- सलमान रश्दी, ख्यातनाम लेखक
इट इज नाइस टू बी बॅक ! - मी परत आलो, याचा आनंद आहे. कारण मी कधीच परत न येण्याची मोठीच शक्यता निर्माण झालेली होती. पण, काही लोकांना जे व्हायला हवे होते, ते झाले नाही, हे खरे! ‘पेन अमेरिका’ या संघटनेशी मी गेली वीसपेक्षा अधिक वर्षे संबंधित आहे. आधी अध्यक्षच होतो. आता माजी अध्यक्ष आहे, माजी अध्यक्ष असणे हे एकुणातच फार सोपे असते म्हणा! - पण, ते असो.
अवघ्या जगाला हादरे देणाऱ्या अकरा सप्टेंबरच्या त्या भयावह घटनेनंतर सर्वत्रच एक हताशेची, विचित्रपणाची भावना भरून राहिली होती. या हताशतेतून वाट काढण्याची मोठी जबाबदारी लेखक-कवींवर, विचारवंतांवर, एकूणच लिहित्या हातांवर आहे, यावर विश्वास असलेल्या लोकांनी एकत्र येऊन पेन अमेरिकेच्या व्यासपीठावर वर्ल्ड व्हॉइसेस फेस्टिव्हल सुरू करायचे ठरवले.
न्यूयॉर्कचे साहित्यिक, सांस्कृतिक वातावरण आणि वेळापत्रक आधीच फार गजबजलेले असते. त्यात आता या नवीन कार्यक्रमात कोण येणार, अशी रास्त शंका आमच्यापैकी अनेकांना होती, पण लोक आले. लेखक जमत राहिले आणि शब्दांबरोबरच सत्याच्या उच्चारणाचा हा महोत्सव मोठा होत गेला. केवीन काल्सनर यांची मला आठवण होते. ते म्हणाले होते, इफ यू बिल्ड समथिंग, दे विल कम! - खरेच तसे झाले आहे.
पेन अमेरिकेने निर्माण केलेले वर्ल्ड व्हॉइसेस फेस्टिव्हलचे हे व्यासपीठ अस्तित्वात आले, तेव्हाच त्याची मोठी गरज होती आणि गेल्या इतक्या वर्षांमध्ये दुर्दैवाने ती गरज सतत वाढतीच असावी, असे वातावरण जगभरात तयार झाले आहे. जगभरातल्या लेखकांनी, विचार करणाऱ्या, करू शकणाऱ्या आणि तो करू इच्छिणाऱ्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आज जितकी आहे, तितकी याआधी कधीच नव्हती, असे गेली अनेक वर्षे मी म्हणत आलो आहे आणि दरवर्षी ते तितकेच खरे असते, हे समकालीन जगाचे दुर्दैव खरेच!
आज या महोत्सवामध्ये सत्ताधाऱ्यांच्या दमनशाहीविरुद्ध खमकेपणाने उभे राहणाऱ्या इराणी लेखिकेचा सन्मान होतो आहे. अमेरिकेने बाहेरच्या दमनकारी देशातल्या खुल्या आवाजांचा असा सन्मान आजवर अनेकदा केलेला आहे, पण महत्त्वाचे हे की, आता आपल्याच देशाकडे ‘पाहण्याची’ वेळ अमेरिकेवर आलेली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणाऱ्या हल्ल्यांचा सामना करण्याची अशी वेळ खुद्द अमेरिकेवरच येईल, असे अनेकांना वाटले नव्हते; पण तसे घडते आहे. अभिव्यक्तीच्या मुक्ततेसाठी आवाज उठवू पाहाणाऱ्या लोकांचे वर्ल्ड व्हॉइसेस फेस्टिव्हल हे व्यासपीठ आज कधी नव्हते एवढे महत्त्वाचे आहे, असे मी म्हणालो, ते यासाठीच!
पुस्तके, शिकण्या-शिकवण्याची प्रक्रिया आणि ग्रंथालयांवर होणारे हल्ले भविष्यातल्या संकटांची नांदी असतात, म्हणून त्यांचा सामना प्रखरपणानेच केला गेला पाहिजे! या लढ्यामध्ये उतरून आपले सार्थ योगदान देणाऱ्या जगभरातल्या प्रत्येक लहान-मोठ्या व्यक्तीच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांच्या धैर्याला सलाम करतो!गेल्यावर्षी १२ ऑगस्टला याच न्यूयॉर्क शहरात माझ्यावर हल्ला झाला. त्या हल्ल्यातून उठून पुन्हा सक्रिय झाल्याबद्दल मला या व्यासपीठावर विशेष ‘करेज अवॉर्ड’ दिले जाते आहे, त्याचा मी कृतज्ञ स्वीकार करतो, पण मला हेही सांगितले पाहिजे, की माझ्यावर हल्ला झाला तेव्हा खरे धाडस दाखवले ते इतरांनी!..मी नव्हे!! जे झाले, त्यात शौर्य गाजवणारा मी नव्हतो, इतर होते! हल्लेखोराने चाकू भोसकताच सर्वात प्रथम त्याच्या दिशेने धाव घेतली, ती हेन्री रीज यांनी! एंडेंजर्ड रायटर्सच्या वतीने पीट्सबर्ग येथे चालवल्या जात असलेल्या एका ‘असायलम प्रोजेक्ट’बद्दल चर्चा करण्यासाठी हेन्री माझ्यासोबत व्यासपीठावर होते.
हेन्री माझ्यापेक्षा वयाने लहान असले, तरी सत्तरीचे आहेत; म्हणजे तसे तरुण नव्हेत! हेन्री सत्तरीचे आणि माझ्या जिवावर उठलेला हल्लेखोर चोवीस वर्षांचा तरुण!- पण, तरीही त्यांनी प्रसंगावधान दाखवून हल्लेखोरावर पहिल्यांदा झडप घातली. त्यांच्या मागोमाग पहिल्या रांगांमध्ये बसलेले अनेक प्रेक्षक वर धावले; आणि त्यांनी त्या हल्लेखोराला जमिनीवर पाडून त्याच्यावर ठाण मांडले.
...त्या दिवशी हे लोक नसते, तर मी आज नसतो.आय वॉज द टार्गेट, अँड दे वेअर द हीरोज! म्हणून मला मिळालेला पुरस्कार हा त्या सर्वांचा आहे. एक हेन्री वगळता त्यापैकी कुणालाही मी ओळखत नाही, त्यांचे चेहेरेही मला आठवत नाहीत; पण त्यांच्यामुळे माझा जीव वाचला. या जगात हल्लेखोर आहेत, तसा त्यांचा सामना करण्याची जिद्द आणि हिंमतही आहेच! मी आयुष्यभर हेच सांगत आलो आहे, की टेररिझम मस्ट नॉट टेरराइझ अस!- दहशतवादाची दहशत आपल्याला झुगारून देता आली पाहिजे! आणि व्हायलन्स मस्ट नॉट डिटर अस!बंदुकीच्या गोळीने एकवेळ माणूस मरेल, पण छाताडातली हिंमत मरता कामा नये!- हा लढा आहे. तो आजवर चालू राहिला आहे, यापुढेही अखंड चालला पाहिजे! द स्ट्रगल मस्ट गो ऑन!! n (ख्यातनाम लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात त्यांनी एक डोळा गमावला आहे. ऑगस्ट २०२२ मधल्या त्या घटनेनंतर गेल्या आठवड्यात प्रथमच ते जाहीर कार्यक्रमात सहभागी झाले. ‘पेन अमेरिका’च्या व्यासपीठावर ‘पेन सेंटेनरी करेज अवॉर्ड’ स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणाचा भावानुवाद)