शेअर बाजारात चढउतार हे खरे तर बाजाराचे चांगले लक्षण मानले जाते; परंतु १८ जानेवारीपासूनची पडझड सर्वसामान्य गुंतवणूकदारांना अचंबित करणारी आहे. निफ्टी फिफ्टी निर्देशांक १८ जानेवारी रोजी १८,३५० या उच्चतम् पातळीवरून खाली यायला सुरुवात झाली आणि बघता बघता गेल्या सहा ट्रेडिंग सेशनमध्ये तब्बल १५०० अंकांनी (८ टक्के) घसरून त्याने १६,८३६ ही न्यूनतम पातळी पाहिली. सामान्य गुंतवणूकदार अशा परिस्थितीत अवाक तर होतातच; परंतु त्यांच्यात एक भीतीचे वातावरण तयार होते. कष्टाचा गुंतविलेला पैसा बुडतो की काय, या अनाहूत भीतीने ते घेरले जातात. याची कारणमीमांसा शोधण्यासाठी अभ्यास केला तर निदर्शनास येते की, गेल्या काही दिवसांत भारतीय बाजाराचा ‘विक्स’ म्हणजेच अस्थिरता सूची बऱ्याच प्रमाणात वाढली आहे. याचा अर्थ असा की, बाजारातील चढउतार हे मोठ्या प्रमाणात होणार. खरे तर गेले सहा महिने भारतीय बाजार हा त्याच्या अंतर्गत वित्तीय शक्तीने तग धरून आहे. कारण जुलै २०२१पासून विदेशी वित्तीय संस्थांनी भारतीय बाजारातून तब्बल एक लाख चाळीस हजार कोटी रुपये कॅश मार्केटमधून काढून घेतले आहेत. त्या तुलनेत भारतीय संस्थांनी तब्बल एक लाख कोटींच्या वर बाजारात पैसा गुंतविला आहे. म्हणूनच भारतीय बाजार त्याच्या अंतर्गत शक्तीने तरला आहे आणि भविष्यातसुद्धा तरला जाणार आहे.
विदेशी गुंतवणूकदरांनी भारतीय बाजारातून रक्कम काढून इतरत्र गुंतविली. सध्या त्यांच्या दीर्घकालीन गुंतवणुकीचा टक्का खूपच खाली आला आहे. ही बाजारासाठी सकारात्मक बाब आहे. कारण येणाऱ्या काळात विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजाराकडे पुन्हा आकर्षित होऊ शकतात. अमेरिकी वित्तीय संस्था ‘फेड’ व्याजदरावर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. व्याजदरात वाढ ही अमेरिकन बाजारासाठी नकारात्मक बाब असते. त्यामुळे तिथले बाजारही अस्थिर आहेत. त्याचाही परिणाम गेल्या काही दिवसांत भारतीय बाजारावर झाला. काल बाजार बंद होताना निफ्टी १२८ अंकांनी वाढून बंद झाला, ही समाधानाची बाब समजावी. आता भारतीय बाजारासाठी १ फेब्रुवारी रोजी सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा विषय ठरणार आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री काय सादर करणार, कोणकोणत्या विभागास सवलती मिळणार, कशा कशावर अतिरिक्त कर लादला जाणार, महागाई नियंत्रणात राहणार की वाढणार, रोजगाराच्या संधी कितपत निर्माण होणार, या अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर विदेशी आणि भारतीय गुंतवणूकदार लक्ष ठेवून असणार आहेत. १ फेब्रुवारी रोजी बऱ्याचशा गोष्टी गुलदस्त्यातून बाहेर पडतीलच. नेमके बजेटपूर्वीच बाजार का घसरला, यामागे वर निर्देशित केलेल्या अनेक कारणांबरोबरच एक महत्त्वाची गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे मागील वर्षी जानेवारी महिन्यातच शेअर बाजाराने बजेटपूर्वी अशीच एक मोठी डुबकी घेतली होती. २१ जानेवारी २०२१पासून निफ्टी फिफ्टी हा संवेदनशील निर्देशांक त्याच्या १४,७५३ या उच्चतम् पातळीवरून २९ जानेवारी २१ रोजी १३,५९६ या न्यूनतम पातळीवर खाली आला. म्हणजेच तब्बल १,०९० अंकांनी (७.४० टक्के) घसरला. परंतु केंद्रीय अर्थसंकल्पानंतर बाजाराने पुन्हा उसळी घेत १६ फेब्रुवारी २०२१पर्यंत तब्बल १३ टक्क्यांची भरघोस वाढ नोंदविली. म्हणूनच आता गुंतवणूकदारांसाठी अर्थसंकल्प हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.
विदेशी गुंतवणूकदार पुन्हा एकदा भारतीय बाजारात पैसे गुंतविण्याचा विचार करू शकतात. सध्या भारतीय बाजार जास्त विक्रीच्या माऱ्याने दबलेला आहे. तिसऱ्या तिमाहीचे निकाल बऱ्याच संस्थांनी सादर केले आहेत. त्यात काही संस्थांची कामगिरी उत्तम दिसते, तर काहींची सरासरी दिसते. ही बाजारासाठी नकारात्मक बाब निश्चित नाही. तसेच कोरोनाची तिसरी लाट म्हणावी तितकी घातक दिसत नाहीये. रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णालयात भरतीचे प्रमाण आणि मृत्युदर मात्र वाढलेला नाही. अशा परिस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पानंतर भारतीय बाजार पुन्हा नवी उभारी घेईल, असे वाटते. कोरोनाची ही लाट जेव्हा कमी होईल तेव्हा भारतात एक नवी ऊर्जा निर्माण होईल. जी सकारात्मक तर सिद्ध होईलच; परंतु भारतास एका नव्या वाटेवर घेऊन जाईल; जी वाट सर्व मळभ दूर करणारी आणि नव्या आशेचे किरण घेऊन येणारीच ठरावी. भारतीय शेअर बाजारासाठी ही ऊर्जा नव्या उंचीकडे घेऊन जावी.