- किशोर पाठकएक अभंग. ‘जाणीव नेणीव भगवंती नाही.’ मग कुणाला आहे. जाणीव आणि नेणीव जर भगवंताला नाही तर तो निर्गुण निराकार आहे, पण तो निर्विषय नाही. त्याला संसार हा प्रमुख विषय आहे. आपण जाणीव हा शब्द किती अर्थाने वापरतो कळत नाही. तुला जाणीव झाली, जाणीव नाही, जाणीव ठेव, मला जाणवलंच नाही. मला जाणवलं. पण माझ्यात एक उणीव आहे म्हणजे माझ्या उणिवांची मला जाणीव आहे किंवा मला जाणिवांचीच उणीव आहे. या उणिवा जाणिवांनी भरून काढणे म्हणजे नेणिवेच्या पातळीवर जाणे. आपण नेणिवेच्या पातळीवर कधी जगत नाही.आपल्याला आपल्या उणिवा जाणवत नाहीत. ही उणिवांची जाणीव ज्याला प्रथम होते तो खरा साधक आहे. साधकाचे साध्य म्हणजे उणिवा तपासणे, त्यांचा लेखाजोखा मांडणे. त्या दूर करण्याचा प्रयत्न करणे. एकदा जाणिवेच्या या पातळीपर्यंत प्रवास झाला की उणिवा संपतात मग नेणिवेचा प्रवास चालू होतो. तो अनंताचा प्रवास. कुसुमाग्रजांच्या भाषेत अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा... यातील ध्येयाची आसक्ती. मुळात आसक्ती हा शब्द आपण त्याज्य गोष्टींसाठी वापरतो. कुठलंही व्यसन, स्त्रीवगैरे याबाबत आसक्ती बोलली जाते. परंतु ध्येयाची आसक्ती वेगळी. ज्याला ती आसक्ती लागली ना तो खरा बेहोश, बेधुंद, मदहोश होतो हे देहभान विसरून तद्रूप होणे म्हणजे जाणिवेची परमोच्च पातळी. बंगालचे गौरांग प्रभू हे धुंद होऊन नाचायचे, मीरा होऊन. तो चैतन्यभाव, ती मीराभक्ती तुम्हाला नेणिवेच्या पातळीपर्यंत नेते. तेथूनच मुक्ती, मोक्ष, इथपर्यंत जाता येतं. म्हणजे थोडक्यात आपल्या उणिवांपासून सुरू झालेला हा जाणिवांचा प्रवास वेगळी जाणीव देत देत एक नेणिवेच्या स्थिर पातळीपर्यंत जातो. तिथेच आपला संन्यास ठरलेला आहे. हा संन्यासी म्हणजे केवळ संसारमुक्त विरागी सत्पुरुष नाही. तर संसारातील उणिवांचं मर्म ज्याला कळलं, ज्याला त्याची जाणीव झाली ती नेणिवेच्या पातळीपर्यंत जाणारी कुणीही व्यक्ती म्हणजे परमसंन्यासी, तो वेगळाच असतो. माणसाच्या मनाचा खरा प्रवास असाच असतो. कित्येकांना तो दिसतो, पण सापडत नाही, काहींना सापडतो, पुढे जाता येत नाही, काही पुढे जातात, पण गोंधळतात. काही जातात, रस्ता चुकतात. एखादाच रस्त्याने थेट जातो, पोचतो तो संत!
उणीव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:40 AM