शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
2
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
3
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
5
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
7
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
8
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
9
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
10
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
11
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
12
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
13
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
14
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
15
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
16
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
17
दो भाई दोनों तबाही! शिखर धवन आणि युझवेंद्र चहलची भन्नाट कॉमेडी; चाहत्यांना हसू आवरेना
18
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
19
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
20
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत

सर्व देशांसाठी एक धडा; ‘बाहेरचे लोक’ फ्रान्सला आग लावतात, तेव्हा...

By विजय दर्डा | Published: July 10, 2023 7:06 AM

मानवता म्हणून फ्रान्सने ज्या स्थलांतरितांना आपल्या भूमीवर आसरा दिला, तेच लोक आता या देशाच्या शांततेला नख लावण्यात आघाडीवर आहेत!

डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

शानदार संस्कृती, उत्कृष्ट कलात्मकता, उमद्या कलाकृती आणि लाजवाब साहित्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या फ्रान्समध्ये एका तरुणाच्या मृत्यूनंतर हिंसाचाराचा एवढा आगडोंब का उसळला,  हा प्रश्न आपणा सर्वांच्या मनात नक्कीच आला असेल. सरकारी संपत्ती जाळली जात आहे, हल्ले रोखण्यात पोलिस दले असफल ठरताहेत. शेकडोंच्या संख्येने पोलिसच जखमी झाले आहेत. इतकेच नव्हे, तर पॅरिससारख्या शहराच्या आसपासचा भागसुद्धा दंगेखोरांच्या हल्ल्यापासून दूर राहिलेला नाही.

कलेची जागतिक राजधानी म्हणून पॅरिस काही शतकांपासून ओळखले जाते. क्रांतीचा काळ सोडला तर  एक शालीन शहर अशी या शहराची प्रतिमा आहे. संस्कृती हीच पॅरिसची ओळख आहे. मी कित्येकदा फ्रान्समध्ये गेलो आहे. केवळ पॅरिस नव्हे तर वेगवेगळी शहरे जवळून पाहिली आहेत. तिथले जनजीवन मला माहीत आहे; म्हणून मला असे वाटते की मूळचे फ्रेंच असलेले लोक या प्रकारचे दंगे करू शकत नाहीत; आणि ते खरेही आहे.  बाहेरून आलेल्या स्थलांतरितांच्या वस्त्या जास्त असलेल्या उपनगरी भागात हिंसाचार  भडकलेला आहे. बरेचसे लोक दोन पिढ्यांपासून तेथे राहत आहेत; परंतु वास्तव हे, की त्यांनी फ्रान्सची संस्कृती आपली मानलेली नाही, आणि ते तिथल्या समाजावर आपले वर्चस्व प्रस्थापित करू इच्छितात. फ्रान्सने मानवाधिकारांचा आदर करण्यासाठी या स्थलांतरितांना आपल्या जमिनीवर आसरा दिला. त्यांनी खरेतर फ्रान्सचे ऋणी व्हायला हवे होते. परंतु तेच आता फ्रेंच संस्कृतीवर हल्ला करत आहेत. फ्रान्स आपल्या दिलदारीचे दुष्परिणाम भोगत आहे.

एखाद्या देशात एखाद्या तरुणाचा मृत्यू किंवा हत्या झाली तर इतका मोठा हिंसाचार भडकेल काय?  गेल्या महिन्यात २७ तारखेला मूळचा अल्जीरियन असलेल्या नाहेल या १७ वर्षाच्या तरुणाला पोलिसांनी ट्रॅफिक सिग्नलवर हटकले असता पोलिसांचे म्हणणे तो थांबला नाही. त्यामुळे गोळीबार करावा लागला आणि त्यात तो मारला गेला. वास्तविक २०१७ साली झालेल्या एका कायद्याने फ्रेंच पोलिसांना एखाद्या गाडी चालकाने गाडी थांबवली नाही तर गोळी झाडण्याचा अधिकार दिलेला आहे. नाहेल मूळचा फ्रेंच नसल्यामुळे त्याच्यावर मुद्दाम गोळी झाडण्यात आली, असा आरोप एका व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे पोलिसांवर केला जात आहे. या आरोपाच्या पुष्ट्यर्थ असेही सांगितले जात आहे की गेल्या वर्षी अशाच घटनांमध्ये जे १३ लोक मारले गेले ते सगळेच मूळचे फ्रेंच नव्हते. ज्या १३८ मोटारींवर पोलिसांनी गोळीबार केला, त्या जास्त करून मूळच्या फ्रेंच लोकांच्या नव्हत्या, असेही सांगण्यात आले. 

- मी कोणत्याही प्रकारे गोळी झाडण्याचे समर्थन करत नाही पण बाहेरून आलेले स्थलांतरित फ्रान्सचा कायदा का तोडतात, हा प्रश्न तर निर्माण होणारच! तूर्तास फ्रान्सचे  अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी या मृत्यूला हत्या मानले आणि संबंधित पोलिसाला अटकही केली गेली; तरीही दंगे मात्र थांबलेले नाहीत; याचे कारण तेथे छोटे गुन्हेगार आणि गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये फ्रान्सला नष्ट करण्याचा विडा उचललेले लोक सामील झाले आहेत. पोलिसांच्या संघटनेनेही अध्यक्ष  मॅक्रोन यांच्यावर टीका केली आहे. न्यायालयाचा निर्णय येण्याच्या आधीच  पोलिस अधिकाऱ्याला दोषी का ठरवले, असा प्रश्न त्यांनी केला आहे.

फ्रान्सच्या शहरांजवळ उभ्या राहिलेल्या वस्त्यांचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते की या वस्त्यांमध्ये सुमारे ५० लाख लोक राहतात; काही लोक अलीकडे आले आहेत तर काही पिढ्यानपिढ्या राहत आहेत. या वस्त्यांमधल्या गुन्हेगारांशी पोलिसांच्या अधूनमधून चकमकी उडत असतात. त्यात दरवर्षी सुरक्षा दलांचे ५००० पेक्षा जास्त शिपाई जखमी होत असतात. डझनावारी सुरक्षा सैनिकांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. २०१५ मध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. दोन युवकांचा विजेचा शॉक लागल्यामुळे मृत्यू झाला; परंतु त्यासाठी पोलिसांना दोषी मानले गेले; कारण काय तर ते त्यांचा पाठलाग करत होते. त्यावेळी निकोलस सरकोजी फ्रान्सचे अध्यक्ष होते आणि त्यांनी या युवकांना अपराधी म्हटले, गुन्हेगारी अजिबात सहन केली जाणार नाही, असा इशाराही दिला. त्यानंतर दंगे उसळले होते.इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या सरकारने पडते घेतले आणि पोलिसांची कारवाई चालू असूनही परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. दंगेखोरांनी देशभरातील शाळा, टाउन हॉल आणि पोलिस ठाण्यांना लक्ष्य केले आहे. कित्येक मोटारी, सरकारी इमारती नष्ट झाल्या आहेत, अशी माहिती फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डारमनीन यांनी ट्विटरवर दिली आहे. 

सुरक्षा दलांचे ४५ हजारांपेक्षा जास्त सैनिक दंगे रोखण्याचा प्रयत्न करत असताना हे सगळे होत आहे. गुन्हेगार अजिबात न घाबरता सुरक्षा जवानांवर हल्ले करत आहेत. पॅरिसचे उपनगरी क्षेत्र लयले होज येथे महापौरांच्या घरावर हल्ला झाला. त्यांची मोटार जाळण्यात आली. महापौरांची पत्नी आणि मुलांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यावरही हल्ला झाला. फ्रान्समधली आग बेल्जियममध्येही पोहोचली आहे; परंतु तिथले सरकार त्यावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाले. मानवाधिकाराच्या आधारे संकटग्रस्त देशातून आलेल्या नागरिकांना काही मर्यादेपर्यंत आसरा दिला पाहिजे हे मलाही मान्य आहे. परंतु ज्यांना आपण वास्तव्य करू देतो आहोत त्यांची मानसिकता काय आहे, हेही पाहण्याची काळजी घेतलीच पाहिजे. फ्रान्सने याकडे लक्ष दिले नाही; त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत. फ्रान्समध्ये जे घडते आहे ते इतर सर्व देशांसाठी एक धडा निश्चितपणे आहे. सतर्कता असण्याला पर्याय नाही, हेच खरे!

टॅग्स :Franceफ्रान्स