(दादरला भाजपा पक्ष पदाधिकाºयांच्या बैठकीत एका कार्यकर्त्याने त्याच्या भावना व्यक्त करणारे पत्र लिहून आणले. ते पत्र प्रदेशाध्यक्षांनी वाचून दाखवले, ते असे...)नेते मंडळीहो,नमस्कार. झालेल्या मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. तुम्हाला मंत्रिपदाच्या खुर्च्या मिळाल्या आहेतच. आता तीळगूळपण आमचाच घ्या आणि जमलं तर आमच्याशी थोड कडूपण बोला... तुमच्या एवढ्या गोड बोलण्याची आम्हाला सवय लागली तर पुढं कसं होणार आमचं. मी पक्षाच्या बैठकीला निघालो तर वाटेत आदित्य ठाकरे भेटले. मला काय काय सांगू लागले... ते ऐकून काय प्रतिक्रिया द्यावी हे मला काही कळलं नाही. आपण सगळे ज्येष्ठ नेते जमणारच आहात तर तेव्हा आदित्यनी जे काय सांगितलं ते तुमच्या कानावर घालावं म्हणून हा पत्रप्रपंच. त्यावर आपणच योग्य ते मार्गदर्शन केलं तर बरे. आदित्य, गिरीश बापटांचे खूप कौतुक करत होते. म्हणाले तुमच्याकडे एकमेव दिव्यदृष्टी प्राप्त असणारा नेता तेवढाचयं... बापटांनी सांगून टाकलयं, की वर्षभरात सरकार बदलणार आहेच, जे काय मागायंच ते आत्ताच मागून टाका... पण तुम्ही काही कार्यकर्ते, पदाधिकाºयांचे फार मनावर घेऊ नका. काही कुणाला द्यायची गरज नाही असा सल्ला दिलाय आदित्यनी. ते म्हणाले, महामंडळं, विशेष कार्यकारी अधिकारी अशा अनेक गोष्टी असतानाही तीन वर्षे तुम्हाला कोणी काही मागीतलं का? आता उरलेल्या दीड वर्षातही तुम्हाला कुणीही काहीही मागणार नाही, तुम्हीदेखील काही देण्याच्या भानगडीत पडू नये. दीड वर्षात तुम्ही काय देणार आणि आम्ही कार्यकर्ते काय घेणार? तेव्हा देण्याघेण्याच्या गोष्टी बाजूलाच राहू द्याव्यात असा त्यांचा सल्ला आहे. मलाही पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तो पटलाय. उगाच नको ते व्यवहार कशाला?पक्ष कसा वाढवायचा यासाठी आपण बैठक घेत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन करायला सांगितलं आदित्यनी मला. पण ते असंही म्हणाले, की पक्ष वाढवण्यासाठी तुमच्या कुणाचीही गरज उरलेली नाही. कार्य सिद्धीस नेण्यास ‘मामु’ (माननीय मुख्यमंत्री) समर्थ आहेत. ते एकटेच दिवसातील सगळे तास सतत काम करत असतात. त्यांनी एक सर्वे केलाय म्हणे. त्यात असं लक्षात आलंय की, तुम्ही केलेले घोळ दुरुस्त करण्यातच त्यांचा जास्त वेळ जातोय. तेव्हा तुम्ही जेवढे कमी घोटाळे कराल तेवढा जास्त वेळ ‘मामु’ना विधायक कामांसाठी मिळेल असा त्यांचा सल्ला होता. परवा तर म्हणे, ‘मामु’नी एका मंत्र्याला बोलावून सांगितले म्हणे, की तुमच्या मुलाला, पीएसला व ओएसडीला एकदम शांत बसायला सांगा नाहीतर तुमचा खडसे करून टाकीन... हे खरं की खोटं, की ‘मामु’बद्दल उगाच वावड्या आहेत ते पण तपासून घ्या. जाता जाता आदित्य असंही म्हणाले की, आपल्या पक्षात म्हणे पाच दहा हजारांची सभा घेणारा एकही नेता नाही. त्यावर मी त्याला सुधीरभाऊ, पंकजाताई अशी काही नावं सांगितली तर तो म्हणतो, ते अपवाद सोडून सभा गाजवणारा, भाषणं गाजवणारा एकपण नेता आपल्याकडे उरला नाही असे त्यांचे म्हणणे होते. त्यावर पण रावसाहेबांना विचारा काय करायचं ते. बाकी काळजी नको. आपले सगळे आमदार बसल्या जागी आरामात निवडून येणार आहेतच...
आदित्यचा भाजपाला सल्ला..!
By अतुल कुलकर्णी | Published: January 17, 2018 2:54 AM