हा जर खरोखरीच एक योगायोग असेल तर तो मोठा विलक्षणच म्हणावा लागेल. बिहारातील लालूप्रसाद यांचे पट्टशिष्य, त्या राज्यातील सिवान मतदारसंघाचे चार वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे ‘लोकनेते’, गुन्हेगारी साम्राज्याचे पोशिंदे आणि खून प्रकरणी जन्मठेप भोगणारे मुहम्मद शहाबुद्दीन यांची जामिनावर सुटका होताक्षणी राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विरोधात खुद्द शहाबुद्दीन यांनी आणि माजी केन्द्रीय मंत्री डॉ.रघुवंश प्रसाद सिंह यांनी तोफ डागावी याला वेगळे महत्व आहे. भाजपाला बिहारात पाय रोवू द्यायचा नाही या निर्धाराने तिथे विधानसभा निवडणुकीत ‘जनता’ परिवार या नावाखाली कथित धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आले आणि त्यांनी एकमताने नितीशकुमार यांना भावी मुख्यमंत्री म्हणून मुक्रर केले. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे खुद्द लालूप्रसाद न्यायालयात लाच प्रकरणी गुन्हेगार सिद्ध झाल्याने व जामिनावर मुक्त असल्याने निवडणूक लढविण्यास अपात्र होते आणि आजही आहेत. निवडणुकीत जनता परिवारासमोर भाजपाचा टिकाव लागला नाही आणि नितीशकुमार मुख्यमंत्री झाले. त्यांनी लालूंच्या दोन मुलाना आपल्या मंत्रिमंडळात सहभागीही करुन घेतले. पण आता शहाबुद्दीन यांनी कारागृहातून बाहेर येताक्षणी नितीशकुमार यांना अपघाती मुख्यमंत्री असे बिरुद बहाल केले आहे आणि ते आपले नेते कधीच होऊ शकत नाहीत, आपले नेते लालूप्रसादच आहेत असे स्पष्टपणे जाहीर केले. शहाबुद्दीन यांची भागलपूर कारागृहातून जामिनावर मुक्तता झाली तेव्हां तिथे अलोट गर्दी होती व त्या ठिकाणाहून तब्बल दोनशे मोटारींच्या ताफ्यात ते सिवानला जाऊन पोहोचले. ताफ्यात काही लाल दिव्याच्या मोटारीही होत्या, पण वाटेतील एका रस्त्यावरील टोल त्यांनी तर नाहीच, पण इतर वाहनांनीही भरला नाही कारण टोल न घेण्याचे म्हणे आदेशच जारी झाले होते. याचा अर्थ तेथील राजकारण पुन्हा एकदा आपली कूस बदलू लागले आहे. त्याचा प्रत्यय डॉ.रघुवंश प्रताप सिंह यांनीही आणून दिला आहे. आपल्याला आपले नेते लालूप्रसाद हेच मुख्यमंत्री व्हायला हवे होते पण त्यांचा नाईलाज झाल्याने आम्हीही नाईलाजाने नितीशकुमार यांना स्वीकारले असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी नितीशकुमार यांनी लागू केलेल्या दारुबंदीच्या धोरणावर टीका केली असून या धोरणाचा वापर लोकाना बदनाम करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप केला आहे. शहाबुद्दीन असोत की रघुवंश प्रसाद, दोघे स्वत:स लालूंचे अनुयायी मानीत असल्याने त्यांनी जी भाषा सुरु केली आहे ती त्यांची स्वत:चीच असेल आणि त्यांचे बोलविते धनी खुद्द लालूप्रसाद नसतील असे ठामपणे कोणीही सांगू शकणार नाही. यातून एक मात्र झाले आहे. भाजपाला ‘जंगलराज की वापसी’ असा प्रचार करण्याची संधी मिळाली आहे. नितीशकुमार यांनी न्यायालयात बोटचेपी भूमिका घेतल्यानेच शहाबुद्दीन यांना जामीन मिळाला, असा आरोपही आता केला जाऊ लागला आहे. पण नितीश हेदेखील राजकारणातील पट्टीचे पोहणारे असल्याने ते सारे काही निमूट सहन करतील असे नव्हे.