- विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
माणसाच्या आयुष्यात संगीत नसते तर ते किती नीरस झाले असते, याची जरा कल्पना करा. ज्यांच्या आयुष्यातून संगीत हिरावून घेतले आहे त्यांचे काय हाल होत असतील? संगीताशिवाय जीवन म्हणजे नरकच दुसरा! अशाच एका देशाची, अफगाणिस्तानची गोष्ट! तालिबान्यांनी तेथे संगीतावर संपूर्णपणे निर्बंध लादलेले आहेत. अफगाणिस्तानची ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक’ उद्ध्वस्त करण्यात आली असली तरीही एक व्यक्ती अशी आहे की जी संस्थेतील ५८ मुले आणि तरुणांना घेऊन तालिबान्यांच्या कचाट्यातून संगीताची मान सोडवण्यात यशस्वी होत आहे. या कलाकारांनी संगीतावरील त्यांच्या प्रेमालाच तालिबान्यांविरुद्धचे शस्त्र बनवले आहे.
या कलावंतांना तालिबान्यांपासून वाचवून नवे जीवन देणे आणि आपल्या देशातील संगीताला जिवंत राखण्याचा प्रयत्न करणे, अशी दुहेरी बहादुरी दाखवणाऱ्या या माणसाचे नाव आहे अहमद सरमस्त. अफगाणी संगीताला आकाशाच्या अनंत उंचीपर्यंत पोहोचविण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या सरमस्त यांनी २०१० साली ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक’ या संगीत विद्यालयाची स्थापना केली. तालिबान पुन्हा सत्तेवर आले तेव्हा अहमद सरमस्त यांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला. १६ ते २० वर्षे वयाच्या आपल्या ५८ विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन ते पोर्तुगालमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाले.
सरमस्त आणि त्याच्या तरुण शिष्यांकडे सध्या संगीत विद्यालय तर नाही परंतु ब्रागा म्युझिक कन्जर्वेटरीमध्ये त्यांचे काम चालले आहे. सरमस्त यांनी मुलींच्या जोहरा ऑर्केस्ट्राची स्थापना केली होती, तो पुन्हा सुरू झाला आहे. हे कलाकार एकीकडे आपले संगीत सुरक्षित ठेवत आहेत, तर दुसरीकडे त्यांनी तालिबान्यांविरुद्ध विद्रोहाची तार छेडली आहे. युरोपातील देशांमध्ये सध्या त्यांचे कार्यक्रम होत असतात. संगीताच्या माध्यमातून आपला आवाज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी हे सारे आतुर आहेत; पण गायन-वादनाला तालिबान्यांचा आक्षेप का?- तर त्याचे उत्तर असे, की जेव्हा संगीत बंद होते तेव्हा सगळा देश मौन होतो. अगोचराला जागे करण्याची ताकद संगीतामध्ये आहे.
मी कुठे तरी एक गोष्ट वाचली होती : इतिहासकाळात दिल्लीच्या गादीवर बसलेल्या एका शासकाला संगीत अजिबात आवडत नसे. एके दिवशी सकाळी काही लोक एक प्रेतयात्रा घेऊन जात होते. शासकाने विचारले ‘कोण मेले?’ सेवकाने उत्तर दिले ‘हुजूर संगीत मरण पावले आहे.’ शासकाने अत्यंत तिरस्कारपूर्ण स्वरात त्या सेवकाला सांगितले, ‘त्याला इतके खोल गाडून टाका की ते पुन्हा कधीही वर येता कामा नये.’ - या शासकाला संगीताच्या ताकदीचा अंदाज होता म्हणूनच त्याने संगीताशी हे असले वैर पत्करले होते.
पूर्वी राजे-महाराजे आपल्या दरबारात संगीत क्षेत्रातील महारथींना स्थान देत असत. त्यांच्यावर दौलत उधळीत. कलावंत समाजात बंडाची बीजे रोऊ शकतात; त्यामुळे त्यांना आपल्या दरबारातच गुंतवून ठेवले पाहिजे, हे त्यांनी पक्के जाणलेले असे. जनजागरणात संगीताने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वंदे मातरम्चा जयघोष याचे उदाहरण होय. बंकिमचंद्रांनी १८८२ साली ‘वंदे मातरम्’ लिहिले. १८८५ साली काँग्रेसची स्थापना झाली; आणि पुढच्याच वर्षी तत्कालीन कलकत्त्यात काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात हरेंद्र बाबू यांनी वंदे मातरम् गायले. त्यानंतर पुन्हा १८९६ मध्ये कलकत्ता काँग्रेसच्या अधिवेशनात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत छंदबद्ध अशा देश रागामध्ये गायले.
१९०५ साली काँग्रेसने ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले. कवी सुब्रह्मण्यम भारती यांनी ते तमिळमध्ये गायले, तर पंतुलू यांनी तेलुगूमध्ये. ते स्वातंत्र्य आंदोलनाचे गीत झाले. ब्रिटिशांनी या गीतावर प्रतिबंध लादले; परंतु तोवर हे गाणे प्रत्येकाच्या जिभेवर रूळले होते. स्वातंत्र्याच्या आंदोलनात ‘मेरा रंग दे बसन्ती चोला’ या गीतानेही एक काळ गाजवला. महान क्रांतिकारी रामप्रसाद बिस्मिल यांनी ही अमर रचना कारागृहात बंदी असताना लिहिली.
मेरा रंग दे बसन्ती चोला । इसी रंगमे रंगके शिवाने माँका बंधन खोला ।यही रंग हल्दीघाटीमे खुल कर के था खेला । नव बसंतमें भारत के हीत वीरोंका यह मेला ।क्रांतिकारक भगत सिंह यांनी हे गाणे ऐकले आणि त्यांनी त्यात आणखी काही ओळी जोडल्या..इसी रंग में बिस्मिलजीने वंदे मातरम् बोला । यही रंग अशफाकको भाया उसका दिल भी डोला ।
अंत:करणाला छेडण्याची ताकद संगीतात आहे. ते रक्तात वीरश्रीचा संचार करू शकते. तिरंग्याच्या सन्मानासाठी जेव्हा धून छेडली जाते तेव्हा आपल्या अंगावर रोमांच उभे राहतातच! जगातल्या सर्व भाषांपेक्षा वेगळी अशी संगीताची एक भाषा आहे, जिला अडवण्याची ताकद कुठल्याही सीमेत नाही. म्हणून तर आज ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्करचा सन्मान लाभतो. संगीत आपल्या सर्वांचा आत्मा आहे; म्हणून ते अजर आणि अमर आहे.
संगीताचा आवाज दडपून टाकता येणार नाही, हे तालिबान्यांनाही कधीतरी कळेलच. राम धून किंवा कृष्णाच्या बासरीची धून कोणी अडवू शकते काय? माणसाला संगीताचा तिरस्कार कसा करता येईल? संगीताच्या ताकदीवर माझा विश्वास आहे म्हणूनच संगीत समृद्ध करण्यासाठीची आपली जबाबदारी ‘लोकमत परिवार’ उचलत आला आहे. दरवर्षी संगीत क्षेत्रातील महान व्यक्तींना सन्मानित करण्याबरोबर दोन नवोदित कलाकारांना ‘सूर ज्योत्स्ना’ पुरस्कार दिला जातो. श्रेष्ठ संगीतच श्रेष्ठ जीवनशैलीचा रस्ता दाखवत असते. संगीत असेल तर जीवन सुकर होईल. रहमत कर परवरदिगार, अफगाणिस्तान की भी जिंदगी जल्दी मुखर हो!