आपला मुलगा शाबान याला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना निमंत्रण न देता ते पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना देणारे आणि ‘आम्हाला मोदी आवडत नाहीत व त्याना आम्ही आवडत नाही’ असे म्हणणारे राजधानी दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम सैय्यद अहमद बुखारी यांनी नुकतीच मोदींची जी भेट घेतली आणि त्यानंतर मोदींकडे देशाचे पंतप्रधान म्हणून बघितले पाहिजे असा उपदेशही केला त्यावरुन त्याना अंमळ विलंबाने का होईना उमज पडली असे म्हणता येईल. मुळात बुखारी यांचे इमामपद वंशपरंपरागत आहे वा नाही आणि त्यांना स्वत:च्या पुत्रास नायब इमाम म्हणून घोषित करण्याचा व त्यासाठी मोठा सोहळा करण्याचा अधिकार आहे की नाही यावरुन त्या काळात खुद्द मुस्लीम समाजातच मोठ्या प्रमाणावर मतभेद होते. तरीही बुखारी यांनी हा सोहळा रेटून नेला व एकट्या मोदींना वगळून त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य अनेक सदस्यांना मात्र आवर्जून निमंत्रित केले होते. तो नि:संशय खोडसाळपणाच होता. पण तो त्यागून त्यांनी मोदींची भेट घेतली आणि संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पुन्हा एकदा मोदींशी चर्चा करण्याचे मुक्ररही केले. अर्थात परवा झालेल्या भेटीचा हेतू मात्र अत्यंत स्तुत्य होता. गेल्या काही दिवसांपासून देशभर इसिसच्या संपर्कातील म्हणून काही सुशिक्षित मुस्लीम तरुणांना पोलीस ताब्यात घेत आहेत. त्याबाबतची चिंता करण्यासाठी ही भेट होती. पण अशी चिंता केवळ बुखारी याना एकट्यालाच भेडसावते आहे असे मात्र नाही. मुस्लीम समुदायाच्या एकूण सहा संघटनांनी एक पत्रक जारी करुन हीच चिंता व्यक्त केली आहे. या समस्त संघटना आणि शाही इमाम यांनीदेखील इसिसचा तीव्र शब्दात निषेध करताना ती संघटना इस्लामीक असूच शकत नाही असेही स्पष्टपणे म्हटले आहे. गेल्या वर्षी दिल्लीत पार पडलेल्या एका दहशतवादविरोधी परिषदेत बोलताना केन्द्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी जाहीर वक्तव्य करुन भारतात इसिसचे अस्तित्व नसल्याचा निर्वाळा दिला होता, पण तसे असताना आता अचानक त्या संघटनेशी संबंधित म्हणून मुस्लीम युवकाना जेरबंद कसे केले जाऊ शकते असा सवालदेखील या संघटनांनी केला आहे. आपल्या पत्रकात या संघटनांनी गेल्या काही वर्षात अटक झालेले मुस्लीम युवक आणि त्यांच्यावर दाखल खटले यांची आकडेवारीच सादर केली असून या आकडेवारीनुसार बहुसंख्य युवकाना अकारणच डांबून ठेवल्याचे स्पष्ट होते. तसे असेल तर ही बाब निश्चितच देशाच्या एकात्मतेला तडा देणारी आहे. परंतु आपण देशातील नागरिकांकडे मुस्लीम अथवा हिन्दू अशा नजरेतून बघत नसल्याचा निर्वाळा पंतप्रधानांनी स्वत:च दिल्याचे बुखारी यांनी म्हटले असून त्यांना पडलेली उमज बरीच मोठी म्हणावी लागेल.