महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीत जागावाटपाची काथ्याकूट सुरू असताना प्रत्येक निवडणुकीप्रमाणे तिसऱ्या आघाडीच्या नाट्यप्रयोगाची पहिली घंटा वाजली आहे. राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी, युवराज संभाजीराजे यांचा स्वराज्य, बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती, वामनराव चटप यांचा स्वतंत्र भारत व शंकरअण्णा धोंडगे यांचा महाराष्ट्र राष्ट्र समिती या पक्षांनी एकत्र येऊन परिवर्तन महाशक्ती नावाच्या आघाडीची घोषणा केली आहे. तथापि, ही आघाडी अजून अपूर्ण आहे आणि तशी कबुलीही या सगळ्यांनी दिली आहे. राज्यभर प्रभाव असलेले अन्य काही पक्ष या आघाडीत येत नाहीत तोपर्यंत आघाडीला पूर्णत्व येणार नाही. त्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी किंवा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात रान पेटविणारे मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेण्याचा या मंडळींचा विचार सुरू आहे. सध्या विधानसभेच्या २८८ जागा आपसात कशा वाटून घ्यायच्या हा पेच महायुती व महाविकास आघाडीपुढे आहे.
सर्वांत मोठा पक्ष बनायचा असेल तर स्ट्राइकरेटचा विचार करता किमान पावणेदोनशेच्या आसपास जागा लढवायलाच पाहिजेत, असे भाजपला वाटते. उरलेल्या जागांवर शिंदेेसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे समाधान होईल का हा प्रश्न आहे. अशीच स्थिती आघाडीतल्या तीन पक्षांची आहे. पण, असा पेच या तिसऱ्या आघाडीपुढे नसेल. कारण, या छोट्या पक्षांच्या समूहासाठी संपूर्ण राज्याचे रान मोकळे आहे. म्हणूनच सर्व २८८ जागा लढविण्याची आणि कोणाला हरविण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठीच लढण्याची घोषणा करण्यात आली आहे. तरीदेखील राजकीय वर्तुळात या तिसऱ्या भिडूंमुळे नुकसान कोणाचे होईल, याचीच चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, तूर्त या परिवर्तन महाशक्ती नावाच्या तिसऱ्या आघाडीत सहभागी असलेले बहुतेक सगळे पक्ष कधी ना कधी भाजप व शिवसेनेच्या भगव्या युतीचा घटक राहिलेले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी युतीमधून खासदार झाले होते. युवराज संभाजीराजे यांना भाजपने राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा सदस्य बनविले होते. बच्चू कडू तर त्यांनी घोषणा करेपर्यंत राज्यातील सत्ताधारी महायुतीचा भाग राहिले. सत्तावाटपात त्यांच्या पक्षाला काही मिळाले नसल्याने ते नाराज असल्याचे मानले जात होते. विदर्भातील वामनराव चटप किंवा मराठवाड्यातील शंकरअण्णा धोंडगे हे प्रत्यक्ष महायुतीत नसले तरी परंपरेने काँग्रेसविरोधक मानले जातात. याचा अर्थ हा की ॲड. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी किंवा एमआयएम यांसारखे धर्मनिरपेक्ष मतांवर प्रभाव असणारे इतर पक्ष या आघाडीत येत नाहीत तोपर्यंत सध्याच्या आघाडीचा तोंडवळा नाही म्हटले तरी महायुतीमधील नाराजांचा समूह असाच राहील. सध्या या आघाडीत शहरी मतदारांवर प्रभाव असणारी राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही. उलट आघाडीतील सगळ्या पक्षांची पार्श्वभूमी ग्रामीण आहे आणि प्रामुख्याने प. महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात त्यांचे अस्तित्व आहे. युवराज संभाजीराजे यांचा नाशिकमधील थोडा प्रभाव वगळता मुंबई, कोकण व उत्तर महाराष्ट्रात या आघाडीतील पक्षांचा खूप मोठा प्रभाव नाही. म्हणजेच ही आघाडी सध्या तरी राज्यव्यापी नाही. याहून महत्त्वाचा मुद्दा आहे देशातील राजकारणाच्या एकूणच वळणाचा. २०१४ व २०१९ च्या निवडणुकांमधील भारतीय जनता पक्ष व त्याच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मोठे बहुमत, दिल्ली केंद्रस्थानी ठेवून घडणाऱ्या घडामोडी व इतर कारणांनी देशाचे राजकारण ‘बायपोलर’ बनले आहे.
इतके की भारतीय राजकारणाला दोनच ध्रुव आहेत, असे वाटावे. राजकीय पक्ष छोटा असो की मोठा, राष्ट्रीय असो की प्रादेशिक त्याला रालोआ किंवा इंडिया यापैकी एका आघाडीकडे जावेच लागते, अशी स्थिती आहे. कारण, बहुसंख्य मतदार या दोन आघाड्यांपैकीच एकीची निवड करण्याच्या मनस्थितीत आहेत. परिणामी, दोन्ही आघाड्यांपासून अंतर ठेवणारी भारत राष्ट्र समिती, बहुजन समाज पक्ष यांसारख्यांचे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठे नुकसान झाले. सतराव्या लोकसभेत अशा तटस्थ खासदारांची संख्या सत्तर होती, ती आता केवळ सतरा आहे. विधानसभा निवडणुकीत पाच-सात हजार मते इकडे-तिकडे झाली तरी निकाल बदलतो, हे खरे. तरीदेखील महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीच्या रणकंदनात तिसरी आघाडी उभी राहात असताना तिसरा पर्याय उभा करू पाहणाऱ्या पक्षांना या पैलूचा विचार करावा लागेल.