- प्रवीण दीक्षित
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निकट जात असताना देशातल्या प्रत्येक नागरिकाने अंतर्मुख होणे स्वाभाविकच आहे. स्वातंत्र्य मिळाल्याच्या अगदी पहिल्या दिवसापासून आपल्या शेजारी देशांकडून वारंवार युद्धे लादली गेली. आपले इरादे सफल होत नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांनी सीमावर्ती प्रदेश, किनारपट्टीवरून प्रवेश करून दहशतवादी हल्ले करायला सुरुवात केली. हे एक प्रकारचे छुपे युद्धच होते.
भारताला अस्थिर करण्याचा हेतू त्यामागे होता. घृणास्पद अशा जातीय दंगली या प्रवृत्तींनी भडकविल्या. त्यात कित्येकांचे प्राण गेले. तेवढ्याने समाधान न झाल्याने त्यांनी देशात अमली पदार्थांच्या मार्फत दहशतवाद पसरवला. गेल्या एका वर्षातच ‘नार्कोटिक्स ब्युरो ऑफ इंडिया’ने ३० हजार किलो हेरॉईन पकडले. यातून तरुणांचे आयुष्य बरबाद तर होतेच, शिवाय अमली पदार्थांच्या व्यापारातून निर्माण होणारा पैसा घातक शस्त्रांची चोरटी आयात करण्यासाठी वापरला जातो. व्यक्तिगत तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सायबर हल्ले चालूच आहेत. म्हणून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी उंबरठ्यावर आपण आपल्या सीमांचे संरक्षण करणाऱ्या जवानांना सलाम केला पाहिजे.
आंतरराष्ट्रीय कारस्थानांमुळे स्वातंत्र्याच्या पहिल्या २५ ते ३० वर्षातच देशावर अनेक हल्ले झाले. त्या काळात प्रगत देशांनी आपल्याला संरक्षण आणि सुरक्षेसंबंधीचे आधुनिक तंत्रज्ञान दिले नाही. त्या काळात देशाला अन्न, पाणी, आरोग्य, अन्य सुविधा, वीज, शिक्षण, रोजगार अशा काही बाबतीत खूपच अडचणी आल्या. नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. आजाराच्या साथी हाताळाव्या लागल्या. वाढीसाठी अनुकूल अशा पुरेशी साधन सामग्रीही त्यावेळी नव्हती, तरीही इतर उभरत्या अर्थव्यवस्था आणि दक्षिण आशियाई देशांच्या तुलनेत लोकशाही मूल्यांप्रती भारताची निष्ठा अभेद्य राहिली. केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवरील संस्था लोकशाही प्रक्रियेतून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी या सर्व समस्यांचा धाडसाने सामना केला.
अनेक भारतीय त्या काळात देशाबाहेर जाऊन यश कसे मिळवायचे ते शिकले. त्यातले काही मायदेशी परतले. देशाला जागतिक स्पर्धेत उभे करण्यासाठी त्यांनी पुढच्या २० वर्षात आपले योगदान दिले. सन २००० नंतर मात्र प्रत्येकच क्षेत्रात भारत लक्षणीय प्रगती करत आहे. अवकाश तंत्रज्ञान, शेती, बंदरे, दूध उत्पादन, विविध वस्तूंचे उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, औषध निर्माण, जेनेरिक औषधे, वस्तू आणि सेवांची निर्यात, संशोधन आणि तांत्रिक शोध, चित्रपट, क्रीडा आणि आणखी काही बाबींचा विशेष करून उल्लेख करता येईल. भारतातील शैक्षणिक, वैज्ञानिक, तांत्रिक, कायदेविषयक, प्रशासकीय तसेच व्यवस्थापन विद्या शिकवणाऱ्या संस्था जागतिक दर्जाच्या मानल्या जातात. आज भारताचा साक्षरता दर ७५ टक्के पलीकडे गेला आहे.
गेल्या आठ वर्षात फिनटेक आणि इतर अभिनव तंत्रज्ञानाचा वापर करून देशातल्या गरिबांना पुढे आणण्यासाठी कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या. डिजिटल पेमेंटच्या बाबतीत तर प्रगत जगाला विस्मय वाटावा इतकी प्रगती आपल्या देशाने केली आहे. प्रदेश, धर्म, जात, लिंग, भाषा ही कारणे वापरून लोकांमध्ये कटुता आणि संघर्ष उत्पन्न करण्याच्या हितसंबंधितांच्या कारवायांपासून दूर राहण्याचा संकल्प आता आपण केला पाहिजे. देशाने उराशी बाळगलेल्या विरासतीवर विश्वास ठेवून देश बळकट करण्यासाठी आपण प्रतिबद्ध झाले पाहिजे. जनसामान्यांच्या कल्याणासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. त्यांना पुरेशा संधी मिळायला हव्यात, दिव्यांग, वयोवृद्ध नागरिक, आजारी लोक यांच्यासह समाजातील दुर्बल घटकांबद्दल आपण संवेदनशील असले पाहिजे... जय हिंद !