- स.सो. खंडाळकर(विशेष प्रतिनिधी, लोकमत, औरंगाबाद)
१९३६ पासून ते १९४८ पर्यंतच्या काळात हैदराबादचा मुक्तिसंग्राम झाला. १३ सप्टेंबर १९४८ रोजी स्वतंत्र भारताचे सैन्यदल त्या लढ्यातील सत्याग्रही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीला धावून गेले आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थानची निजामाच्या राजवटीतून मुक्तता होऊन ते स्वतंत्र भारतात सामील करण्यात आले. पुढे १९५६ ला भारतात भाषावार प्रांतरचना अमलात आली आणि जुन्या हैदराबाद संस्थानातील कानडी भाषिक जिल्हे कर्नाटकास, तेलंगणाचे जिल्हे आंध्र प्रदेशास आणि मराठवाड्याचे तत्कालीन पाच जिल्हे महाराष्ट्र राज्यास जोडण्यात आले. हैदराबादच्या स्वातंत्र्यलढ्याचे महापर्व संपले. मात्र, त्यापुढील पन्नास वर्षांच्या काळात गोविंदभाई श्रॉफ यांनी मराठवाड्याच्या विकासाचा, शिक्षणाचा आणि सामाजिक सुधारणांचा पाठपुरावा पूर्वीइतक्याच निष्ठेने आणि व्रतस्थ वृत्तीने केला.
‘आम्ही ज्यासाठी लढा दिला, त्या स्वातंत्र्याचा अर्थ केवळ एका जुलमी सरंजामशाही सत्तेपासून सुटका एवढाच नव्हता, तर लोकशाही स्वातंत्र्य मिळवणे हा होता’ असे गोविंदभाई आवर्जून सांगत. हैदराबादचा मुक्ती लढा समाप्त झाल्यानंतरच्या काळात समाजाच्या पुनर्रचनेच्या कामाची निकड ओळखूनच गोविंदभाईंनी सत्ता अव्हेरली आणि ते निस्पृहतेने शिक्षणाच्या आणि मराठवाडा विकासाच्या कार्यात मग्न झाले. गोविंदभाई बुद्धिमान व त्यागी तर होतेच, शिवाय द्रष्टेही होते. त्यांच्या प्रत्येक कार्याला बुद्धी आणि शहाणपण यांची जोड असे. हैदराबाद संस्थानातील लढ्याचे स्वरूप हे अनेकांना वाटते, त्याप्रमाणे ‘हिंदूंचा मुसलमानांशी लढा’ असे नव्हते. हैदराबादमध्ये बहुसंख्य जनता हिंदू होती आणि राज्यकर्ता निजाम मुस्लीम होता. हैदराबादमध्ये बहुसंख्याकांनी सरंजामी राजवटीतून मुक्तता व्हावी म्हणून चळवळ केली. हैदराबादेत चळवळीचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले.
१९३८ साली डिसेंबरमध्ये निजाम सरकारने ‘वंदे मातरम’ या गीतावर बंदी आणली. त्यामुळे गोविंदभाईंनी औरंगाबादेत ‘वंदे मातरम चळवळ’ सुरू केली. संस्थानातील शाळा-महाविद्यालयांमध्ये निजामाचे गुणगान करणारे ‘आसफिया’ गीत म्हणावयाची प्रथा होती. औरंगाबादच्या इंटरमिजिएट कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन गोविंदभाईंनी वंदे मातरम हेच गीत म्हणण्याचा आग्रह तत्कालीन प्राचार्यांकडे धरला. प्राचार्यांनी ही मागणी धुडकावली. विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला. गोविंदभाई आणि कॉ. व्ही. डी. देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना संघटित करून ‘वंदे मातरम’ हेच गीत प्रार्थनेच्या वेळी म्हणण्याची चळवळ सुरू केली. ही चळवळ हा हा म्हणता हैदराबाद, गुलबर्गा व वरंगल येथील महाविद्यालयांमध्येही फोफावली. सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
एकीकडे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी महात्मा गांधीजींनी सर्वसामान्यांच्या हाती सत्याग्रह, अहिंसा अशी शस्त्रे दिली होती. मराठवाड्यात वंदे मातरम गीत गाण्याची कृती हीदेखील सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारे मोठे शस्त्रच ठरले. या गीत गायनाच्या रूपाने चळवळीत भाग घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना निजाम सरकारने संस्थानातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यास मज्जाव केला. त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी इतरत्र जावे लागले. गोविंदभाईंनी सुरू केलेल्या वंदे मातरम चळवळीनेच हैदराबाद संस्थानातील तरुण विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यासाठीच्या संघर्षात सामील होण्याची प्रेरणा दिली, हे निर्विवाद सत्य आहे.
गोविंदभाईंच्या जीवनावर महात्मा गांधी यांचा फार मोठा प्रभाव होता. तरुण वयात कार्ल मार्क्सच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेले गोविंदभाई श्रॉफ स्वातंत्र्य चळवळीच्या काळात जेव्हा गुजरातला गेले, तेव्हा त्यांना गांधीजींच्या विचारांची ओळख झाली. १९५८ नंतर हैदराबाद चळवळीतल्या अनेक कार्यकर्त्यांनी स्वत:ला खादीच्या कार्यात जोडून घेतले. मराठवाडा खादी ग्रामोद्योग उपसमितीच्या स्थापनेनंतर गोविंदभाईंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठवाड्यात खादी उत्पादन, विक्री आणि प्रसाराचे कार्य जोमाने होऊ लागले. गोविंदभाईंच्या चेहऱ्यावरून किंवा त्यांच्या बोलण्यातील आक्रमक आविर्भावावरून हा माणूस अत्यंत कर्मठ, रुक्ष आणि एककल्ली असला पाहिजे, असे वाटे. वास्तवात ते खूप सहृदयी होते. परिवर्तनवादी होते. संत भूमीचा योद्धा म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका कित्येक वर्षे स्मरणात राहील, यात शंका नाही!