श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस
येत्या १ जूनला अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या एसटीला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. कोरोना आणि कामगारांचा संप यामुळे गेली २ वर्षे आर्थिक गर्तेत सापडलेल्या एसटीला ‘पुनश्च हरी ओम’ करण्यासाठी राज्य सरकारचे पाठबळ मिळणे गरजेचे आहे.१. प्रवाशांची विश्वासार्हता कोरोनापूर्वी दररोज सुमारे ६५-७० लाख प्रवाशांची ने-आण करणारी एसटी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची “लोकवाहिनी” बनली होती. सध्या दररोज सुमारे १० लाख प्रवाशांची ने-आण करण्यात येते. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अशा असंख्य घटकांना दळणवळणाचे अंतिम साधन म्हणून एसटीकडे पाहिले जात होते. दुर्दैवाने या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये एसटीचे दर्शन दुर्मिळ झाले. याचे गंभीर चटके सर्वसामान्य जनतेला सोसावे लागले आहेत. एसटीला पर्याय म्हणून सर्वसामान्य माणसाने अवैध वाहतुकीचा आधार घेतला खरा; पण तो दीर्घकालीन उपाय ठरू शकत नाही. या अवैध वाहतुकीने कष्टकरी जनतेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत असुरक्षितेबरोबरच आर्थिक लुबाडणूक केली आहे. आता एसटीला प्रवाशांची विश्वासार्हता कमावणे अत्यंत गरजेचे आहे. प्रवासी वाढवा अभियान, जनता गाडी, हात दाखवा, गाडी थांबवा असे उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे.२. गाड्यांची उपलब्धता महामंडळाकडे सद्यस्थितीला एकूण १६ हजार गाड्या आहेत. त्यापैकी सुमारे ४ हजार गाड्या केव्हाही बंद पडू शकतात अशा अवस्थेत आहेत. गेल्या ३ वर्षांत महामंडळाने एकही नवी कोरी गाडी खरेदी केलेली नाही. अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या तीन हजार हायब्रीड बस प्रत्यक्ष वापरात येण्यासाठी अजून सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी आहे. तोपर्यंत एसटीकडे केवळ ९ ते १० हजार लालपरी गाड्या उपलब्ध आहेत. एवढ्या कमी गाड्यांमध्ये ७० लाख प्रवाशांची ने-आण करणं महामंडळाला अशक्य आहे. यावर तातडीने उपाययोजना न केल्यास आलेला प्रवासी दूर होण्याची दाट शक्यता आहे.३. तिकीट मशीनची दुरवस्थागेल्या पंधरा-वीस वर्षांपासून एसटीचा वाहक ETI मशीन द्वारे तिकीट देतो; परंतु सध्या उपलब्ध असलेल्या ३६००० इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन (ETI ) पैकी १५ हजार पेक्षा जास्त मशीन नादुरुस्त अवस्थेत आहेत. या मशीनची निविदा प्रक्रिया भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे रखडली आहे. महामंडळाकडे सध्या सुमारे ३५ हजार वाहक असून त्यांना काम करण्यासाठी सदर मशीन उपलब्ध न झाल्यास पुन्हा एकदा महामंडळाला कागदी तिकिटाकडे वळावे लागेल. त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी महामंडळाच्या उत्पन्नाला कात्री लावू शकतात. ४. बसस्थानक व स्वच्छतागृहांची दुरवस्था एसटीची राज्यभरात ५५० पेक्षा जास्त बसस्थानके आहेत. कोरोनापूर्वी यापैकी बहुतांश बसस्थानकांच्या नूतनीकरणाची, आधुनिकीकरणाची व नवीन स्थानके बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यापैकी काही बसस्थानके बांधून पूर्ण देखील झाली, परंतु गेल्या दोन वर्षांत निधीअभावी या सर्व बसस्थानकांची कामे रखडली आहेत. तसेच दोन वर्षांत उपलब्ध स्थानके वापराविना पडून असल्यामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे. ही बसस्थानके वापरायोग्य करण्यासाठी विशेष आर्थिक निधीची गरज भासणार आहे. त्याचबरोबर बसस्थानकावर असलेली स्वच्छतागृहे अत्यंत गलिच्छ असून महामंडळाची प्रतिमा मलिन होण्यामध्ये या स्वच्छतागृहांच्या गलिच्छतेचा प्रमुख वाटा आहे.५. कर्मचाऱ्यांचे समुपदेशन गेली २ वर्षे एसटीचे सर्वच कर्मचारी आपल्या नियमित कामापासून दूर आहेत. त्यांना दैनंदिन कामाची सवय मोडली आहे.अशा परिस्थितीमध्ये त्यांना अजून कार्यक्षम बनवून त्यांच्याकडून चांगले काम करून घेण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे अत्यंत आवश्यक आहे. संपकाळात अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्यातील संघर्ष पराकोटीला गेलेला असून असलेला द्वेष व मत्सर आणि संस्थेबद्दलची अनास्था यातून निर्माण झालेले नैराश्य हे संबंधित कर्मचाऱ्यांना आपल्या दैनंदिन कर्तव्यापासून परावृत्त करीत असल्याचे जाणवत आहे. या कर्मचाऱ्यांना समुपदेशन करून त्यांची कार्यात्मक गुणवत्ता वाढवणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी महामंडळाला पार पाडावी लागणार आहे.या प्रमुख समस्यांबरोबरच अनेक छोट्या-मोठ्या समस्या प्रत्यक्ष वाहतूक मोठ्या संख्येने सुरू झाल्यावर निर्माण होणार आहेत. या समस्यांच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक दृष्टीने विचार करून प्रवाशांना गुणात्मक दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने एसटीला भविष्यात खूप व्यावसायिक आणि प्रशासकीय बदल करणे गरजेचे आहे.यासाठी राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असणे तितकेच आवश्यक आहे अन्यथा हा मोडलेला डोलारा पुन्हा उभा करणं अत्यंत कठीण आहे.