बरोबर ७० वर्षांपूर्वी सोविएत फौजा बर्लिनच्या वेशीवर धडक देत असतानाच ३० एप्रिलला पहाटे हिटलरनं आपली पत्नी इव्हा हिच्यासह आत्महत्त्या केली. त्यानंतर दुसरं महायुद्ध अधिकृतरीत्या संपलं. तिकडं पॅसिफिकमध्ये आणखी साडेतीन महिन्यांनी आॅगस्ट १९४५ मध्ये अमेरिकेनं हिरोशिमा व नागासाकीवर अणुबॉम्ब टाकून जपानला गुडघे टेकायला लावले.दुसऱ्या महायुद्धानंतर आज ७० वर्षांनी जगाचा नकाशा व राजकीय परिस्थिती पूर्णत: पालटली आहे. हिटलरचा उदय झाला, तो पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर जर्मनीची जी आर्थिक ससेहोलपट व्हर्सायच्या करारानुसार झाली, त्यातून उद्भवलेल्या असंतोषामुळं. पण पहिल्या महायुद्धानंतर पुन्हा जगाला अशा भयानक जीवघेण्या संघर्षाला सामोरं जावं लागू नये, म्हणून स्थापन झालेल्या ‘लीग आॅफ नेशन्स’च्या अपयशाचाही वाटा हिटलरच्या उदयात होताच. पहिलं व दुसरं महायुद्ध युरोपातील देशातील राजकीय संघर्षापायी झालं होतं. पण गेल्या ७० वर्षांत युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर ऐंशीच्या दशकाच्या मध्यास बाल्कनमध्ये जो संघर्ष झाला, तो वगळला तर युरोपीय देशात युद्ध पेटलेलं नाही.पहिलं व दुसरं महायुद्ध झालं, ते साम्राज्यवादी प्रेरणेतून. मग ती प्रेरणा प्रादेशिक वा वांशिक, धार्मिक आणि वर्चस्ववादी अशा कोणत्याही स्वरूपाची असो. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर नात्झी जर्मनीचा नि:पात, इटलीची शरणागती व जपान नामोहरम झाल्यावर जगाची गाडी पुन्हा रूळावरून घसरू नये या दृष्टीनं ‘लीग आॅफ नेशन्स’चा अनुभव लक्षात घेऊन ‘युनायटेड नेशन्स’ची स्थापन करण्यात आली. ही जागतिक संघटना बहुतांशीङ्क्त(काही अपवाद सोडता) संघर्ष होऊ न देण्यात वा झाल्यास थांबवण्यात अपयशीच ठरली आहे. युरोपाबाहेरचं जग विविध प्रकारच्या संघर्षात गेल्या ७० वर्षांत होरपळून निघत आलं आहे. ..आणि उत्तर गोलार्धातील प्रगत देशांच्या नवसाम्राज्यवादी प्रेरणा हेच त्याच खरं कारण आहे.दुसरं महायुद्ध संपताच पोलादी पडदा पडून युरोपची विभागणी झाली. एवढ्यावरच भागलं नाही. पाश्चिमात्य व सोविएत देशांच्या गटांनी आशिया व आफ्रिका खंडातील नवस्वतंत्र देशात आपला प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यातून शीतयुद्धाची सुरुवात झाली. संंहारक अण्वस्त्रं बनवण्याची शर्यत लागली. अण्वस्त्रानं होणारी हानी लक्षात घेऊन कोणीच एकमेकावर हल्ला करण्याचा विचारही मनात आणू नये, इतकी प्रखर सज्जता ‘बॅलन्स आॅफ डेटेरन्स’ हे तत्त्व जागतिक वर्चस्ववादी डावपेचात प्रभावी ठरत गेलं. पुढं विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात सोविएत युनियन अस्तंगत झालं. साम्यवाद विरुद्ध भांडवलशाही हा विसाव्या शतकातील वैचारिक संघर्ष संपुष्टात आल्याचीङ्क्त‘एन्ड आॅफ हिस्टरी’ ग्वाही दिली गेली. उदारमतवादी लोकशाही व भांडवली अर्थव्यवस्था हीच राज्यचौकट आता जगभर अस्तित्वात येणार असल्याची द्वाहीही फिरविण्यात आली. पण २१व्या शतकात आता ‘संस्कृती-संघर्ष’ अटळ असल्याची मांडणीही त्याच्या जोडीनंच केली गेली. आता हाच ‘संस्कृती-संघर्ष’ दहशतवादाच्या विरोधातील जागतिक युद्धाच्या रूपानं उफाळलेला दिसून येत आहे. मात्र आज ‘इसिस’चा भस्मासूर उभा राहण्यास पहिल्या महायुद्धानंतर व्हर्सायच्या करारानुसार आॅटोमन साम्राज्याची जी वाटणी (मॅन्डेटेड टेरीटरीज) फ्रान्स व ब्रिटन या दोघा साम्राज्यवादी देशांनी केली आणि नकाशावर रेषा उठवून इजिप्त, सीरिया, लेबनॉन, इराक वगैरे देश अरबस्थानात निर्माण करण्याची चाल खेळली, ती कारणीभूत आहे. गेली सहा दशकं चिघळत असलेला पॅलेस्टिनी-इस्त्रायल संघर्ष ही ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी रणनीतीचीच अपरिहार्य परिणती आहे. तसंच नवसाम्राज्यवादाच्या प्रेरणेतून अफगाणिस्तानात सोविएत फौजांना विरोध करण्यासाठी इस्लामी जहालांना हाताशी धरण्याच्या रणनीतीनं जागतिक दहशतवादाचा पाया घातला. दुसरीकडं सोविएत युनियननेही वैचारिक विस्तारवादाच्या प्रेरणेने आशिया व आफ्रिका खंडातील देश आपल्या प्रभावळीत खेचण्यासाठी डावपेच खेळले. या गेल्या ७० वर्षांच्या कालखंडात भारत स्वतंत्र झाला. परंपरा, रूढीप्रिय, मागास समाज प्रगतीच्या पथावरून आधुनिकतेकडं वाटचाल करू लागला. तेही लोकशाही राज्यव्यवस्था टिकवत ठेवून. इतर नवस्वतंत्र आशियाई व आफ्रिकी देशांपैकी एकही हे साध्य करू शकला नाही. स्वातंत्र्यानंतर देशाची सूत्रं हाती घेतलेल्या नेतृत्वाची दूरदृष्टी, ऐतिहासिक पार्श्वभूमीवर तात्कालीक जागतिक घटना प्रवाहाकडं बघून देशाच्या हिताच्या दृष्टीनं धोरणं आखण्याची नेतृत्वाची प्रगल्भता आणि लोकशाहीवरची पक्की निष्ठा या गोष्टींमुळंच भारत हा असा अपवाद ठरू शकला, हे कधीही विसरता कामा नये. आज २१व्या शतकातील आधुनिकोत्तर जगातील जागतिकीकरणाच्या पर्वात भारत पाय रोवून उभा राहून पुढची वाटचाल करू पाहात आहे. आजही या २१व्या शतकातील जगात नवसाम्राज्यवादी प्रेरणा आहेत. मात्र एक बदल घडून येत आहे. विज्ञानाची विलक्षण झेप आणि त्यावर आधारलेलं प्रगत तंत्रज्ञान या दोन गोष्टीनं मानवी प्रगतीची परिमाणंच आमूलाग्र बदलून टाकण्यास सुरुवात केली आहे. संपर्काच्या साधनांमुळं जग आता खरोखरच ‘छोटं’ बनलं आहे. जगातील जनसमूह आता आपलं स्वातंत्र्य, हक्क, अधिकार याविषयी जागरूक बनत आहे. सुखी-समाधानी व निरोगी आयुष्य जगण्याची आकांक्षा खूप खोलवर मूळं धरू लागली आहे. हे कसं साध्य होऊ शकतं, त्यासाठी काय व्हायला पाहिजे व काय करायला हवं, या संदर्भातील विचारविमर्श व्यापक स्तरावर होत आहे. अर्थात आज असा हा नवविचार जगातील जनसमूहांपैकी काही स्तरांपर्यंत मर्यादित आहे, हे खरं. पण युरोपात १७व्या शतकापासून जी नवजीवनाची (रेनासा) सुरुवात झाली, त्याच धर्तीचं काही तरी घडून येऊ पाहत आहे. हा बदल आज अस्पष्ट असला, तरी तो घडून येत असल्याची स्पष्ट चिन्हं उमटू लागली आहेत.आजच्या भारतातील समाज आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीनं हे नवविचार अंगी बाणवणार की, पुराणमतवादी, मध्ययुगीन मनोेभूमिकेत राहून केवळ तांत्रिक व भौतिक आधुनिकतेच्या आहारी जात जगत राहणार, हा खरा प्रश्न आहे. प्रकाश बाळ(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)
हिटलरच्या मृत्यूनंतर ७० वर्षांनी...!
By admin | Published: April 29, 2015 11:20 PM