंत किंमती गिफ्ट्स विकत घेणं, कायम त्याला महागड्या हॉटेलांत नेऊन स्वतःच्या पैशानं खाऊ-पिऊ घालणं, त्याच्या पसंतीचे ब्रॅण्डेड कपडे घेऊन देणं... ज्यामुळे त्याला वश करता येऊ शकेल, अशी एकही गोष्ट तिनं आजवर सोडली नव्हती... पण तरीही तो आपल्यासोबत राहील याची तिला खात्री वाटत नव्हती.
पूर्व चीनमध्ये राहणाऱ्या या तरुणीचं नाव वांग. आपल्या मित्राच्या एकतर्फी प्रेमात ती अक्षरश: सगळं काही विसरली होती. चित्त थाऱ्यावर नव्हतं, काय करावं काही कळत नव्हतं. ती जीवापाड मेहनत घेत होती, आपले सारे प्रयत्न पणाला लावत होती. पण तिला त्यात म्हणावं तसं यश येत नव्हतं.
अशात तिला एक जाहिरात दिसली. ऑनलाइन जाहिरात होती ही. चीनच्याच दोन गुरूंची ही जाहिरात होती. 'ब्लॅक मॅजिक'च्या (काळी जादू) साहाय्यानं तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही मिळवून देऊ शकतो, असा दावा या जाहिरातीत करण्यात आला होता. तुम्हाला पैसा पाहिजे? पैसा घ्या, तुम्हाला यशस्वी व्हायचंय? आमच्या डाव्या हाताचा मळ आहे! तुम्हाला तुमचं प्रेम परत मिळवायचंय? - त्यासारखी दुसरी सोपी गोष्ट तर कोणतीच नाही.!
वांगचे डोळे एकदम चमकले! तिला वाटलं, अरे, हेच तर आपल्याला पाहिजे होतं. तिनं लगेच या दोन्ही गुरूंशी संपर्क साधला. आपल्या मनातली व्यथा त्यांना सांगितली. त्यांनीही तिला दिलासा दिला. 'ब्लॅक मॅजिक' करू, तुझा बॉयफ्रेंड मांजरीसारखा तुझ्या पायात घुटमळेल, असं आश्वासन तिला दिलं. त्यासाठी काही पैसे मात्र खर्च करावे लागणार होते! आपला बॉयफ्रेंड जर कायमचा आपल्याला मिळणार असेल, तर त्यासाठी अर्थातच काहीही करण्याची तिची तयारी होती. गेल्या तीन वर्षांपासून आपल्या बॉयफ्रेंडवर ती आता ब्लॅक मॅजिक करते आहे. दोन्ही गुरूंनाही तिनं आतापर्यंत तब्बल एक कोटी रुपये दिले आहेत. ब्लॅक मॅजिकचं महागडं साहित्य घरातही जमवलं आहे.
बहुराष्ट्रीय कंपनीत ती मोठ्या हुद्दयावर आणि मोठ्या पगारावर असली, हाती चांगला पैसा असला, तरी तो किती दिवस पुरणार? त्यात आता या दोन्ही गुरूंची ठेप ठेवणं आलं, ब्लॅक मॅजिकसाठी कराव्या लागणाऱ्या आर्थिक आणि मानसिक कसरती आल्या, बॉयफ्रेंडवरचा खर्च तर कमी करण्यासारखा नव्हताच....
काय करावं? इतका पैसा कुठून आणावा? तिनं आता ऑफिसमधल्या पैशावरच हात साफ करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या मार्गानी तिनं ऑफिसमधले पैसे लांबवायला सुरुवात केली. आता तिची पैशांची ददात तशी मिटली होती. बॉयफ्रेंडवर तर आता अफाट खर्च होऊ लागला, पण एवढं करूनही ना तिच्या ब्लॅक मॅजिकला फारसं यश आलं, ना तिचा बॉयफ्रेंड तिच्या कह्यात आला!
या काळात तिनं ऑफिसमधल्या किती पैशांवर डल्ला मारावा? गेल्या तीन वर्षांत तिनं तब्बल पाच कोटी रुपयांपेक्षाही अधिक पैसा लांबवला! आणि तिचा बॉयफ्रेंड? तो तर तिला आणि तिच्या 'मेहमाननवाजी'ला कंटाळून कधीचाच फरार झाला आहे!
८० टक्के तरुणाईवर जादूटोण्याचं गारुड!
अति झाल्यावर अर्थातच वांगची चोरी पकडली गेली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचंही तिला काहीच सोयरसुतक नाही. माझ्या प्रेमासाठीच मी हे सारं केलं, असं तिचं म्हणणं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे चीनमध्ये वांग एकमेव नाही. जिच्यावर ब्लॅक मॅजिकन गारुड केलं आहे. नुकताच झालेला एक सर्व्हे सांगतो, चीनमध्ये तीस वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या तब्बल ८० टक्के तरुणांचा जादूटोणा, ब्लॅक मॅजिकवर प्रचंड विश्वास आहे! या संदर्भातले अॅप आणि गुरूंची चीनमध्ये प्रचंड चलती आहे.