अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
मुंबईत आता अल्ट्रासॉनिक तंत्रज्ञानाने उंदीर मारण्याची विशेष मोहीम आखली जाणार आहे. जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत ७ लाख उंदरांना मारल्याचा महापालिकेचा दावा आहे. एका उंदराला मारण्यासाठी २५ रुपये दिले जातात. याचा अर्थ महापालिकेने उंदीर मारण्यासाठी पावणेदोन कोटी रुपये खर्च केले. याआधी असे किती कोटी रुपये उंदरांच्या नावावर खर्च केले, याचा हिशोब काढला तर एका छोट्या नगरपालिकेत चांगली योजना उभी राहील. उंदीर मारण्यासाठी कोट्यवधींचा चुराडा म्हणजे ‘आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी’ असा प्रकार आहे. मुंबईला लागून असणाऱ्या नवी मुंबई, ठाणे, पनवेल या भागांत कोणत्या महापालिकेची हद्द कुठे संपते ? कोणाची कुठे सुरू होते, हे कळत नाही. ठाण्याहून मुंबईत येताना मांजराच्या आकाराचे उंदीर दिसतात. असेच उंदीर मुंबईत खाऊगल्ली, फेरीवाले, हॉस्पिटल्स या परिसरात आहेत. फेरीवाले मोठ्या प्रमाणावर उरलेले खाण्यापिण्याचे पदार्थ इतरत्र फेकून देतात. सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांना चांगल्या ठिकाणी बसून जेवणाची सोय नाही. त्यामुळे ते उरलेले खाद्यपदार्थ खाल्ले तेथेच सोडून देतात. ते खाण्यासाठी उंदीर येतात. उंदरांची उत्पत्ती ज्या गतीने होते, त्या गतीने ते मारण्याचे काम होत नाही. उंदीर मारण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणारी महापालिका ज्यांच्यामुळे उंदीर येतात ते फेरीवाले, बेकायदा हॉटेलवाले, रस्त्यावरती वाट्टेल तसे खरकटे फेकून देणारे, यांच्यावर कारवाई करायची हिंमत दाखवत नाहीत.
मुंबईतल्या अधिकृत फेरीवाल्यांची संख्या २२,०४७ आहे. प्रत्यक्षात बेकायदेशीर फेरीवाल्यांसह हा आकडा दोन ते अडीच लाखाच्या घरात आहे. मुंबईचे सगळे फुटपाथ या फेरीवाल्यांनी व्यापून टाकले आहेत. जे लोक कोटी, दोन कोटींचे दुकान घेतात. त्याचा प्रॉपर्टी टॅक्स, वीज बिल भरतात, त्यांच्या दुकानासमोर हप्ता देऊन फेरीवाले आपला धंदा थाटतात. एक फेरीवाला महापालिकेचे अधिकारी, पोलिस, वॉर्डात दादागिरी करणारे नेते अशा तिघांना प्रत्येकी दीड हजार रुपये आणि चिरीमिरीचे पाचशे रुपये असे मिळून पाच हजार रुपये महिन्याला खर्च करतो. पैसे मिळाले की, त्याला कोणी काही बोलत नाही. मग तो फुटपाथ स्वतः च्या मालकीचा असल्यासारखा वापरू लागतो. नरसय्या आडम मास्तर यांनी विधानसभेत केलेल्या भाषणात, मुंबई महापालिकेत वर्षाकाठी १,२०० ते १,४०० कोटी रुपये फेरीवाल्यांकडून वसूल केले जातात, असे विधान केले होते. त्याला आता काही वर्षे झाली. हा आकडा आता कितीने वाढला असेल..? ज्यांच्या स्टॉलला परवाना आहे, त्यांनी सहा फूट उंचीचे, सहा फूट लांबीचे आणि दोन फूट रुंदीचे स्टॉल टाकावेत, असे अपेक्षित आहे. अख्ख्या मुंबईत या मापाचा एकही स्टॉल सापडणार नाही.
फुटपाथ चालण्यासाठी आहेत की, फेरीवाल्यांसाठी? याचा निर्णय महापालिकेने घेतला पाहिजे. व्हील चेअरवर किंवा पायी चालणाऱ्यांना फुटपाथवरून चालता येत नाही. ते लोक रस्त्यावरून चालू लागतात. त्यात अनेकांचे जीव गेल्याची शेकडो उदाहरणे आहेत. जनतेची सुरक्षा पणाला लावून फेरीवाल्यांच्या जीवावर करोडो रुपये कमावणारी मोठी यंत्रणा मुंबईत आहे. त्यांच्यावर कारवाई केली की, फेरीवाले संघटित होतात. एखादा राजकीय पुढारी समोर करतात. तो पुढारी सरकार पक्षाच्या नेत्याचा दबाव आणतो आणि कारवाई गुंडाळली जाते. अनेकदा हप्ते वाढवून घेण्यासाठीदेखील महापालिकेच्या कारवायांचा उपयोग करून घेतला जातो.
या सगळ्यांचा परिणाम मुंबईत उंदरांची संख्या वाढण्यावर होत आहे. मूळ प्रश्न न सोडवता उंदीर मारण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत. जे मुंबईत आहे तेच ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई, वसई- विरार या सगळ्या महानगरपालिका आणि अंबरनाथ, बदलापूर, पालघर, डहाणू, जव्हार या नगरपालिकांमध्ये कमी जास्त प्रमाणात सुरू आहे. मोकाट उंदरांमुळे लेप्टो, फेरीवाल्यांनी केलेल्या घाणीमुळे साथीचे आजार पसरतात. आजाराने त्रस्त रुग्णांना बरे करण्यासाठी महापालिका कोट्यवधी रुपयांची औषधे घेते. त्यातही भ्रष्टाचार होतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
एमएमआरडीए क्षेत्रातील नऊ महानगरपालिका आणि पाच नगरपालिकांमध्ये नियमाने कर भरून राहणाऱ्या नागरिकांचे आपण काही देणे लागतो, याचा विचार तरी प्रशासनाकडे आहे का..? जर तो असता तर ही वेळ आली नसती. आम्ही एवढे लाख उंदीर मारले म्हणून शाब्बासकीची थाप पाठीवर घेणाऱ्या महापालिकांनी मूळ आजाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. जे अधिकारी, राजकारणी करोडो रुपयांचा मलिदा वर्षाकाठी गोळा करत आहेत, त्यांची मुलं- बाळं याच शहरात आहेत. तेदेखील या व्यवस्थेची शिकार होतील. तेव्हा त्यांचे डोळे उघडतील का..? एमएमआरडीए क्षेत्रात इन्फ्रास्ट्रक्चरची भरपूर कामे सुरू आहेत. त्यासोबतच टोकाची आनागोंदी आणि अनास्थाही वाढीला लागली आहे. कधी नव्हे ते मुंबईच्या समुद्रात शेवाळ आले. ही धोक्याची घंटा लक्षात घेतली नाही तर साक्षात परमेश्वरही या महानगरीला वाचवू शकणार नाही.