- डाॅ. पुष्कर कुलकर्णी
१७ व्या शतकात भारताचा मोठा भूभाग मराठा साम्राज्यात होता. मराठ्यांनी अटकेपार भगवा रोवल्यावर तिळपापड झालेला अफगाण लुटेरा अहमदशाह अब्दाली हा रोहिलखंडच्या नजीबच्या बोलविण्यावरून पुन्हा एकदा भारतात आला. नजीबला मोगलांकडे असलेले दिल्लीचे तख्त हवे होते. अब्दालीला अटकाव करण्याची ताकद फक्त मराठ्यांमध्येच होती. सदाशिवरावभाऊ पेशवे यांच्या नेतृत्वात मोठे सैन्य पुण्यातून उत्तरेत कूच झाले. २६३ वर्षांपूर्वी १४ जानेवारी १७६१ रोजी संक्रांतीच्या दिवशी पानिपत येथे घनघोर युद्ध झाले. पानिपतचे तिसरे महायुद्ध म्हणून ते ओळखले जाते. या युद्धात दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले. यात मराठ्यांचे दोन मोती, सत्तावीस मोहरा आणि अनेक चिल्लरखुर्दा कामी आले. परकीयांच्या आक्रमणापासून मायभूमीच्या संरक्षणार्थ झालेल्या या लढाईत आपल्या मातीचा इमान राखत अगणित शूर योद्धे धारातीर्थी पडले. मराठा साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम, असे या युद्धाचे वर्णन केले जाते.
युद्धाच्या वर्षभरापूर्वी म्हणजे १७६० मध्ये उदगीरच्या लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. यात सदाशिवरावभाऊंनी निजामाचा तोफखाना प्रमुख इब्राहिमखान गारदी याला मराठ्यांकडे घेतले. पानिपतच्या युद्धातही मराठ्यांच्या तोफखान्याचे नेतृत्व इब्राहिमकडे दिले होते. युद्धापूर्वी अब्दालीने धर्माचा शब्द टाकून त्याला वळविण्याचा प्रयत्न केला. पण स्वकीय इमान राखत याच त्याने मैदान गाजवून अब्दालीला नाकीनऊ आणले. मराठा शूर सरदारांनी पाठ न दाखवता शेवटपर्यंत बाजी लावून वीरमरण स्वीकारले. सदाशिवरावभाऊ आणि विश्वासराव पेशवे यांनाही वीरमरण आले. मल्हारराव होळकर यांनी महिलांना युद्धभूमीतून सुखरूप बाहेर काढून सदाशिवरावभाऊंनी दिलेले कर्तव्य बजावले.
शिकण्यासारखेबरेच काही...दिल्लीचे रक्षण करणाऱ्या मराठ्यांना साथ दे, असे सांगूनही आपल्या आईचे न ऐकता शेवटच्या निर्णायक घडीत अवधचा सुजा अब्दालीकडे वळला. दिल्लीचे तख्त मिळावे ही अट राखत सूरजमल जाट यांनी युद्धात मराठ्यांच्या बाजूने न लढण्याचा निर्णय घेत तटस्थ भूमिका स्वीकारली. दरवर्षी १४ जानेवारी रोजी पानिपत युद्धाच्या स्मरणार्थ मराठ्यांचे शौर्य आठवते... धर्म आड न आणता आपल्या भूमीसाठी इमान राखत वीरमरण पत्करलेल्या योद्ध्यांची आठवण येते. वर्तमानातील पिढीला यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे.