फार पूर्वी ठरविलेल्या आणि प्रत्येक मिनिटाचा कार्यक्रम आखून घेतलेल्या भेटींना औपचारिकतेचा दर्प असतो. त्याऐवजी अचानक, न ठरविता दिलेली वा घेतलेली भेट स्नेहात एक सहज साधे अनौपचारिकपण आणत असते. काबूलहून दिल्लीला परत येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाटेत लाहोर येथे उतरून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची घेतलेली आकस्मिक भेट अशा अनौपचारिक स्नेहाचा व आपल्या दोन देशांच्या संबंधात येऊ शकणाऱ्या चांगल्या वळणाचा आरंभ ठरावा अशी आहे. २५ डिसेंबर हा ख्रिसमसचा पवित्र दिवस. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचाही वाढदिवस आहे. त्याच मुहूर्तावर नवाज शरीफ यांच्या नातीचा विवाहही व्हायचा होता. काबूलहून निघण्याआधी मोदींनी शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा फोन करावा, त्याला उत्तर देताना ‘आमच्या देशावरून प्रवास करीत आहात तर लाहोरला थांबत का नाही’ असे शरीफ यांनी म्हटले आणि त्याप्रमाणे मोदींनी लाहोरला उतरून शरीफ यांची गळाभेट घेतली या सगळ्या घटना चित्रपटात घडाव्या अशा आहेत. मात्र त्यात औपचारिकतेचा लवलेशही नाही. मोदी आणि शरीफ यांची ही अनियोजित भेट शरीफ यांच्या सरकारी कार्यालयात वा निवासस्थानी न होता त्यांच्या खासगी घरी होणे आणि तेथे होत असलेल्या विवाह समारंभात मोदींनी सहभागी होणे हीदेखील या अनौपचारिक स्नेहमीलनाचा विशेष ठरावा अशी बाब आहे. या भेटीत काय घडले, काय बोलले गेले वा कोणते करार-मदार चर्चिले गेले हे महत्त्वाचे नाही. मुळात ही भेट हीच एक महत्त्वाची व वळणाचा टप्पा ठरावी अशी बाब आहे. पाकिस्तानच्या निर्मितीपासून त्या देशाने भारताकडे वैर भावनेने पाहिले आहे. या दोन देशात तीन अघोषित व दोन घोषित युद्धेही झाली आहेत. अपरिमित प्राणहानी, दोन्ही बाजूंचे लष्करी व मुलकी असे प्रचंड नुकसान, पाकिस्तानचे त्यात झालेले दोन तुकडे आणि दोन्ही देशांच्या सीमेवर सदैव चालणारा गोळीबार या साऱ्यांच्या पार्श्वभूमीवर मोदींनी शरीफ यांची घेतलेली ही अनौपचारिक भेट या दोन देशातील राजकारणाला वळण देऊ शकणारी बाब आहे आणि त्यासाठी त्या दोघांचेही अभिनंदन करणे आवश्यक आहे. दुर्दैव याचे की, शरीफ हे त्यांच्या देशाच्या राजकारणात कितपत स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात याची माहिती जगाला नाही. पाकिस्तानमध्ये आरंभापासूनच मुलकी सत्तेवर लष्कराचा वरचष्मा राहिला आहे. त्याचे अनेक सेनापती तेथील लोकशाही सरकारे उलथून सत्तेवर आले आहेत. झिया उल् हक या लष्करप्रमुखाने त्या देशाचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांना फासावरही लटकावले आहे. आताचे लष्करप्रमुख राहील शरीफ हेही सरकारवर कुरघोडी करण्याचे व त्याला मागे ठेवून स्वत:ची धोरणे त्यावर लादण्याचे राजकारण करणारे म्हणूनच जगाला ठाऊक आहेत. आग्रा येथे वाजपेयी आणि मुशर्रफ यांच्यात मैत्रीच्या वाटाघाटी सुरू असतानाच पाकिस्तानचे लष्कर कारगिल युद्धाच्या तयारीला लागले होते, या घटनेचे स्मरणही यासंदर्भात महत्त्वाचे ठरावे असे आहे. तरीही या पार्श्वभूमीवर भारताच्या पंतप्रधानांचे आकस्मिक व अनपेक्षित स्वागत करण्याची नवाज शरीफ यांनी केलेली तयारी व त्यांच्या निमंत्रणाचा मोदींनी राखलेला सन्मान या बाबी महत्त्वाच्या आहेत. मोदींच्या स्वागताला शरीफ स्वत: विमानतळावर हजर राहिले व त्यांना सोडायलाही ते तिथवर आले ही बाब कोणाच्याही नजरेतून न सुटावी अशी आहे. त्या दोघांतील आताचे संबंध यापुढेही असेच राहावे, ते वाढावे आणि त्यांनी या दोन देशांच्या संबंधात नवी जवळीक निर्माण करावी अशी शुभेच्छाच अशावेळी साऱ्यांनी व्यक्त केली पाहिजे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आजवरच्या तणावाने त्या दोन्ही देशात शस्त्रस्पर्धा वाढीला लागली, त्यासाठी त्यांना त्यांचा लष्करी खर्च वाढवावा लागला आणि सीमेवर सातत्याने चालणाऱ्या गोळीबारालाही त्यांना तोंड द्यावे लागले. परिणामी विकासाच्या योजनांवरचा खर्च कमी होऊन या देशांना पुरेसे विकसित होता आले नाहीत. या देशातील वैरभाव संपला तर त्यांच्या विकासाची वाटचाल आणखी गतिमान होऊ शकणार आहे. मात्र त्यासाठी नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ या दोघांमधलाच सद्भाव पुरेसा नाही. त्यासाठी या दोन देशातील जनतेच्या मनातील परस्परांविषयीची तेढही संपवावी लागेल. त्यासाठी त्यांच्यातील राजकीयच नव्हे तर धार्मिक तणावही संपावा लागेल. पाकिस्तानच्या जनतेतील भारताएवढाच येथील हिंदूंचा द्वेष आणि इकडच्यांच्या मनातला पाकिस्तानएवढाच मुसलमानद्वेषही नाहिसा व्हावा लागेल. तेवढ्यासाठी या दोन्ही पंतप्रधानांना आपापले पक्ष व सहकारी यांना जास्तीचा आवर घालणे यापुढे गरजेचे होणार आहे. धार्मिक तेढीतून भारताची फाळणी झाली. त्यामुळेच आजवरची युद्धेही झाली. ही तेढ वाढविण्याचे प्रयत्नही सातत्याने दोन्हीकडे चालू राहिले. ती अशी वाढत असताना या दोन देशात कायमचे सख्य निर्माण व्हायचे नाही. त्यासाठी दोन पंतप्रधानांची गळाभेटही पुरेशी नाही. तसे व्हायला दोन्ही देशातील जनतेत व विशेषत: हिंदू आणि मुसलमानांच्या संघटनांतही सौहार्द निर्माण व्हावे लागेल. मोदी व शरीफ यांच्या भेटीने दोन्हीकडचे अतिरेकी शांत व्हावे एवढेच अशावेळी सदिच्छेने म्हणायचे.
या भेटीला सार्वत्रिक सद्भाव लाभावा
By admin | Published: December 27, 2015 9:42 PM