हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्लीविरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि आता काश्मीरचे मुख्यमंत्री झालेले ओमर अब्दुल्ला यांच्या बाबतीत काहीसे थंडपणे वागत आहेत. केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत इतका मोठा विजय मिळवल्यानंतर राहुल गांधी यांनी ओमर अब्दुल्ला यांचे अभिनंदन का केले नाही, हे कळण्यास मार्ग नाही. ही निवडणूक जिंकणे सोपे नव्हते; पण राहुल यांनी ओमर यांना साधा फोनही केला नाही म्हणतात. जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीच्या विजयाबद्दल त्यांनी डॉ. फारुख अब्दुल्ला यांना फोन केला.अब्दुल्ला मंडळींचे गांधी यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत; परंतु राज्यातील आघाडीचे सदस्य या नात्याने राहुल गांधी यांच्या वागण्यावरून ओमर अब्दुल्ला अत्यंत अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. काँग्रेस जम्मूमधील जागांवर लक्ष केंद्रित करील, तेथे भाजपला अंगावर घेईल, तर ‘नया काश्मीर’मध्ये भाजप आणि त्यांच्या बाजूच्या पक्षांना नॅशनल कॉन्फरन्स सामोरी जाईल असे ठरले होते; परंतु राहुल गांधी यांनी ‘नया काश्मीर’मध्ये प्रचार करायचे ठरवले. काँग्रेसची जेथे नॅशनल कॉन्फरन्सबरोबर मैत्रीपूर्ण लढत होती तेथेही राहुल यांनी सभा घेतल्या. ओमर यांना या विषयी बोलावे लागले. काँग्रेसने जम्मूमध्ये प्रचार का केला नाही, असा प्रश्न ओमर यांनी निवडणुकीची शेवटची फेरी होण्याच्या आठवडाभर आधी केला होता. ‘राहुल काश्मीरमध्ये एक किंवा दोन जागांवर प्रचार करून थांबतील आणि जम्मूवर लक्ष केंद्रित करतील’, अशी मला आशा आहे असे अब्दुल्ला यांनी उघडपणे म्हटले होते. शेवटी काँग्रेसने काश्मीरमध्ये काय केले हे महत्त्वाचे नाही; काँग्रेस जम्मूत काय करते हे महत्त्वाचे होते. केवळ हरियाणातच काँग्रेसची निराशाजनक कामगिरी झाली, असे नव्हे तर जम्मूमध्येही तेच झाले. ओमर अब्दुल्ला यांच्या शपथविधीला राहुल गांधी उपस्थित राहिले हे खरे; पण सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेऊन त्यांनी आपली नाराजी दाखवून दिलीच.राहुल यांचे दगडी मौनहरयाणा आणि जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले तेव्हा ८ ऑक्टोबरला राहुल गांधी यांनी बाळगलेले मौन अनेकांच्या भुवया उंचावणारे होते. शेवटी त्यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट टाकली, ती निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी. ‘निकालाचे विश्लेषण केले जाईल, हरयाणामध्ये पक्ष धक्कादायकरीत्या पराभूत का झाला हे शोधले जाईल’ असे त्यात म्हटले होते; परंतु पक्षाच्या जम्मू-काश्मीरमधील कामगिरीबद्दल त्यात काही उल्लेख नव्हता. नॅशनल कॉन्फरन्सचा उल्लेखही त्यांनी टाळला. ४९ पैकी ४२ जागा नॅशनल कॉन्फरन्सने जिंकल्या, तर काँग्रेसला केवळ सहा जागा जिंकता आल्या. राहुल यांनी केवळ ओमर अब्दुल्ला यांच्याशी बोलणे टाळले नाही, तर निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी ट्विटरवर टाकलेल्या पोस्टमध्ये त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सचा उल्लेखही केला नाही. राहुल यांनी ओमर अब्दुल्ला यांच्याबरोबर निवडणूक प्रचारात एकत्र सभा घेतली नाही. यामुळे काँग्रेसची पीछेहाट झाली असे म्हटले जाते. फारुख अब्दुल्ला यांनी मात्र शेवटच्या टप्प्यात काँग्रेस नेत्यांबरोबर जाहीर सभा घेतल्या. जम्मूत काँग्रेसची भाजपशी थेट लढत असताना राहुल यांनी तेथे लक्ष दिले नाही, याबद्दल ओमर बुचकळ्यात पडले आहेत.नरेंद्र मोदींची गुगली‘जातनिहाय जनगणना तत्काळ घ्या’, अशी मागणी करणाऱ्या राहुल गांधी यांच्यासह सर्वच विरोधी पक्ष नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गप्प केले आहे. काँग्रेसने राजकीय लाभासाठी हिंदू समाजाला जातींच्या आधारे विभागले असा जोरदार हल्ला मोदी यांनी केला; परंतु ती केवळ सुरुवात होती. मुस्लिमांची, तसेच इतर धर्मीयांची जात गणना करावी असे काँग्रेस कधी का म्हणत नाही? असा प्रश्न मोदी यांनी केला. शेवटी मुस्लीमसुद्धा जातनिहाय विभागले गेलेले आहेत. मुस्लिमांमध्येसुद्धा अस्पृश्यता, वाळीत टाकणे असे प्रकार आहेत असे मोदी म्हणाले. हिंदूंनाच वेगळे काढले जाते यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. मुस्लीम शिया, सुन्नी आणि पसमंदा यांच्यात विभागले गेलेले आहेत. पैकी पसमंदा अत्यंत गरीब असून, त्यांच्यावर बहिष्कार टाकला जातो, याकडेही मोदी यांनी लक्ष वेधले. मोदींच्या या वक्तव्यावर राहुल यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही; परंतु पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मात्र पंतप्रधान धर्माच्या आधारे देश फोडायला निघाले आहेत असा आरोप केला. सरकार जातनिहाय जनगणना करायला तयार आहे. मात्र, इतर धर्मीयांनीही अशा जनगणनेला संमती दिली पाहिजे, अशी भूमिका सरकारने घेतल्याचे मोदी यांच्या वक्तव्यावरून दिसते.