विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवाजी पार्कवर गुरुवारी आलेल्या तमाम शिवसैनिकांनी खरेच हे सोने लुटले असेल की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकून त्यांचा वैचारिक गोंधळ वाढला असेल, असा प्रश्न पडतोय. त्यांच्या भाषणाच्या आधी उद्योगमंत्री सुभाष देसाई, खा. संजय राऊत आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी ज्या पद्धतीने भाषणे केली त्यावरून युती तोडण्याचीच घोषणा उद्धव त्यांच्या भाषणात करतील, असे वातावरण तयार झाले होते. भाजपा, नरेंद्र मोदींना आता गाडूनच आम्ही शांत होऊ, असा देसाई-राऊत-कदमांचा आवेश होता. प्रत्यक्षात ठाकरे यांनी शिवसेना लोकसभेची वा विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणारच, असा कोणताही निर्धार बोलून न दाखविता आपल्या पक्षातील नेत्यांच्या भावनांवर पाणी फिरवले.
ठाकरे यांच्या भाषणातील आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत असल्याचा पूर्वानुुभव असला तरी कालचे त्यांचे भाषण निराशा करणारे होते. ठोस भूमिकेचा अभाव दिसून आला. पक्षाचे नेते एक बोलतात आणि सर्वोच्च नेता मात्र त्याला तिलांजली देत कुठलीही ठोस भूमिका घेत नाही असा विरोधाभास क्षणोक्षणी जाणवला. रा.स्व. संघाचे सरसंघचालक नागपूरच्या विजयादशमी उत्सवात आणि इकडे शिवाजी पार्कवर ठाकरे काय बोलतात हे अनुक्रमे स्वयंसेवक आणि शिवसैनिकांसाठी आगामी वर्षाच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचनांसारखेच असते. शिवसैनिकांच्या मनातील शंकाकुशंका दूर करीत त्यांना दिशा देण्याचे काम बाळासाहेब शिवाजी पार्कवरील भाषणातून करीत असत. या ठाकरी शैलीच्याच अपेक्षेने शिवसैनिक हे उद्धव यांनाही ऐकायला येतात. ‘मी काय बोलणार? माझ्या आधीचे लोक बोलले आहेतच. मी राजकारणावर बोलणार नाही. आता ज्योतिषावर, हवामानावर बोलतो’ ही उद्धव यांच्या कालच्या भाषणातील वाक्ये ठाकरेंकडून अपेक्षित असलेल्या टोकदार भूमिकेशी मेळ खाणारी नव्हती. सध्या देशभर गाजत असलेल्या आणि विशेषत: काँग्रेसने ज्यावर रान उठविले आहे त्या राफेल प्रकरणाविषयी एक शब्दही उद्धव बोलले नाहीत हेही अनाकलनीय होते. राम मंदिराचा मुद्दा हाती घेऊन शिवसेनेने पुन्हा एकदा भावनिक राजकारण सुरू केले आहे. स्वत: उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार आहेत. आपले जाणे हा पहिला इशारा असेल. त्यानंतरही मंदिर बांधले गेले नाही तर तमाम हिंदूंना घेऊन आम्ही ते बांधू, असे उद्धव यांनी जाहीर केले. मात्र, त्याविषयीचा कोणताही ठोस कार्यक्रम त्यांनी दिला नाही.
भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भाजपाचे सगळे नेते लोकसभा व विधानसभा निवडणुकीत युती होणारच असे सांगत आले आहेत. मात्र, शिवसेनेने स्वबळावरच लढू आणि भाजपाला जागा दाखवू अशी भाषा चालविली आहे. उद्धव यांनी मात्र कालच्या सभेत स्वबळाला बगल दिली. स्वबळाचा नारा देणाऱ्या उद्धव यांचे पाऊल कालच्या सभेत मात्र युतीच्या दिशेने पडले. मोदीजी! तुम्ही पुन्हा सत्तेत येऊ नये अशी विकृती आमच्या मनात नाही, असे सांगत त्यांनी तुटेपर्यंत ताणणार नसल्याचे संकेत दिले.
(लेखक 'लोकमत'मध्ये वरिष्ठ साहाय्यक संपादक आहेत.)