- वंदना अत्रे (दुर्धर व्याधीग्रस्तांच्या मदतगटात कार्यरत)कोणत्याही आव्हानाच्या काळात संयम शिकवणारा सर्वात मोठा गुरू कोणता तर निसर्ग. सात वर्षांपूर्वी कुंडीत लावलेले लिंबाचे झाड आणि २० वर्षांपूर्वी अंगणात लावलेले नारळाचे झाड या दोन झाडांनी मला हा धडा दिला. मी दिलेले खत, जीवामृत, असे पचवूनही ही झाडे बहराची कोणतीही चाहूलसुद्धा न देता उभी असलेली पाहून चिडचिड होत होती. उपटून फेकून द्यावेसे वाटण्याचे कित्येक उद्विग्न क्षण आले. मी एवढे करते याच्यासाठी, पण याला काही किंमत आहे का? हा अहंकार धडका मारत होता. पण एका साक्षात्कारी क्षणी मी प्रेमाने लिंबाच्या जवळ बसले.
त्याला म्हटले, ‘बाबा रे, माझे प्रेम, माया तुझ्यापर्यंत पोहोचत नाहीय यात तुझी काहीच चूक नाही, बहुदा मी कमी पडत असावे. तुला फुलायला जेवढा वेळ हवाय तेवढा घे, नाही फुललास तरी चालेल, पण माझ्या बागेतून तुला फेकून देण्याची भाषा कधीच करणार नाही यापुढे!’ यानंतर काही दिवसातच मी चमत्कार अनुभवला. लिंबाच्या प्रत्येक फांदीवर कळ्यांचे छोटे पांढरे ठिपके मोठ्या मजेत जगाकडे मान वर करून बघताना दिसायला लागले आणि नारळाच्या अंगाखांद्यावर नारळांचे इवले घोस! जाणवले, अकस्मात आलेल्या अक्राळविक्राळ आजाराशी जमवून घ्यायला आपल्या शरीरालाही असाच वेळ लागत असणार. त्या हल्ल्याने गांगरून गेलेल्या शरीरातील अनेक व्यवस्थांना स्थिर व्हायला काही काळ लागणारच की!
अशावेळी आपल्याच शरीरावर चिडचिड करून त्याला झिडकारले तर आजाराची स्थिती अधिक बिकट होते! मला आठवतेय, केमोच्या औषधांनी केवळ डोक्यावरील नाही तर पापण्या आणि भुवयांचेसुद्धा केस गेल्याने विद्रुप झालेला माझा चेहरा बघताना माझीच मला घृणा वाटली होती! प्रत्यक्षात तेव्हा माझ्या शरीराला मायेची सर्वाधिक गरज होती. ही माया आणि संयम जेव्हा आपल्या वागण्यातून दिसतो तेव्हा झाड बहरायला लागते..!lokmatbepositive@gmail.com