- सुधीर महाजन
राजकारणातील समीकरणे वेगाने बदलत असतात आणि या बदलांशी जुळवून घेत जो समीकरणे सोयीची करून घेतो, तोच राजकारणात टिकतो. मूल्य, तत्त्वाच्या राजकारणाला भाजपसह सर्वांनीच तिलांजली दिल्यामुळे आता राजकीय विचारधारा नावाची गोष्टच शिल्लक राहिली नाही. धर्मनिरपेक्षतेच्या राजकारणाची कास धरणारे किती तरी धुरंधर क्षणात हिंदुत्ववादी बनलेले पाहिले. बाटगे जास्त कट्टर असतात या उक्तीप्रमाणे या धर्मनिरपेक्ष मंडळीचा अतिकट्टरतावाद पाहायला मिळतो. हे आठवण्याचे कारण म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्षपदाची धुरा चंद्रकांतदादा पाटलांच्या खांद्यावर गेल्यामुळे आता रावसाहेबांच्या पिलावळीचे काय होणार? आणि औरंगाबादच्या राजकारणाचा विचार केला, तर गेल्या तीन महिन्यांपासून त्रिशंकू अवस्थेत असलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाचे काय? कारण गेल्या बऱ्याच दिवसांत हा प्रवेश थंड्या बस्त्यात पडला आहे. त्यावर कवित्व झाले.
रावसाहेब दानवे यांचा पराभव होईपर्यंत डोईवरचे केस वाढवणार नाही, अशी प्रतिज्ञा करणारे सत्तार श्मश्रू करायला लागले आणि आता मला कंगवा रावसाहेबच देणार, अशी भाषा बोलू लागले. राजकारणाचे जे नवीन पीक जोमाने तरतरून आले, त्याची ही नवी भाषा आहे. सत्तार यांच्या प्रवेशाची तयारी व मुंडावळ्या बांधून ते तयार असल्याचे पाहत स्थानिक भाजप नेत्यांचे आसन डळमळीत झाले आणि त्यांनी थेट ‘वर्षावर’ धाव घेतली. त्यावेळी ‘सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत? मला तर माहीतच नाही’, अशी गुगली फडणवीसांनी टाकली. दरम्यान, रावसाहेबांचे केंद्रात जाणे तय झाले आणि हे प्रकरण थंडावले.
विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने काँग्रेसमधून माजी जि.प. अध्यक्ष प्रभाकर पालोदकरांनी हालचाल सुरू केली आणि श्रेष्ठींनी त्यांना प्रोत्साहन दिले. भाजपच्या गोटात मात्र अजून संभ्रमावस्था आहे. उमेदवार ठरत नाही किंवा कोणालाही तयारी सुरू करण्याचे संकेत मिळत नाहीत. तिकडे अब्दुल सत्तार तयारी पूर्ण करून अंगाला तेल लावून बसले आहेत. भाजपमध्ये आताशी दंड-बैठका सुरू झाल्या. पालोदकरांनी सोयऱ्याधायऱ्यांचे जाळे विणले, कार्यकर्ते गोळा केले. जुन्या-नव्यांचा मेळ घातला. नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांनी ‘भाजपचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत, असा संदेश प्रसारित केल्याने सत्तार यांच्या आशा पल्लवित आहेत. अशा परिस्थितीत विरोधकांच्या मनसुब्यांवर कशी मात करायची यात ते माहिर आहेत. ‘जय श्रीराम’ची घोषणा देत त्यांनी अपक्ष लढण्याची तयारी केली, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही आणि काँग्रेस, भाजप, अशी समोरासमोर लढत न होऊ देता, अपक्ष म्हणून उडी घ्यायची व हिंदू मत विभाजनाचा फायदा घेत स्वत:च्या व्होट बँकेच्या जोरावर विधानसभा गाठायची, असेही समीकरण ते मांडू शकतात. एक तर ही शक्यता दिसते किंवा त्यांना थेट भाजपमध्ये प्रवेश मिळाला, तर त्यांचा मार्ग आणखी सोपा होऊ शकतो. कारण पक्षाच्या विरोधात जाऊन सत्तार यांना पाडण्याईतपत हिंमत एकाही स्थानिक नेत्यामध्ये नाही. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयामागे फरपटत जाणे एवढेच त्यांना करावे लागेल.
सत्तारांच्या भाजप प्रवेशाला रा.स्व. संघातील मंडळींकडून अडथळा आल्याने तो त्यावेळी होऊ शकला नाही. भाजपमधील मंडळींनी पक्षश्रेष्ठींकडे विरोध न करता केवळ आर्जव केले होते. सत्तार यांना प्रवेश दिला तर आम्ही पक्षत्याग करू, अशी रोखठोक भूमिका एकाही स्थानिक नेत्याने घेतली नसल्याने श्रेष्ठींनी या सर्वांचेच पाणी जोखले आहे आणि इकडे तर सत्तार उच्चरवात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देतात. आजही स्थानिक भाजप नेत्यांना संभ्रमात ठेवण्यात सत्तारांची खेळी यशस्वी झाली. प्रवेश होईल तेव्हा होईल; पण सगळीच अनिश्चितता आहे. सत्तार भाजपकडून लढले, तर त्यांचा परंपरागत मतदार त्यांच्या मागे उभा राहील का, हा मोठा प्रश्न आहे. पुन्हा त्यांना विरोध करण्यासाठी भाजपचा एकनिष्ठ मतदार काँग्रेसकडे झुकेल काय? कारण या मतदारांच्या जोरावर भाजप नेत्यांनी सातत्याने सत्तार यांना विरोध केला आहे, जे काही घडणार ते जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारे ठरणार आहे.