परवा, शुक्रवारी रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला एक वर्ष पूर्ण होईल. या वर्षपूर्तीला आक्रमक रशिया आणि प्राणपणाने लढणारा युक्रेन, त्याच्या पाठीशी उभी राहणारी नाटो संघटना, विशेषत: अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स आदी बडे देश काय करतील, यावर विविध अंदाज व्यक्त केले जात असताना सोमवारी आक्रीत घडले. इतिहासात प्रथमच ज्या युद्धात अमेरिकन सैन्याचा अजिबात सहभाग नाही, अशा युद्धभूमीवर जाण्याचे धाडस अध्यक्ष जो बायडेन यांनी दाखवले. याआधी अफगाणिस्तान, इराकच्या युद्धभूमीला अमेरिकेच्या अध्यक्षांनी भेट दिली खरे, पण तिथे अमेरिकाच प्रत्यक्ष लढत होती. युक्रेनचे तसे नाही. शस्त्रे व दारूगोळा देऊन नाटो संघटनेतील सदस्य राष्ट्रे, पश्चिमेचे अनेक देश युक्रेनच्या पाठीशी खंबीरपणे उभे असले तरी रशियासारख्या बलाढ्य आक्रमकाविरुद्ध ते युद्ध तो छोटा देश एकटाच लढत आहे. तरीदेखील जगासाठी हिरो ठरलेल्या जेलेन्स्कींनी रशियाला जेरीस आणले आहे. त्यामुळेच काही आठवड्यातच रशिया युक्रेनचा घास घेईल ही शक्यता धुळीस मिळाली.
युद्ध दुसऱ्या वर्षात जात असताना ऐंशी वर्षांचे अमेरिकन अध्यक्ष जो बायडेन हे देशाच्या रक्षणासाठी तळहातावर शीर घेऊन झटणारे युक्रेनचे अध्यक्ष वाेलोदिमिर जेलेन्स्की यांच्या खांद्याला खांदा लावून उभे असल्याचे चित्र कीव्हमध्ये दिसले. सेंट्रल कीव्हमधील स्मृतिस्तंभावर क्रिमिया संघर्षातील शहीद सैनिकांना नाटो संघटनेतील सदस्य राष्ट्र अभिवादन करत होते तेव्हा अवतीभोवती सुरक्षा रक्षकांचा गराडा होताच शिवाय आजूबाजूला सायरनचे आवाज घुमत होते आणि युक्रेनच्या पूर्वभागावर रशियाची क्षेपणास्त्रे इमारती जमीनदोस्त करत होती. सर्वशक्तीमान अमेरिकेच्या अध्यक्षांनी प्रचंड जोखीम घेऊन अचानक युद्धभूमीवर जाण्याचे धाडस दाखवणे हा जगासाठी अचंबा होता. नेहमी वापरतात त्यापेक्षा थोड्या छोट्या सी-३२ विमानाने जो बायडेन रविवारी पहाटे वॉशिंग्टनजवळच्या लष्करी तळावरून जर्मनीच्या दिशेने निघाले. सोबत सुरक्षा अधिकारी, वैद्यकीय पथक, निकटचे सल्लागार आणि वॉलस्ट्रीट जर्नलच्या सबरिना सिद्धीकी व छायाचित्रकार इव्हान गुस्सी हे दोनच पत्रकार होते.
ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्याच्या मोहिमेसारखीच ही मोहीम गुप्त होती. दोन्ही पत्रकारांकडील मोबाईलही काढून घेण्यात आले होते. सात तासांनंतर बायडेन जर्मनीतील रॅमस्टीन विमानतळावर उतरले. तिथून पोलंडमधील झेझोफला दुसऱ्या विमानाने आणि तिथून आठ बोगींच्या विशेष रेल्वेने दहा तासांचा प्रवास असे मजल-दरमजल करत चोवीस तासांनी बायडेन यांचा ताफा रेल्वेने युक्रेनच्या राजधानीत पोहोचला. बायडेन यांचे हे धाडस निर्णायक ठरू शकते. त्यांनी साधलेली वेळही महत्त्वाची आहे. सध्या ब्रुसेल्समध्ये युरोपियन संघाच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक सुरू आहे. स्वत: बायडेन यांनी युक्रेनला शस्त्रास्त्रांसाठी पाचशे दशलक्ष डॉलरचे नवे पॅकेज जाहीर केले आहे. जपानने तब्बल ४.६ अब्ज डॉलर्स मदतीची घोषणा केली आहे. चीनचे मुत्सद्दी वँग यी मॉस्कोमध्ये आहेत.
चीनने प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्याही रशियाला मदत करू नये, अन्यथा महायुद्धाला तोंड फुटू शकते, असा इशारा जेलेन्स्की यांनी दिला आहे. नाटोच्या सदस्य राष्ट्रांसह तीस देशांनी रशिया, बेलारूसला ऑलिम्पिक व अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांपासून बाहेर ठेवण्याची मागणी केली आहे. आधीच एकट्या पडलेल्या रशियाला आणखी घेरण्याची तयारी सुरू आहे. अशाही बातम्या आहेत, की रशियाकडील दारूगोळा व शस्त्रास्त्रांचा साठा संपत चालला आहे. त्यामुळेच चीनला सोबत घेण्याची कवायत पुतीन करीत आहेत. जो बायडेन वॉशिंग्टनवरून निघण्याच्या अवघे काही तास आधी संकेत व सौजन्य म्हणून अमेरिकेने युद्धाचा तणाव कमी करण्याच्या मोहिमेवर अध्यक्ष निघणार असल्याचे रशियाला कळविले. प्रत्यक्षात बायडेन यांची युक्रेन भेट रशियासाठी धक्कादायक राहिली.
सेंट्रल कीव्हमध्ये जेलेन्स्कींसोबत फेरफटका मारून ते पुन्हा पोलंडला निघेपर्यंत रशियाला कसलीही खबरबात नव्हती. रशियन गुप्तचर यंत्रणांनाही बायडेन यांनी चकवा दिला. साहजिकच त्या अपयशाची चीडचीड पुतीन यांच्या मंगळवारच्या भाषणात दिसली. क्रेमलिनमध्ये लंबेचौडे भाषण देताना त्यांनी, पाश्चात्य देशांनीच युद्ध लादले असून रशियन फौजा तर केवळ युक्रेनच्या जनतेचे, रशियन भूमीचे रक्षण करत आहेत, अशी मखलाशी केली. आता कदाचित उद्विग्न पुतीन युक्रेनवर हल्ले वाढवतील. तथापि, जखमी झाला असला तरी युक्रेन संपणार नाही, याची ग्वाही बायडेन यांच्या भेटीने जगाला दिली आहे.