माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा वर्तमान, तसेच भूतकाळ व भविष्य अशा तिन्हींचा विचार ज्यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे दिग्गज, मायक्रोसाॅफ्टचे सहसंस्थापक व बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सहप्रमुख बिल गेट्स आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील सविस्तर चर्चेमुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काही ज्वलंत प्रश्नांवर भारताच्या भूमिकेला उजाळा मिळाला आहे. विशेषत: आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हा विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या हरघडी चर्चिला जाणारा विषय या संवादाच्या केंद्रस्थानी आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अमेरिका भेटीत ‘एआय’ म्हणजे ‘अमेरिका व इंडिया’ असा शब्दच्छल केल्याचे बहुतेकांना आठवतच असेल. थोडासा त्यापलीकडे जाणारा हा त्यांचा संवाद म्हणता येईल; कारण, गेट्स व मोदी केवळ एआयवर बोललेले नाहीत.
जगाला भेडसावणारी तापमानवाढीची समस्या, पर्यायी ऊर्जास्रोत, शेती, आरोग्य, महिला सक्षमीकरण अशा अन्य विषयांवरही दोघांची चर्चा झाली. कोविड महामारीच्या काळात सर्वसामान्य भारतीयांमध्ये लस घेण्याबद्दलचा संभ्रम दूर करण्यासाठी केलेल्या जनजागृतीसाठी गेट्स यांनी मोदींचे कौतुक केले. प्लास्टिकचा भस्मासुर, त्याच्या रिसायकलिंगची प्रक्रिया यांवरही दोघे बोलले. या सर्व विषयांवर भारत देश करीत असलेले काम, सरकारचा पुढाकार, विविध सरकारी योजना व उपक्रमांची माहिती पंतप्रधानांनी गेट्स यांना दिली. आपण परिधान केलेले हाफ जॅकेटच मुळात रिसायकलिंगद्वारे तयार झालेल्या कच्चा मालापासून बनलेले आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. तरीदेखील या संभाषणाचा आकर्षक भाग आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे आव्हान व त्यावरील उपाययोजनांचाच आहे.
थोडे खोलात गेले तर दिसते की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या रूपाने मानवी समुदायापुढे उभ्या असलेल्या संकटाला सहमती दर्शवितानाच भारतीयांच्या दृष्टीने हा बराच दूरचा विषय असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी नवजात बालकाच्या पहिल्या रडण्याचे दिलेले उदाहरण बोलके आहे. नमो ॲपमध्ये किंवा जी-२० अध्यक्षपदाच्या काळात भाषणांच्या भाषांतरासाठी एआयचा वापर कसा होतो, हे पंतप्रधानांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणाचा हा प्रयोग आहे; परंतु, एआयचा खरा धोका हा आहे की, जाणीवपूर्वक पसरविल्या जाणाऱ्या खोट्या बातम्या, फेक व्हिडीओ, फसवी छायाचित्रे आणि अगदी हुबेहूब वाटावेत असे डीपफेक व्हिडीओ, आदींमुळे लोकांची खरे-खोटे समजण्यात फसगत होईल. तेव्हा, मूळ, खऱ्या व्हिडीओ-छायाचित्रांवर काहीतरी वॉटरमार्क असावेत, अशी सूचना मोदींनी बिल गेट्स यांना केली आहे. त्यावर गेट्स यांची प्रतिक्रिया काय होती हे लगेच स्पष्ट झालेले नाही. तथापि, असे वॉटरमार्क टाकणे डीपफेक व्हिडीओ बनविणाऱ्यांना का शक्य होणार नाही, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. या दोघा दिग्गजांमधील ही चर्चा गेल्या २९ फेब्रुवारीची आहे. ती एक महिन्यानंतर प्रसारित करण्यामागे काही राजकारण आहे का, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. देशभर लोकसभा निवडणुकांचा माहौल आहे.
दक्षिण भारतात यावेळी तरी चांगले समर्थन मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारतीय जनता पक्ष जिकिरीचे प्रयत्न करीत आहे. दक्षिण भारतात तंत्रज्ञानस्नेही मतदारांची संख्या मोठी आहे. विज्ञान, तंत्रज्ञानाबद्दल विशेष रुची असलेले, या क्षेत्रातील प्रत्येक घटना-घडामोडी व भविष्यातील शोध, दिशा यांकडे लक्ष ठेवणारे या टापूतील मतदार आहेत. तेव्हा, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज बिल गेट्स यांच्याबरोबर पंतप्रधानांचा संवाद नेमका मतदानाला जेमतेम तीन आठवडे शिल्लक असताना प्रसारित होणे समजू शकते. या संवादात सौर, पवन ऊर्जा या अपारंपरिक स्रोतांबद्दल भारताची दिशा स्पष्ट करतानाच पंतप्रधान अणुउर्जा तसेच जगाच्या ऊर्जेचे भविष्य समजल्या जाणाऱ्या ग्रीन हायड्रोजनबद्दल भरभरून बोलले. त्यालाही दक्षिणेचा संदर्भ आहे.
गेल्या महिन्यात मोदींनी तामिळनाडूमध्ये पूर्णपणे ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटीचे लोकार्पण केले. ती बोट पंतप्रधानांच्या मतदारसंघाला म्हणजे वाराणसीला भेट देण्यात आली. आता त्या बोटीने आपण काशी ते अयोध्या प्रवास करणार आहोत, त्या माध्यमातून गंगा शुद्धिकरणाचा संकल्प पूर्ण होईल, ही पंतप्रधानांची या संवादातील विधाने तंत्रज्ञान व आस्था यांची सांगड घालणारी आणि एकाच वेळी दक्षिणेकडील तंत्रस्नेही व उत्तरेकडील श्रद्धाळू मतदारांना आपल्या राजकारणाशी जोडणारी आहेत, हे विशेषत्वाने लक्षात घ्यावे लागेल.