पावसाच्या तडाख्याने झाड कोसळून मुंबईत आणखी दोघांचा आणि महिनाभरात सहा जणांचा बळी गेल्याने योग्य छाटणी न केलेल्या धोकादायक झाडांचा विषय ऐरणीवर आला आहे. मुंबईतील २९ लाख झाडांपैकी यंदा ९३ हजार झाडांची छाटणी करण्याची गरज होती. त्यासाठी पालिकेने चार हजारांवर सोसायट्यांना नोटिसा पाठवल्या, पण त्यातील अवघ्या दीड हजार सोसायट्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे झाड पडले, की त्याला पालिका जबाबदार की सोसायटी हा वाद दरवेळी रंगतो. पालिकेच्या पथकाने सतत पाहणी करून झाडांवर लक्ष ठेवायला हवे, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे, तर ही त्या त्या सोसायट्यांची जबाबदारी आहे, असे सांगून पालिका हात झटकते. ठाण्यातील अशा वादात जागरूक नागरिकांनी न्यायालयात लढत देऊन या प्रकरणातील पालिकेची जबाबदारी निश्चित केली आणि झाड पडून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्यास भाग पाडले होते. सध्याच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील वातावरणातच शहरातील झाडे घटत आहेत. वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी झाडे तोडली जातात आणि त्याऐवजी झुडपे लावली जातात. पुढे ती जगत नाहीत. अनेकदा छान दिसावीत म्हणून लावलेली परदेशी झाडे या वातावरणात मूळ धरत नाहीत. या साऱ्यांवर देखरेख ठेवणे, केवळ वृक्ष लागवड करून घेणेच नव्हे, तर ती झाडे जगवणे; शहराच्या पर्यावरणाचा-स्थानिक वातावरणाचा विचार करून झाडांची जोपासना करणे अशी अनेक कामे करण्यासाठी वृक्ष प्राधिकरण यापुढील काळात कळीचे ठरणार आहे. मुंबई-ठाण्यातील वृक्ष प्राधिकरणावर तज्ज्ञांच्या नेमणुका न करता तेथे राजकीय पक्षांच्या मर्जीतील व्यक्तींची वर्णी लावण्याचा घाट स्वयंसेवी संस्था, जागरूक नागरिकांनी न्यायालयाच्या मदतीने उधळल्याचा इतिहास ताजा आहे. अनेकदा झाड पडण्यामागे त्याच्या अयोग्य छाटणीचा मुद्दा समोर येतो. झाडाचा जमिनीवर असलेला घेर जेवढा मोठा असतो, तेवढीच त्याची मुळे खाली पसरलेली असतात. अनेकदा वेगवेगळ््या कामांसाठी रस्ते किंवा पदपथ खोदताना मुळे कशीही तोडली जातात. त्यात झाडाचा तोल बिघडतो. कधी फांद्यांची छाटणी एकाच बाजूने केली, तरीही झाड कलंडते. यासाठी वृक्ष प्राधिकरण, त्यांतील तज्ज्ञ सदस्य शहराच्या मदतीला येऊ शकतात. पण तेथेही पडेल उमेदवारांना संधी आणि चरण्यासाठी नवे कुरण मिळेल, या अपेक्षेने जर नेमणुका होत असतील; तर झाडे पडून होणाºया मृत्यूंबद्दल पालिकेतील यंत्रणांवर गुन्हे दाखल करायला हवेत. तसे झाले तरच या समित्या, त्यांचे महत्त्व साºयांच्या ध्यानी येईल. शिवाय झाडे पडण्याचा विषय हा केवळ पावसाचा फटका न राहता शहराच्या पर्यावरणाचा, त्यातील नागरिकांच्या जगण्या-मरण्याचा विषय होईल.
पुन्हा झाडाझडती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 4:19 AM