- किरण अग्रवाल
गेल्या आठवड्यात अकोल्यामध्ये एकापाठोपाठ एक खुनाच्या घटना घडल्याने पोलिसांचा धाक ओसरत चालल्याचा अर्थ काढला जात आहे. कोरोनानंतर गतिशील झालेले अकोल्यातील अर्थकारण अबाधित राखण्यासाठी येथील निर्भयता कायम राखणे गरजेचे आहे. नूतन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यासाठी सक्त होणे अपेक्षित आहे.
नवीन पोलीस अधिकारी बदलून येतात तेव्हा संबंधित यंत्रणा अधिक सतर्क होतात व साहेबाचा अंदाज घेतात, असा आजवरचा अनुभव आहे; पण अकोल्यात जिल्हा पोलीस अधीक्षक बदलून येताच असे का झाले की अवघ्या आठवडाभरात चार खून व दोन प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांची त्यांना सलामी लाभली? शहरात सैल झालेली नाकाबंदी यानिमित्ताने नजरेत भरणे स्वाभाविक ठरले आहे.
अकोल्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारून संदीप घुगे यांना अजून महिनाही झालेला नाही, त्यात एकापाठोपाठ एक असे चार खून व दोन प्राणघातक हल्ल्यांच्या घटना घडून आल्या आहेत. तीन-चार महिन्यांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याची कापशीत नेऊन हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असताना व त्याचे अद्याप धागेदोरे हाती लागलेले नसताना या नवीन घटना घडल्या आहेत. या घटनांची प्राथमिक पार्श्वभूमी बघता त्यामागे गॅंगवॉर किंवा ठरवून कट केल्यासारखी माहिती अजून तरी हाती नाही. वैयक्तिक वादातूनच त्या घडल्याचे सांगितले जात असल्याने थेट कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचे भलेही म्हणता येऊ नये, परंतु लागोपाठच्या या प्रकारांमुळे समाजमन धास्तावले आहे हे मात्र नक्की.
तसेही अकोला शहर व जिल्ह्यातील अवैध, अनधिकृत धंदे थांबलेले नाहीत. वरली मटका, जुगार सुरूच आहे. रोज संबंधितांवर कारवाया होतात, पण यात चेलेचपाटेच पकडले जातात, मोठे मासे सहीसलामत दिसतात. बंदी असली तरी तरुणाईला व्यसनाधीन करणारा गुटखाही मोठ्या प्रमाणात शहरात येतोच आहे. स्थानिक पोलिसांच्या नजरेस न पडलेला 50 लाखांचा गुटखा अलीकडेच पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाने जप्त केला, यावरून येथल्या पोलिसांचे लक्ष आहे कुठे असा प्रश्न उपस्थित व्हावा. यावरून संबंधित गुन्हे शोध पथक निलंबित करण्याची नामुष्की ओढवली, परंतु हे इतकेच नाही; मागे शेगावात घडलेल्या सोने चोरी प्रकरणात चक्क पोलिसांकडूनच अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले गेल्याचे आरोप झाले व न्यायालयाच्या आदेशाने चार पोलिसांवर गुन्हे दाखल करावे लागले. अर्थात याबाबतीत या चार जणांखेरीज अन्य कोण सहभागी होते हे अजून गुलदस्त्यात आहे हा भाग वेगळा, परंतु पोलिसांकडूनच कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याची उदाहरणे कमी नाहीत.
अकोला फार काही डेव्हलप झाले नाही, परंतु हे शहर प्रारंभापासून ''बिझनेस हब'' आहे. वैद्यकीय सुविधांमुळे पंचक्रोशीतील शेकडो रुग्ण व सोबत त्यांचे नातेवाईक प्रतिदिनी अकोल्यात येतात. येथील जनतेच्या धार्मिक आस्था प्रगाढ आहेत. दूरवरून शिक्षण, कोचिंगसाठी येथे असंख्य विद्यार्थी येतात, राहतात. यादृष्टीने या शहरातील निर्भयता महत्वाची आहे. असामाजिक कार्यात लिप्त राहून या निर्भयतेला नख लावणाऱ्यांना मोक्का लावून व तडीपार करून आटोक्यात ठेवण्याची भूमिका आतापर्यंतच्या अधिकाऱ्यांनी घेतली होती, तीच यापुढेही कायम राखली जाणे अपेक्षित आहे. महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडण्याच्या वाढत्या घटना पाहता जी. श्रीधर यांनी रात्रीची नाकाबंदी वाढविली होती, त्याने चौका चौकातील हुल्लडबाजी काहीशी आटोक्यात आली होती. सद्यस्थितीत ढिसाळ बनलेली रात्रीची गस्त परत पूर्ववत होणे गरजेचे आहे.
नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे राज्य राखीव पोलीस दलातून आले असले तरी तत्पूर्वी त्यांनी मालेगाव (नाशिक) सारख्या संवेदनशील शहरात कोरोना काळात रस्त्यावर उतरून काम केले आहे. त्यावेळी पुत्र जन्माचा आनंद बाजूस ठेवून त्यांनी तेथे सेवा दिल्याचे बघावयास मिळाले होते. तेथील त्यांची धडाडी पाहता अकोल्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पोलिसांचा धाक कमी होणार नाही व चौकात वाढदिवसाचे केक कापून दादागिरी प्रदर्शित करू पाहणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांना कर्तव्यकठोर व्हावे लागेल, त्याखेरीज अकोल्यात निर्भयता साकारणार नाही.