कुमुद गोसावी - अध्यात्मतेजाची पूजा करणारी भारतीय संस्कृती! तिनं आत्मतेजाची आभाही जपली आहे. ज्ञानदिवटी हाती घेत ज्ञानपोत पाजळले आहेत. मात्र कधी कधी या उजेडातून जाणारी वाट जिथं संपते तिथं होतो दृष्टिभ्रम! मग ‘आपुलाचि आपण करीसी संवाद’ अशी मनोवस्था होते. मनाच्या विभ्रमात अडकल्यानं सत्याची कास सुटते. मन मृगजळामागे धावतं.शेतकरी आपल्या पिकाचं रक्षण व्हावं म्हणून शेतात बुजगावणं उभारतो, ते पक्ष्यांचा दृष्टिभ्रम व्हावा म्हणून! स्वत:च्या बुद्धिचातुर्याचाच हा उपयोग! विद्वत्तेच्या अहंकारानं माखलेल्या कविकुलगुरू कालिदासाला प्रवासात एकदा तहानेनं व्याकुळलेल्या अवस्थेत एका झोपडीत पाणी मागण्यासाठी जावं लागलं. तिथं स्वत:चा परिचय एका मुलीला तिनं विचारलं म्हणून, ‘मी एक प्रसिद्ध, बलवान मानव आहे’, असं उत्तर देताच ती मुलगी म्हणाली, ‘जगात दोनच बलवान आहेत - एक अन्न व दुसरं पाणी.’ मुलीचं उत्तर अचूक असल्याचा अनुभव कालिदास तहानेनं तडफडताना घेतच होता.कालिदास वरमला. आपण ‘वाटसरू’ आहोत असं सांगताच मुलीनं सांगितलं, ‘वाटसरू तर दोनच आहेत - एक सूर्य नि दुसरा चंद्र! जे अथकपणे मार्ग आक्रमित असतात! तुम्ही तर थकलेले दिसताय!’ एवढं बोलून ती तेथून निघून गेली. घशाला लागलेली कोरड कालिदासाला जणू जाणीव करून देत होती की, ‘अन्नपाण्याशिवाय आपण बलहीन ठरतो. विद्वत्ता नि व्यवहार यात फरक असतो तर!’ एक वृद्धा पाण्याची घागर घेऊन येताना दिसताच कालिदास मोठ्या आशेनं तिच्याकडं झेपावत, तिनं काही विचारायच्या आत म्हणाला, ‘आई, मी अतिशय तहानलेला पाहुणा आहे!’ त्यावर ती वृद्धा म्हणाली, ‘बेटा संसारात पाहुणे तर दोनच! एक धन व दुसरं तारुण्य. तेव्हा तू खरं सांग, तू कोण आहेस?’ पाण्याविना अंत होऊ नये म्हणून कालिदासानं सांगितलं, ‘मी सहनशील आहे.’ त्यावर ताडकन वृद्धेनं सुनावलं, ‘स्वत:ला विद्वान समजतोस नि असत्य बोलतोस. अरे! सहनशील तर दोनच! एक झाड, जे कुऱ्हाडीचे घाव सोसून माणसाला फळंच देत राहतात, सावलीत घेतात नि दुसरी पृथ्वी! तिचं पोट फाडून बी पेरलं तरी ते रुजवून अंकुरते, धान्य देते!’ हताश होऊन कालिदास शेवटी डोळ्यांत प्राण साठवून अगतिकतेनं म्हणतो, ‘आई, मी मूर्ख आहे.’ त्यावर वृद्धा म्हणते, ‘या दुनियेत दोनच मूर्ख आहेत! एक राजा व दुसरा पंडित. राजाला स्वस्तुती आवडते नि पंडिताला ती नाहक करावीशी वाटते. या दोघांएवढे कोण मूर्ख आहे, हे आता तूच सांग पाहू?’ कालिदासाचा अवघा अहंकार गळून पडला, दृष्टिभ्रमाचा पडदा दूर झाला! नाही का? याचि देही याचि डोळा । भोगीन मुक्तीचा सोहळा ।। असा अहंतारहित आनंदानुभव कोणाला नकोय?
प्रापंचिक दृष्टिभ्रम
By admin | Published: January 12, 2015 1:22 AM