संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत, ठाणे
माध्यमसम्राट रुपर्ट मरडॉक ९२ व्या वर्षी एका ६७ वर्षांच्या महिलेसोबत विवाह बंधनात अडकणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होताच पुरुषसुलभ आंबटशौकीन प्रतिक्रियांचा तडका त्याला दिला गेला. व्हॉट्सॲप ग्रुपवरील अविवाहित किंवा विधूर सदस्यांना मरडॉक यांच्या आचरणाचे शहाजोग सल्लेही दिले गेले.
गतवर्षी अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी ५७ व्या वर्षी लग्न केल्याची बातमी अशीच खमंग चर्चेचा विषय ठरली होती. अभिनेते आमीर खान यांच्या ‘सत्यमेव जयते’ या टीव्ही शोमध्ये काही वर्षांपूर्वी जयंत जोशी व लीना जोशी हे जोडपे सहभागी झाले होते. जयंत यांच्या पहिल्या पत्नीचे आजारपणामुळे निधन झाले. त्यानंतर जयंत एकाकी पडले होते. त्यांनी वृत्तपत्रात जाहिरात दिली. लीना यांनी जयंत यांच्याशी विवाह केला. भारतामध्ये उतारवयातील विवाहाकडे केवळ पूर्वग्रहदूषित नजरेने पाहिले जाते.
गेल्या काही वर्षांत एकाकी ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. विभक्त कुटुंब पद्धतीत मुलगा व सून अथवा मुलगी आणि जावई दूर राहतात. वृद्ध जोडपी एकत्र असतात तोपर्यंत उभयतांना एकमेकांचा आधार असतो. परंतु जोडीदाराचे निधन झाल्यावर खरी पंचाईत होते.
पत्नीचे निधन झाल्याने विधूर पुरुषांचे हाल अधिक होतात. अनेकांना घरकामाची सवय नसते. त्यामुळे जेवणाखाणाचे हाल सुरू होतात. परिणामी प्रकृती ढासळते. खिशात पैसा असूनही एकाकीपणा व प्रकृती अस्वास्थ्य यामुळे ते त्रस्त होतात. मुंबई, ठाण्यासह कोकण प्रांतात ५५० हून अधिक ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. या संघाच्या वतीने त्यांच्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात.
मानसोपचारतज्ज्ञांचे मार्गदर्शन केले जाते. पोलिस ठाण्यांना त्यांच्या क्षेत्रातील एकट्या वृद्धांची माहिती दिलेली असते. पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांना विचारपूस करणारा फोन जाईल, याची व्यवस्था केलेली असते. केवळ ठाणे शहरात असे ८१ एकाकी वृद्ध स्त्री-पुरुष आहेत ज्यांची पोलिसांकडून विचारपूस केली जाते. मात्र सामाजिक दडपणामुळे किंवा कौटुंबिक कारणांमुळे उतारवयात विवाह करून एकाकी जीवनातून मुक्त होण्याचा मार्ग पत्करणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे.
मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, जेव्हा ४० ते ४२ वर्षांचा संसार झाल्यानंतर जोडीदाराचे निधन होते तेव्हा मानसिक धक्का बसणे स्वाभाविक असते. तीन ते सहा महिन्यांत जर मागे राहिलेला जोडीदार दु:ख व एकाकीपणाच्या भावनेतून बाहेर आला नाही तर हळूहळू मानसिक आजारांना बळी पडतो. आत्महत्येचाही प्रयत्न होतो. जोडीदारापैकी एकाचे निधन झाल्याने डिप्रेशन येणाऱ्यांचे प्रमाण १० टक्क्यांच्या आसपास आहे. ज्येष्ठ नागरिकांचे आपली मुले, नातवंडे यांच्यासोबत बॉन्डिंग किती आहे यावर बरेच अवलंबून असते. अनेकांचे आपला मुलगा अथवा मुलगी किंवा सून आणि जावई यांच्याशी वादविवाद होत असल्याने त्यांच्या घरात त्यांना स्थान नसते. अशा व्यक्तींमध्ये एकाकीपणाची भावना वाढण्याची शक्यता अधिक असते.
उतारवयातील विवाहाकडे पाश्चिमात्य फॅड म्हणून पाहिले जाते. पाश्चिमात्य देशांत मुलगा-मुलगी १८ वर्षांचे होताच आई-वडिलांना दुरावतात. आपल्याकडे विभक्त कुटुंब पद्धती रूढ होत असली तरी आई-वडिलांकडे ढुंकूनही पाहायचे नाही, अशी पद्धत नाही. त्यामुळे उतारवयात लग्नाचा विचार बोलून दाखवायला एकाकी पालक तयार होत नाही व आम्ही तुमच्याकडे बघायला असताना तुम्ही या फंदात का पडता, अशी भूमिका मुले घेतात. अर्थात, कालांतराने भारतामधील ज्येष्ठ नागरिकांना या पर्यायाचा विचार करावा लागेल. उतारवयातील विवाह हा शारीरिक भूक भागवण्यापेक्षा मानसिक आधाराकरता आहे हा विचार त्याकरता रुजणे गरजेचे आहे.