शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

Afghanistan Crisis : अफगाणिस्तानच्या दुर्दैवाचे दशावतार झाले, कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 7:28 AM

Afghanistan Crisis: तालिबानचा जुनाट, मध्ययुगीन व्यवहार सर्वसाधारण अफगाणींना खटकत नसेल, तर बदलाची ऊर्मी आणि आग कशी धगधगणार? 

- निळू दामले(ज्येष्ठ पत्रकार)

अफगाणिस्तानवरतालिबानने कब्जा मिळवल्याचं स्पष्ट झाल्यावर वृत्तवाहिनीवर बोलताना एका अफगाण महिलेला रडू कोसळलं. “उद्या मी जिवंत असले तर कशी असेन, ते मला माहीत नाही,”- असं ती उद्वेगाने  म्हणत होती.- या दुर्दैवी देशाबाबत जगाची प्रतिक्रिया काहीशी तशीच आहे. अफगाण लोक  जीवाच्या आकांतानं उडणाऱ्या विमानाला चिकटून देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न करताहेत, मरताहेत आणि आपण सारे हतबल होऊन दुर्दैव उलगडताना पाहात आहोत!

अमेरिका वीस वर्षं अफगाणिस्तानात मुक्काम करून होती. प्रचंड सैन्यबळ आणि पैशाचा वापर करून अमेरिकेनं तालिबानला सत्तेपासून दूर ठेवलं. अमेरिकेनं सैन्य माघारी बोलावल्यामुळंच आता तालिबानचं फावलं आहे, असं काही लोक म्हणतात.

अमेरिकेच्या अध्यक्षांनीही आपली हतबलता जाहीर बोलून दाखवली आहे. अमेरिका आता आणखी दोन वर्षं काय किंवा पाच वर्षं काय अफगाणिस्तानात राहिली, तरी फरक पडणार नाही; मग कशाला विनाकारण तिथं अडकून पडायचं, असा त्यांचा सूर दिसतो.

तालिबानचं क्रौर्य अमान्य असणारे खूप लोक आणि देश जगभरात आहेत. त्यांनी काय केलं असतं तर तालिबानला अफगाणिस्तान बळकावण्यापासून  दूर ठेवता आलं असतं? 

मलाला युसुफझाई शाळेत जाऊन शिकत होती म्हणून तालिबांनी तिच्या चेहऱ्यावर गोळ्या झाडल्या. मलालाला ‘नोबेल’सह अनेक बक्षिसं आणि सन्मान मिळाले. पण, ती पाकिस्तानात किंवा अफगाणिस्तानात परतू शकली नाही. ती ब्रिटनची रहिवासी झाली. ज्या दोन देशांत तिला छळ सहन करावा लागला त्या तिच्या देशांत ती राहू शकत नाही; याचा अर्थ काय होतो? एकूणात अफगाणिस्तान  स्त्रिया,  असाहाय्य माणसं यांना न्याय देऊ शकत नसेल तर जगानं काय करायचं?

अफगाणिस्तानच्या सामाजिक, सार्वजनिक व्यवहारावर अफगाण संस्कृतीचा प्रभाव आहे. माणसं हजारा असोत, ताजिक असोत, उझबेक असोत की पश्तू, त्यांच्या त्यांच्या जमातीच्या परंपरा आणि रूढी यांचा प्रभाव त्यांच्यावर आहे. अफगाण माणसं अफगाणिस्तानात असतात तोवर  स्त्रियांना माणूस म्हणून वागवायला तयार नसतात.  अफगाणी परदेशात गेले तर तिथं मात्र ते आपल्या स्त्रियांना ठीक वागवतात. स्वतःच्या देशात त्यांच्या लेखी स्त्री हे  मुलं जन्माला घालणारं यंत्र, मुकाट घरकाम करणारी एक व्यक्ती, शारीरिक भूक भागवणारा फक्त एक प्राणी असतो. लोकशाही, मानवी अधिकार आणि स्वातंत्र्य, विज्ञान इत्यादी गोष्टी अफगाण समाजात रुळलेल्या नाहीत. त्यामुळंच तालिबानचं स्त्रीविषयक वागणं किंवा एकूणच तालिबानचा मध्ययुगीन व्यवहार अफगाण समाजाला खटकत नाही... अशा स्थितीत बाहेरच्या माणसांनी काय करायचं?

रशियानं कायदे करून या देशात आधुनिकता रुजवण्याचा प्रयत्न करून पाहिला. अफगाणांनी ते मान्य केलं नाही, रशियनांना हाकलून दिलं. अमेरिकेनं अगदी मर्यादित हेतूसाठी अफगाणिस्तानात प्रवेश केला. अफगाणिस्तानातून आपल्यावर हल्ले होऊ नयेत याचा बंदोबस्त करण्यासाठी अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात गेलं होतं. अफगाण सैन्याला प्रशिक्षित करणं आणि सरकारला स्थिर पायावर उभं करणं असा प्रयत्न अमेरिकेनं केला. अफगाण मन समजून घेऊन ते सुधारण्याचा प्रयत्न मात्र अमेरिकेनं केला नाही.२००१ नंतर अफगाणिस्तानात तीन निवडणुका झाल्या. तालिबानचा निवडणुकांना विरोध होता. बोटावर मतदान केल्याची खूण (शाईचा ठिपका) दिसला की तालिबान ते बोट तोडून टाकत. लष्कर आणि पोलिसांची मदत घेऊन निवडणुका घडवण्यात आल्या. इतका कडेकोट बंदोबस्त झाल्यावरही जेमतेम वीसेक टक्के लोकांनीच मतदान केलं. तेही बहुतांशी मोठ्या शहरात. बहुसंख्य लोकांनी आपल्याला लोकशाही हवीय असं म्हणत बंड केलं नाही, तालिबानला झुगारलं नाही. तालिबानची दहशत मान्य करून लोक मतदानापासून दूर राहिले. 

“सरकारं भ्रष्ट असली तर चालेल, त्यांच्यात आम्ही सुधारणा करू; पण तालिबानसारखी हुकूमशाही पुन्हा येऊ देणार नाही,” असं म्हणायला अफगाण माणसं तयार नाहीत. बाहेरून कोणी तरी यावं, बाहेरून शस्त्रं आणि पैसा यावा आणि देशातल्या गोष्टी बदलाव्यात असं अफगाण मानस दिसतं. आर्थिक दुरवस्थेमुळं समाज मागासलेला राहतो, हे खरं. पण, आर्थिक सुधारणा झाल्यानंतर त्यांचा फायदा घेतलेली माणसं विचाराने आधुनिक होतातच असं नाही. विचाराने, मनातूनच ती जर आदिम असतील तर काय करणार? कुंडल्या आणि भविष्य यावर आतूनच पक्का विश्वास असेल तर कॉम्प्युटरचा उपयोग माणसं कुंडल्या करण्यासाठीच करतात, असा सुस्थितीतल्या भारताचाही अनुभव आहेच की! 

अफगाण समाजाची, पश्तू समाजाची स्थिती दुःखदायक आहे. ती सुधारली पाहिजे. पण, ती सुधारणा त्या समाजात आतून व्हायला हवी. बाहेरून सहानुभूती आणि काही मदत जरूर मिळू शकते; पण बदलायचा निर्णय त्यांनीच घ्यायला हवा.                           (उत्तरार्ध)damlenilkanth@gmail.com

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान