तो फक्त ८ वर्षांचा होता. एके दिवशी आजीने जोराने हंबरडा फोडला. त्याला समजलं की, त्याच्या काकांना पोलिसांनी गोळी मारली. त्याची चुलत, मावस, आत्ये भावंडं पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मारली गेली होती. तो १५ वर्षांचा झाला तेव्हा एक वाया गेलेला उनाड, गुंड, अमलीपदार्थांची विक्री करणारा तस्कर अशी त्याची ओळख झाली होती. ही ओळख त्याला आवडू लागली. त्याच्या या जगण्यात धोका होता. पण, त्याला तेच त्याचं सामान्य आयुष्य वाटायचं.
२०११ पर्यंत अमेरिकेतील फिलाडेल्फियामधील टेरिक ग्लासगो याची हीच ओळख होती. जे वय शाळा -काॅलेजात जाऊन शिकण्याचं असतं, त्या वयात हा पोलिसांची नजर चुकवून गुन्हेगारी कृत्य करण्यात गढलेला होता. कितीतरी वेळा पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. त्याला गोळ्या मारल्या. तरीही टेरिक वठणीवर येत नव्हता. पण, २००६ मध्ये २२ वर्षांच्या टेरिकला पोलिसांनी पकडलं. ड्रग्ज विकण्याच्या आरोपाखाली त्याच्यावर खटला चालला आणि ५ वर्षांची शिक्षा झाली. २०११ मध्ये टेरिक तुरुंगातून बाहेर आला. आता त्याला रस्त्यावरची गुंडगिरी खुणावत नव्हती, एक वेगळंच आयुष्य त्याला साद घालत होतं, टेरिकने त्या सादेला प्रतिसाद देण्याचं ठरवलं.
५ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर टेरिकच्या मानसिकतेत खूप बदल झाला होता. या कालावधीत त्याने आपण काय चुका केल्या, याचा अंतर्मुख होऊन विचार केला. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याला स्वत:साठी एक नवीन वाट शोधायची होती. त्याच्या भागात राहणाऱ्या एका मुलाने फ्लॅग फुटबाॅल टीमसाठी टेरिकची मदत मागितली. त्या मुलाच्या गरजेत टेरिकला नव्या आयुष्याकडे जाण्याचा मार्ग सापडला. टेरिकने त्या मुलाच्या फ्लॅग फुटबाॅल टीमला प्रशिक्षण देण्याचं कबूल केलं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही लोकं टेरिककडे जुन्या नजरेनेच बघायचे. तुरुंगातून बाहेर आलेला गुंड, मवाली या ओळखीचा टेरिकला आता कंटाळा आला होता. आता त्याला त्याच्या भागातील मुलांना एक चांगला रस्ता दाखवायचा होता. ती संधी त्याला फ्लॅग फुटबाॅलच्या कोचच्या निमित्ताने चालून आली.
टेरिकच्या आयुष्याला त्याच्या गल्लीतल्या मुलांनी एक नवीन उद्देश दिला. मुलांना फ्लॅग फुटबाॅलचं प्रशिक्षण देत असतानाच त्याने मुलींचा नृत्याचा समूह तयार केला. त्याला लहान मुलांसाठी, तरुणांसाठी विधायक कामे करण्याची गोडी लागली. त्यातूनच त्याने ‘ यंग चान्सेस फाउंडेशन’ची स्थापना केली. आपल्यासारख्या भरकटलेल्या मुलांना चांगल्या जगण्याची संधी देण्याचा प्रयत्न तो या फाउंडेशनच्या माध्यमातून करू लागला. एक वेळ होती टेरिक चोरून तरुणांना ड्रग्ज विकायचा. आता टेरिक त्याच्या भागातील तरुणांसाठी युथ कॅम्प, मुलांसाठी समर कॅम्प, शाळेनंतरचे उपक्रम अशा अनेक गोष्टी आयोजित करू लागला.
टेरिकने आपल्या भागातील लोकांना मदत करण्यासाठी कम्युनिटी सेंटर सुरू केलं. ड्रग्जच्या जागी टेरिक आता लोकांना अन्न, त्यांच्या गरजेच्या वस्तू, साधन सामग्री मोफत पुरवू लागला. आठवड्यातले सहा दिवस हे कम्युनिटी सेंटर सुरू असतं. येथे किराणा, कपडे, मुलांना शालेय वस्तू मोफत दिल्या जातात. तरुण मुला- मुलींसाठी विविध विषयांवरचे प्रशिक्षण टेरिक आयोजित करतो. टेरिक जे प्रयत्न करतो, त्याला त्याच्या भागातील लोकंही दाद देत आहेत. लोकांनी टेरिकला स्वीकारलं. कारण टेरिक लोकांना मदत करताना स्वत:ला त्यांच्यात पाहतो. त्याच्या भागातले पोलिसही सुधारलेल्या टेरिकच्या मागे उभे राहिले. एकेकाळी टेरिकला गोळ्या मारणारे पोलिस टेरिकने आयोजित केलेल्या कम्युनिटी बैठकांना येऊ लागले. या मीटिंगाद्वारे टेरिकने पोलिस मदत करायला उभे राहतात, हा विश्वास लोकांमध्ये निर्माण केला.
टेरिकने फिलाडेल्फिया शहरातल्या त्याच्या भागात सुरू केलेल्या या कामाचा परिणाम आता दिसू लागला आहे. टेरिकच्या भागातील ९० टक्के गोळीबारातून होणाऱ्या हत्या कमी झाल्या आहेत. स्वत: पोलिसही याचं श्रेय टेरिकच्या ‘यंग चान्सेस फाउंडेशन’ला देतात. गुन्हेगारीत अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्याचा मार्ग टेरिकला मिळाला आहे. या मार्गावर टेरिकसोबत फिलाडेल्फियातले अनेक तरुण चालू लागले आहेत. टेरिक आता तरुणांच्या गळ्यातला ताईत झाला आहे. तुरुंगात असताना टेरिकनं पाहिलेलं स्वप्न साकार झालं आहे.
बंदुकीच्या जागेवर उगवली फुलंटेरिक जिथे राहतो तिथे भली मोठी मोकळी जागा आहे. त्या जागेवर पूर्वी टेरिक बंदुका आणि ड्रग्ज लपवायचा. आपल्या दुष्कृत्याने बदनाम झालेल्या या जागेला टेरिकने आता लोकप्रिय केलं आहे. त्याने या जागेवर लोकांच्या मदतीने कम्युनिटी गार्डन फुलवलं. आता या गार्डनमध्ये भाज्या आणि फळं उगवतात, त्याचा उपयोग त्या भागातील गरजू लोकांना होतो.